? मनमंजुषेतून ?

☆ फोनकाका…☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

” फोनकाका…. “

“ नमस्कार, बोला… “

फोनकाका कधीच ‘हॅलो’ म्हणायचे नाहीत. त्यांचं फोनवरचं बोलणं ‘ नमस्कार ‘ म्हणतच सुरू व्हायचं.

मला फार आवडायचं ते.

फोनकाकांचं खरं नाव मधूकाका दांडेकर. ते आता आठवावं लागतं. कारण, आमची आख्खी बिल्डींग,

त्यांना ‘फोनकाका’ म्हणूनच ओळखायची. ओनरशीपच्या ऊमेदीच्या काळातली आमची बिल्डींग.

अवतीभवती भरपूर रिकामी जागा. सगळी मध्यमवर्गीय घरं. कुठल्यातरी वाड्यातून नाहीतर चाळीतून इथं आलेली… इथला ‘फ्लॅट’ घेताना ‘फ्लॅट’ झालेली साधी माणसं.

आपली मूळ अघळपघळ संस्कृती न विसरलेली. खाजगीपणाचा संसर्गजन्य रोग इथं पसरला नव्हता.

सगळ्या फ्लॅट्सची दारं सताड उघडी असायची. पंचवीस तीस पोरांचा धुडगूस सतत चालायचा.

दांडेकरांचं घर तेवढं उच्चभ्रू वाटायचं. बाकी कुठल्याही फ्लॅटमधे न दिसणारी एक वस्तू… अनमोल, अलौकिक… ती मधुकाकांच्या घरी होती. काळा कुळकुळीत फोन. कोकिळेने कुहू कुहू करावं, तसा ट्रिंग ट्रिंग वाजायचा.

लहान असताना मला, श्रीमंतीची भारी भारी स्वप्न पडायची. स्वप्नात मी मोठ्ठा माणूस झालेला असायचो.

मला गाडी, बंगला काहीही दिसायचं नाही. दिसायचा तो फक्त, पुढच्या खोलीत ठेवलेला फोन.

खरंच, फोन असणं मोठेपणाचं लक्षण असायचं तेव्हा. फोनकाकांचं पेठेत मोठ्ठं किराणामालाचं दुकान.

घरी आणि दुकानात दोन्हीकडे फोन. सकाळी सकाळी फोनकाकांचे पुण्यामुंबैला ट्रंककाॅल चालायचे.

ट्रंककाॅल म्हणजे गावजेवण. भावांच्या चढऊतारानुसार फोनकाकांचा आवाज फिरायचा.

आम्ही खाली खेळत असायचो. सगळं ऐकू यायचं. आम्ही तालासुरात फोनकाकांच्या आवाजाची नक्कल करायचो.. अगदी फोनकाकांची चिलूसुद्धा. फोनकाका कधीही रागवायचे नाहीत. खिडकीतून खाली बघत आपल्या सफरचंदी गालातल्या गालात हसायचे.

एकदा गंमतच झाली. आम्ही खाली खेळत होतो. खेळता खेळता माझी फोनकाकांची नक्कल चालूच होती… 

” नमस्कार, बोला… “.. मी फाॅर्ममधे.

एकदम फोनकाकांची हाक. ” कौत्या, वर ये जरा.. “.. चिडका आवाज. माझी तंतरली. मी घाबरत घाबरत वर..

‘ बस… एक फोन येईल आता. माझ्या सासूचा. माझ्या आवाजात बोलायचं.

‘ सध्या दुकानात दिवाळीची गडबड आहे. डिसेंबरात येवू.. ‘.. असं सांगायचं.. “

मी डिट्टो फोनकाकांसारखं बोललो… फोनकाका खूष. मूठभर काजूचा प्रसाद घेवून खाली पळालो.

संध्याकाळी मातोश्रींनी पाठीचा पाटा-वरवंटा केला.

” मेल्या, काय मिळवलंस असा आवाज काढून? दीड वर्ष झालं, चिलूची आई माहेरी गेली नाहीये.

मधुभाऊजींचा आवाज काढून, नाही जमणार म्हणालास, थांब तुझ्या कानात फोनची ट्रिंग ट्रिंग वाजवते. “

नंतर खरंच चार दिवस माझ्या कानात ट्रिंग ट्रिंग ऐकू यायचं.

 

एरवी फोनकाकांचं घर म्हणजे चावडी. सतत कुणीतरी बसलेलं असायचं. स्वयंपाकघरात चहाचं आधण सदैव ठेवलेलं. कुणाचा तरी फोन आलेला. कुणाचा तरी यायचा असायचा. फोनकाकांच्या घरानं कधी तक्रार केली नाही. घरचं कार्य असल्यासारखं फोनकाका निरोप द्यायचे.

कधीतरी बाबांचा फोन यायचा. फोनकाकांची हाक ऐकू यायची.

” भार्गवा कर्दनकाळ बोलावतोय रे… “.. कर्दनकाळ म्हणजे बाबांचे बाॅस. बाबा पळत पळत फोनकाकांकडे.

 

बिल्डिंगमधील कित्येक पोरींच्या लग्नाचा होकार फोनकाकांकडनंच समजायचा.

मला अजूनही आठवतंय. वैशूताईचे बाबा फोनकाकांकडे बसलेले. रात्री आठची वेळ. ते फोनकडे डोळे लावून बसलेले. तिकडून पसंती यायची होती.

फोन वाजला. फोनकाकांनी घेतला. काही न बोलताच ठेवून दिला.

” आप्पा, योग नाहीये रे.. ” वैशूताईचे बाबा डोळे पुसत घरी गेले.

मी बिल्डींगभर सांगत सुटलो.

” मी वैशूताईच्या बाबांना रडताना बघितलंय. “

तेव्हा काही नाही वाटलं. आता आठवलं की स्वतःचीच लाज वाटते.

महिनाभरानंतरची गोष्ट. मी वैशूताईकडे बसलेलो. फोनकाका धावत धावत आले… 

” आप्पा, नशीब काढलं पोरीनं. वहिनी साखर आणा आधी. आपली वैशू पसंत आहे त्यांना. आत्ताच नवऱ्या मुलाच्या काकाचा फोन आला होता. ” एवढं बोलून फोनकाकांचे डोळे वहायला लागले.

मला कळलंच नाही… ‘ एवढी मोठी माणसं आम्हा लहान मुलांसारखी, सारखी रडतात काय ?’

एकदा रात्री पावणेबारा वाजता आमचं दार वाजलं. बाहेर फोनकाका. मी जागा झालो.

हलक्या आवाजात बाबांशी काहीतरी बोलले. बाबांच्या डोळ्यात पाणी. फोनकाकांनी बाबांच्या हातात, एक खाकी पुडकं दिलं. आई तर रडायलाच लागली. फोनकाका बाबांना घेवून स्टॅन्डवर गेले. मी तसाच झोपलो.

दुसऱ्या दिवशी कळलं. गावाकडनं फोन आला होता. माझी आजी सिरीयस होती. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायचं होतं. फोनकाकांनी दहा हजार रुपये आणून दिलेले. बाबा नको नको म्हणत होते.

फोनकाकांनी ऐकलंच नाही. फोनकाका म्हणजे, फोनबाप्पा वाटायचे आम्हाला.

हळूहळू आम्ही मोठे झालो. काॅलेजात जायला लागलो. एके दिवशी सकाळी फोनकाकांनी बोलावलं.

” कौत्या, ही पमा कोण ?” मी जीभ चावली.

” काल रात्री फोन आला होता तिचा. तुला मुद्दामहून बोलावलं नाही. तुझा बाप होता ना घरात. बस इथं फोनजवळ. साडेसातची वेळ दिलीय तिला. आवाजावरनं चांगली वाटत्येय पोर. बघ, काही जमतंय का ?”

आयुष्यात मी पहिल्यांदा लाजलो.

.. जमलं. पमाशीच जमलं माझं. आधी आमचे गुपचूप फोन. मग दोन्ही व्हीलन बापांची समजूत.

साखरपुडा… लग्न… हनीमूनला गेल्यानंतर घरी केलेला फोन… सगळी फोनकाकांची कृपा.

एवढंच काय, मृण्मयीचा जन्म झाल्याची बातमी सुद्धा पहिल्यांदा फोनकाकांनाच समजली.

मृण्मयीचा जन्म झाला त्याचवर्षी फोनकाकांच्या चिलूचं लग्न झालं. चिलूशिवाय जगणं फोनकाकांना फार जड गेलं.

याच काळात बिल्डींगीत फोनची संख्या वाढली. घरटी फोन आला. फोनकाकांचं काम संपलं.

आता तर… पंधरा वर्ष झाली बिल्डींग सोडून. मृण्मयी दहावी झाली यंदा. तिला काल नवीन सेलफोन घेवून दिला.

” बाबा, पहिला फोन मी तुला करणार. “.. गॅलरीतनं तिनं फोन लावला.

मी उचलला.

” नमस्कार, बोला…. ” एकदम जीभ चावली. कधी सवय लागली, कुणास ठाऊक ? एकदम फोनकाकांची आठवण आली.

‘ते काही नाही. उद्या रविवार आहे. भेटून येवू यात. सगळेच जाऊ यात… ‘

ठरलं तर.

फोनकाकांचा नंबर पाठ होताच. मी डायल केला. पलीकडनं कापरा आवाज आला.

” नमस्कार, बोला…. “

माझ्या डोळ्यातून पाणी.

‘ एवढी मोठी माणसं लहान मुलांसारखी रडतात कशी ? ‘

– – तेव्हा नव्हतं कळलं.

पण आता कळलं – – 

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments