सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ अभावातले ऐश्वर्य…!!! ☆ सुश्री शीला पतकी ☆
आज सकाळी नातीने विचारले “ आजी अभाव म्हणजे काय ग ?.. “ मला जरा कौतुकच वाटले. मराठी काही शब्द जाणून घेण्याची तिला इच्छा आहे, चांगली गोष्ट आहे.
मी तिला सांगितलं, “ अभाव म्हणजे एखादी गोष्ट नसणे.. गोष्टीची कमतरता.. त्याला अभाव म्हणतात. म्हणजे म्हणजे वाईटच की.. असं नाही ग. तुझ्यात दुर्गुणाचा अभाव आहे याचा अर्थ तुझ्याजवळ खूप चांगले गुण आहेत.. म्हणजे अभाव म्हणजे नसणे आणि त्या नसल्यामुळे खूप चांगल्या गोष्टीसुद्धा घडत असतात.. “ ती उड्या मारत निघून गेली आणि मी विचार करत राहिले….
आमच्या पिढीमध्ये तर किती अभाव होते. पण त्या अभावाने मला वाटतं आम्ही समृद्ध झालो. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन खोल्यांची घरे, त्या दोन खोल्याच्या घरामध्ये सात आठ माणसे अगदी आरामात एकत्र राहत होतो. स्वयंपाक आणि बसण्याची खोली.. तीच झोपण्याची खोली.. तीच अभ्यासाची खोली.. तेच पाहुणेरावळे येऊन बसण्याची खोली. पण त्यामुळे सर्वांमध्ये सतत संवाद राहिला. वादही झाले पण संवाद होत राहिला, त्यामुळे जवळीक वाढली. त्या संवादातून काही खूप चांगल्या गोष्टी घडल्या. आठवणी राहिल्या, प्रेम वाढलं. आठ बाय आठच्या खोलीमध्ये सहा माणसांनी झोपणं.. मग त्यासाठी केलेली ती तडजोड, सकाळी लवकर उठणे.. या सगळ्या गोष्टींनी उलट एक समृद्धी दिली. जास्त वेळ झोपण्याची मुभाच नव्हती. सकाळी अंथरूण पांघरूण काढून त्या खोल्या पुन्हा बैठकीत सजवून ठेवायचे असायचं. बेडरूमचे पुन्हा स्वयंपाक घर व्हायचे. त्यामुळे गोष्टी वेळेत होत असत. सार्वजनिक बाथरूम अंघोळी पटापट सात-साडेसातपर्यंत आटपून जात असतात त्यामुळे धुणे नऊपर्यंत काठीवर जाणे, साडेदहाला जेवायला बसणे, शाळेला जाणे, आल्यावर अभ्यास करणे, मग शुभंकरोती पर्वचा, आठपर्यंत जेवण आणि नऊला पुन्हा झोपणे … त्यामुळे सर्वांना उत्तम आरोग्य लाभले. डॉक्टरकडे जायची वेळ फारशी आलीच नाही. अभावानेच एक चांगली जीवनशैली दिली आणि त्यामुळे निरामय आरोग्याचे वरदान लाभले.. !
लहानपणी पिझ्झा बर्गर हॉटेलला जाणे ह्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या. जे काही असेल ते घरी आणि मग या घरच्या स्वच्छ खाण्याने चणे फुटाणे, शेंगदाणे वाटाणे चिंच निवडून झाल्यानंतर चिंचुके चुलीत भाजून ते खाणे, आंब्याच्या कोईमधील पांढरा भाग भाजून तो खाल्ल्यामुळे कितीतरी कार्बोहायड्रेट किंवा त्यातील उपयुक्त रसायन पोटात गेली. कैरी चिंचा बोरे ही त्या त्या काळातली सहज उपलब्ध होणारी फळे … सोलापुरात तरी फळ नावाची गोष्ट म्हणजे फक्त केळी… आजारी माणसाला द्राक्ष मोसंबी संत्र्याचे दर्शन.. कलिंगड सीजनमध्ये दोन ते तीन वेळा आणलं जायचं. मग ते कलिंगड चंद्रकोरीप्रमाणे कापून एक एक फोड प्रत्येकाला मिळायची, ती पार बुडापर्यंत खायची. आज आता ते सांगतात की त्यातला पांढरा भाग फार उपयुक्त असतो. आम्ही तेव्हा तो खात होतो. त्यानंतर उरलेल्या काळ्या पाठी.. त्या धुऊन आमची आई त्याला मीठ हळद लावून उन्हात वाळवत असे आणि ते तळून त्यावर मीठ तिखट टाकले की उन्हाळ्यात ते खायला खूप सुंदर लागायचे. कोंड्याच्या पापड्या वाफेवरच्या पापड्या, पापडाचे पीठ.. त्याचे गोळे खाणे.. त्यामुळे उडदाचे पीठ पोटात जायचे. विविध डाळींचे सांडगे भाज्या म्हणून ते खाल्ले जायचे. बटाट्याचे घरी केलेले वेफर्स, बटाट्याचा कीस हे सगळं स्वच्छ मटेरियल असायचं. पैशाचा अभाव होताच पण हॉटेलात जाण्याची पद्धत नव्हती, त्यामुळे घरी करण्याचे पदार्थ यावर भर जास्त असायचा. लोणच्याच्या बरण्या भरून तयार असायच्या.. मुरंबे लोणची गुळांबा उन्हाळ्यातील पन्हे.. सब्जा घातलेले लिंबाचे सरबत.. याने पोटाला थंडावा मिळायचा. आतासारख्या थम्सअपच्या बाटल्या आणून पिणे हे त्या काळात नव्हतंच. आजच्या तुमच्या समृद्धीचा अभाव आम्हाला बळकट करून गेला. ताजे विटामिन मिळायचे. घरच्या दह्याचे सुंदर ताक.. लोणी काढल्यावर हातावर मिळणारा लोण्याचा तो गोळा.. आतासारखे ते पिवळट कागदातले लोणी नव्हते याला तुम्ही बटर म्हणतात.. अस्सल नवनीत आम्ही खाल्ले आहे.. शेवयाचे नूडल्स करता तुम्ही किंवा न्यूडल्स आणून यात मसाला घालून खाता.. आमच्याकडे शेवयाची मस्त अटीव दुधातली खीर पौष्टिक म्हणून ती उपयोगी पडेल किंवा पडली आहे. कधीकाळी डब्यात प्रिझर्वेटिव्हसह भरलेला श्रीखंड तुम्ही विकत आणता, मनाला आलं की बॉक्स आणायचा, फोडायचा आणि ताटात श्रीखंड… श्रीखंडासाठी दूध आटवून दही लावणे.. त्याचा चक्का आणि मग केशर बदाम पिस्ता घातलेले ते उत्तम श्रीखंड.. त्याची चव अप्रतिम असायची आणि शुद्ध सात्विक.. बाजारी मिळणाऱ्या श्रीखंडाच्या अभावामुळे आम्हाला घरचे सुंदर श्रीखंड खायला मिळाले. तशीच अटीव दुधाची निर्भेळ बासुंदी.. कधीतरी वडील हलवाई गल्लीत नेऊन आम्हाला बासुंदी खाऊ घालत असत, पण पुढे त्यात टीपकागद घालतात असे कळल्यापासून ते बंद झाले. आता सर्रास भेसळीशिवाय काही मिळतच नाही… बोर चिंचा पेरू गोन्या चीगुर याने आम्हाला कुठलंही विटामिन कमी पडू दिलं नाही. उंबराच्या झाडाची उंबरे फोडून किड्यांना बाहेर जाऊ देऊन झटकून झटकून खाण्यामुळे आमची इम्युनिटी वाढली. कच्ची उंबरे खाल्ल्याने आयुष्यभर पुरेल इतके पोटॅशियम मिळाले. सांजा, पुरणपोळी, सांज्याची पोळी या प्रकाराने भरपूर प्रमाणात गुळ पोटात गेल्याने लोहाची कमतरता भासली नाही. आमच्या पिढीत 90% लोकांचे हिमोग्लोबिन 12 /13 च्या पुढेच आहे. बळकट हाडे कणखर आहेत
मुख्य म्हणजे घरात सगळ्यांनी काम करण्याची पद्धत होती. प्रत्येक कामाला बाई नव्हती. पैशाचा अभाव होताच. प्रत्येकाने आपापली कामं करायची, शिवाय घरात वाटून दिलेली कामे करायची.. त्यामध्ये अगदी लहान असणाऱ्यांना कपबशा विसळण्यापासून काम असे… मैदानात खेळायला भरपूर जायचं.. बिन पैशाचे सगळे खेळ.. कुठलेही साहित्य कधी खेळायला लागले नाही. खेळणी विकत आणणे हा प्रकारच नव्हता असल्या गोष्टीवर घालायला पैसाच नव्हता. रद्दीतला कागदसुद्धा व्यवस्थित बांधून ठेवून तो रद्दीमध्ये घालणे आणि त्याचे पैसे करून त्यातून ग्रंथालयाची फी भरणे.. कारण उन्हाळ्यात आपण वाचनालय लावले तर पैसे आपणच या पद्धतीने जमा करावे लागत. पैशाच्या अभावाने कितीतरी गोष्टी आम्हाला शिकवल्या.. त्या वाचनातून आम्ही समृद्ध झालोत. रद्दीच्या वह्या वापरल्यामुळे कागदाची किंमत कळली.. प्रदूषणाला हातभार लावला नाही आम्ही. वापरा आणि फेकून द्या हा प्रकारच आमच्या वेळेला नव्हता त्यामुळे वस्तूंचा पुनर्वापर होत राहिला. प्लॅस्टिकची पिशवी कचऱ्यात गेली नाही. पुड्याला बांधून आलेले दोरे ते लगेच बंडल बांधून घरात एका विशिष्ट ठिकाणी ठेवले जाईल तेच दोरे हार तुरे बांधायला उपयोगी पडायचे. फाटलेल्या कपड्याच्या चौकटी शिवून त्याचे घरामध्ये पुसायला कापड व्हावयाचे. टिशू पेपरच्या नावाखाली भसाभसा कागद पुसून कचऱ्यात टाकणे हे आमच्या वेळेला नव्हतं. पायपुसणी वगैरे नव्हती.. अशाच कापडांचे मिळून एक जाड पाय पुसणे तयार व्हायचे आणि ते सुती असल्याने त्याच्यामध्ये पाणी शोषून घेतले जावयाचे. सोडा साबण घालून आठवड्यातनं फरशी स्वच्छ धुवायची.. कोणतेही डिटर्जंट लागलं नाही कारण तेव्हा ते नव्हतंच. अशा या अभावाच्या जमान्यात घरचं खाण्याची समृद्धी लाभली. उत्तम वाचन झाले. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे अवलोकन झाले. नाटक कीर्तन गायन नकला मेळे हे सर्व मनोरंजनाचे प्रकार मोफत उपलब्ध होते ज्याने आमचं आयुष्य समृद्ध केले. ऑनलाइन काही नव्हतं किंवा प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करावी लागायची त्यामुळे शहाणपण आले, चतुराईने खरेदी करता आली. माणसांची संपर्क वाढला. काही जणांचा तर अगदी जन्मोजन्मीच्या ओळखी आणि दृढ संबंध निर्माण झाले.
त्या काळातल्या अभावाने सर्वार्थाने आम्हाला समृद्ध केले एवढे मात्र खरे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टीव्ही आणि मोबाईल नव्हते, ॲमेझॉन नव्हतं, ॲप नव्हते. बाप सांगेल ते मुकाट्याने ऐकायचं.. आईच्या चरणाची नतमस्तक व्हायचं.. आजी आजोबांच्या प्रेमात नाहून निघायचं.. भावंडाशी प्रसंगी भांडायचं आणि प्रेम करायचं…..
…. पैशाच्या अभावाने ही केवढी मोठी समृद्धी आम्हाला दिली.. अभावातले ऐश्वर्य लाभणारी आमची शेवटची पिढी …
असो … ‘ कालाय तस्मैय नमः ‘
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈