सौ. गौरी गाडेकर
मनमंजुषेतून
☆ “आनंदीबाई गोपाळराव जोशी” – लेखिका : सुश्री साधना राजहंस-टेंभेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
नुकताच “आनंदी गोपाळ” या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आणि माझ्या जुन्या स्मृति पुन्हा जागृत झाल्या… वाचनाची मला लहानपणापासूनच खूपच आवड… आईदादा कुणाकडे घेऊन गेले तरी मी तिथलच कुठलंतरी पुस्तक शोधून कुठेतरी कोपर्यात जाऊन वाचत बसायचे.. जातांना मला शोधावं लागायचं असं आता मोठे बहीण भाऊ सांगतात…
तर या आवडीमुळे मी विपुल वाचन केलं.. त्यात श्री. ज. जोशींच्या ‘आनंदी गोपाळ’ ने अगदी कोवळ्या वयातच मी खूप भारावून गेले होते.. एवढ्या वर्षांपूर्वी केवळ नवर्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन महिन्याचा जहाजाचा कष्टदायक प्रवास करून सर्वस्वी अपरिचित अशा देशात अगदी एकटीने जायचं हे धाडस त्या १७ वर्षाच्या कोवळ्या मुलीने कसं केलं असेल हा माझ्यासाठी अजूनही अनुत्तरीत प्रश्न आहे.. ( मला आत्ताही एकटीला जायचं थोडं टेंशन येईलच)..! ! मुळात ज्याकाळी मुलींना शिक्षण देणं हेच दुर्मिळ होतं त्याकाळी आपल्या लहान वयाच्या बायकोला, सातासमुद्रापार पाठवून देशातली पहिली महिला डाॅ. बनवण्याचं स्वप्न बघणं हे किती क्रांतीकारी होतं. धन्य ते गोपाळराव आणि धन्य ती आनंदी..! !
पण “आनंदी गोपाळ” ही एक कादंबरी होती. त्यात लेखकाने अर्थातच कल्पनाविलासाचं स्वातंत्र्य घेतलेलं होतं… मात्र काही वर्षांनी, अपघातानेच माझ्या हातात डाॅ. अंजली कीर्तने Anjali Kirtane यांचं ‘डाॅ. आनंदीबाई, काळ आणि कर्तृत्व’ हे अप्रतिम चरित्रलेखन हाती पडलं… अत्यंत संशोधनपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि आनंदीबाईंच्या हस्ताक्षरातल्या बर्याच पत्रांचा सहभाग असलेलं ते पुस्तक वाचल्यावर, आनंदीबाई, आंतरबाह्य समजायला खूप मदत झाली…. त्यांच्या व्यक्तिमत्वाने झपाटूनच गेले मग मी… पुस्तकाविषयी लिहायला गेलं तर एक वेगळा लेख होईल.. पण विषय वेगळा असल्याने आवरतं घेते.. मला विशेष लक्षात राहिलं आणि आकर्षण वाटलं ते त्या पुस्तकाच्या कव्हरवर असलेल्या आनंदीबाईंच्या स्मारकाच्या (थडग्याच्या) फोटोचं आणि त्याबद्दल असलेल्या पुस्तकातल्या वर्णनाचं…!! आनंदीबाई ज्यांच्या घरी राहिल्या त्या कारपेंटर कुटुंबातल्या एका व्यक्तीला आनंदीबाईंच्या असामान्य कर्तृत्वाची जाणीव होऊन त्यांनी कारपेंटर कुटुंबातील इतर व्यक्तींच्या स्मारकाच्या बाजूलाच आनंदीबाईंचही स्मारक केलं आहे.. (त्याला थडगं म्हणायला मन धजावत नाही)…
हे पुस्तक वाचलं तेव्हाच ठरवलं जर पुढे काही कारणाने अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली तर हे स्मारक नक्की बघायचं…!! ही इच्छा त्याचवेळी मनात कोरली गेली… दैवयोगाने पुढे माझा मुलगा ईशान हा I I T graduate होऊन PHD साठी अमेरिकेला गेल्याने आम्ही तीनचारदा अमेरिकेला जाऊन आलो.. सुरुवातीला ईशानने बरच फिरवून, बरीच महत्वाची प्रेक्षणीय स्थळं दाखवलीत पण ही इच्छा मनात ठसठसत होतीच… २०१८ साली, माझ्या नणंदेच्या मुलीकडे-शील्पाकडे Shruti Pant – न्यू जर्सीला आम्ही गेलो असतांना गप्पागप्पात मी ती व्यक्त केली.. तेव्हा तिचा १८ वर्षांचा मुलगा सोहम याने लगेच गुगलवर ते ठिकाण शोधून “जवळच आहे. मी उद्या तुम्हाला घेऊन जातो” असे आश्वासन दिले.. ती रात्र संपून कधी दिवस उजाडतो असं मला झालं होतं..! !
ते ठिकाण त्यांच्या घरापासून साधारण १६० किमीवर होते… सकाळी लवकरच आम्ही तिथे जायला निघालो.. गुगल नकाशाच्या मदतीने तिथे पोचलो खरे… पण ती cemetery इतकी मोठी होती की सगळ्या थडग्यांवरची नावं वाचत शोधत बसलो असतो तर दोन तीन दिवस तिथेच गेले असते आमचे.. आपल्या डोळ्यापुढे स्मशान येतं त्याच्या अगदी विरूद्ध ही cemetery… एखाद्या मोठ्या बागेसारखी, अगदी आखीव रेखीव.. सुंदर झाडे, लाॅन्स, कारंजे यानी सजलेली… अतिशय मोठा परिसर… पण नवीन पिढी खरच हुशार… सोहमने लगेच त्या cemetery ची website शोधून आनंदीबाईंचं नाव टाकलं… एका सेकंदात त्यांच्या थडग्याचे co ordinates आम्हाला मिळाले आणि पुढच्या दोन मिनिटात आम्ही तिथे पोचलोदेखील…. त्या स्मारकाकडे बघून मनात आलेल्या भावना शब्दातीत होत्या… एका क्षणात लहानशा आनंदीने, हिंदुस्थानातील स्त्रियांच्या आरोग्यसेवेसाठी डाॅ. होण्याचे ठरवून, त्यासाठी केलेला कष्टदायक प्रवास, नवर्याकडून आणि देशवासियांकडून सतत सहन केलेली अवहेलना, आपली संस्कृती जपण्यासाठी प्रतिकूल हवामानातही पोशाखात बदल न केल्यामुळे झालेली प्रकृतीची हेळसांड, त्यामुळेच स्वप्नपूर्ती झाली तरी त्याची अंमलबजावणी होण्याआधीच मृत्यूने तिच्यावर घातलेला घाला… सगळं सगळं आठवलं….. त्या जागेला नमस्कार करतांना डोळ्यातून नकळत घळाघळा अश्रू वाहू लागले… ( असा अनुभव यापूर्वी फक्त अंदमानला आलेला )…! !
थोडा वेळ आनंदीबाईंच्या स्मारकापुढे स्तब्ध बसून घालवला व नंतर आम्ही परत आलो… माझी इच्छापूर्ति केल्याबद्दल मी पुन्हा पुन्हा शील्पा आणि सोहमचे आभार मानले… खरंच खूपच मोठा दिवस होता तो माझ्या आयुष्यातला….! ! अजूनही ते क्षण आठवले की खूप अलवार भावना दाटून येतात मनांत….! ! प्रत्येक भारतीयासाठी अतिशय अभिमान बाळगावा अशा या व्यक्तिचे स्मारक ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी अमेरिका वारीत नक्की बघावं अशी माझी त्यांना विनंती आहे….! ! सोबत काही फोटो पण शेअर करत आहे…! !
लेखिका : सुश्री साधना-राजहंस-टेंभेकर
कोथरूड, पुणे
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈