सुश्री अर्चना दादासाहेब मुळे

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ कंटेंट क्रिएटर्स — दिसतं तसं नसतं… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆

ऋचा खूप छान विडिओज बनवते. सोशल मिडियावर तिला खूप लाईक्स मिळतात. ती सतत नवनवीन सामग्री युट्यूब, फेसबुक वर पाठवत असते. ती युट्यूबवर बोलते, तेव्हा ऐकत राहावं असं वाटतं. ती स्क्रिनवर दिसतेही सुंदर. तिला भेटल्यावर मला छान वाटलं. पण तिच्या चेहर्‍यावर काही आनंद नव्हता. हिरमुसलेला चेहरा. विचारात गढलेली, जणु स्वमग्न अशी ती. स्वत:वरच नाराज झाली होती. नंतर ती म्हणाली, “मला कळतंच नाही, मी का सतत सामग्री निर्मिती करते. पाकळ्यांमधे अडकलेल्या भुंग्यासारखी माझी अवस्था झाली आहे. सतत सामग्रीला लाईक्स हवेत. चांगले कमेंट्स हवेत. बघ्यांची संख्या वाढली पाहिजे. पुढचा व्हिडिओ चांगलाच झाला पाहिजे. या सगळ्याचा ताण येतोय. थांबायचा विचार करते. नेमकं त्याचवेळी प्रेक्षक संख्येत लक्षणीय वाढ होते. माझा उत्साह वाढतो. मी पुन्हा नवं देण्याच्या विचारात गुरफटते. मी सतत तणावात आहे. मला यातून बाहेर पडायचं आहे. “

जगभरात ऋचासारखे २०७ मिलियन पेक्षा जास्त आणि भारतात आठ कोटी पेक्षा जास्त कंटेट क्रिएटर्स म्हणजेच सामग्री निर्माता आहेत. पैकी ७५% जणांना ताण आहे. २२% लोकांना वारंवार ताणाचा सामना करावा लागतो. ७९% निर्मात्यांनी बर्नआऊटचा अनुभव घेतला आहे. यावरून हे स्पष्ट होते की, सामग्री निर्माता म्हणजे दिसतं तसं नसतं. एका सर्वेक्षणानुसार २०२७ मधे सामग्री निर्मिती क्षेत्रात ५०० अब्ज डाॅलर्सची वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक दृष्ट्या या क्षेत्राचं आकर्षण वाढतंच चाललं आहे. सगळ्याच वयोगटातील लोकांना करियर, प्रसिद्धी आणि यशासाठी हा मार्ग सहज सोपा आणि लोकप्रिय वाटतो. याचे समाधानकारक फायदे असू शकतात. पण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मानसिक ताण वाढत जाण्याची दाट शक्यता आहे.

३८ वर्षाच्या नसीम नजाफी अघदाम हिने कॅलिफोर्नियामधील यु ट्यूबच्या कँपसमधे जाऊन तिथल्या कर्मचार्‍यांवर गोळीबार केला. त्यात तीन जणं जखमी झाले. त्यानंतर तिनं आत्महत्या केली. तिचं असं म्हणणं होतं की, तिच्या सामग्रीकडे युट्यूबने दुर्लक्ष केलं. तिच्या सामग्रीमधे काटछाट केली. त्यामुळे तिला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

सामग्रीची निर्मिती करणं कठीण आणि आव्हानात्मक असतंच. वेळेवर विडीओ पोस्ट केला नाही तर लोक विसरतील, व्यवसाय ठप्प होईल याची चिंता लागून राहते. शिवाय प्रत्येकाला आकर्षणापोटी अनेक प्रश्न पडतात. जसं की, मी पण बनू का सामग्री निर्माता? विडिओज आत्तापासूनच करू की कसं? माझा विडिओ चांगला झालाय की नाही? किती हजार लोकांनी तो बघितला? मी पुढं कोणत्या विषयावर विडिओ करू? माझा व्हिडीओ ५० हजार तरी लोक बघतील ना? तो किती लोकांना आवडला? जर विडिओ अपेक्षेपेक्षा जास्त लोकांना आवडला तर ते आवडणं टिकवून ठेवण्याचा ताण. कमी लोकांना आवडला तर आवड वाढवण्याचा ताण. सामग्री निर्मात्याच्या आनंदाचं, दु:खाचं, ताणाचं बटन लोकांच्या आवडी निवडीच्या हिशोबानं चक्राकार फिरत राहतं. तिथं चालू बंद काही नाहीच. म्हणूनच स्वत:च्या यशावर, कौशल्यावर स्वत:च प्रश्न उपस्थित करणारा मानसिक आजार इंपोस्टर सिंड्रोम, सततच्या कामामुळं येणारा प्रचंड थकवा (क्रिएटर बर्नआऊट), अवास्तव दर्जा टिकवण्याची चिंता, इतर निर्मात्यांबरोबरची तुलना, सतत अपयशाची भीती अशा मानसिक आजारांना हे सामग्री निर्माते जणु निमंत्रणच देत असतात. सामग्री निर्माते मिस्टरबीस्ट सातत्यानं सुट्टी न घेता काम करतात. ट्विटरवर झालेल्या संवादात ते म्हणाले, “सुट्टी न घेता काम केल्याने ताण येतो. मी मानसिकदृष्ट्या मरत आहे. “

सामग्री निर्मात्यानी क्राफ्ट (वाचणे, लिहिणे.), कलेक्ट (चिंतन, मनन करणे), रिफ्लेक्ट (विडिओ निर्मिती करणे) हे टप्पे लक्षात ठेवावेत. आपण सामग्री देता देता थकतोय याचं भान असावं. स्वत:च्या मूल्यांचा विसर पडू देवू नये. प्रेक्षकांशी सहसंबंध प्रस्थापित करावेत. ताण किंवा चिंता निर्माण करणारे ट्रिगरिंग पाॅइंट माहीत करून घ्यावेत. याशिवाय नियमित विश्रांती घेणे. वास्तववादी ध्येय निश्चित करणे. संगीत ऐकणे. बाहेर फेरफटका मारणे. स्वत:चे ऊर्जा स्त्रोत शोधणे. मित्रांकडून सहकार्य घेणे. ध्यान, योग करणे. पुरेशी झोप घेणे. पौष्टीक जेवण करणे. कुटुंबासोबत वेळ घालवणे. गरजेनुसार समुपदेशकाचा सल्ला घेणे. आठवड्यातून एकदा स्वत:च्या कामगिरीचं विश्लेषण करणे. इ. गोष्टी जाणीवपूर्वक कराव्यात. ‘जिंका किंवा मरा’ याप्रमाणे ‘प्रकाशीत करा किंवा मरा’ असा टोकाचा मानसिक दबाव येऊ शकतो. रोमन जीवन तत्त्चज्ञानाचे अनुयायी स्टोईक लोक म्हणतात, ‘आपण आपल्या प्रतिक्रिया आणि आपली कृती यावरच नियंत्रण करू शकतो. ‘ त्यामुळं कंटेंट क्रिएटरच्या भाषेत लाईक्स, शेअर, फाॅलोअर्स संख्या अशा यशाच्या मागे लागू नये. शारीरिक मानसिक भावनिक आरोग्य चांगलं ठेवावं. तरंच ना सामग्रीची चिंता. ना निर्मितीची.

© सुश्री अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments