श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “शिक्षा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
“अगं आई दार उघड जरा… बाहेर पाऊस कधीचा सुरू झालाय… संतत धार लागलीय जणू… बाहेरचं अंगण देखील ओलं ओलं झालयं… एकही कोरडी जागा शिल्लकच उरली नाही.. कि जिथं बसून पाऊस कधी थांबेल याची वाट पाहता येईल… इतका वेळ त्या डाॅली नि लिली माझ्या सोबत खेळत होत्या… त्या पाऊस जसा सुरू झाला तसा त्यांच्या आया नि मालकीण बायांनी त्यांना आपापल्या घरी उचलून घेऊन गेल्या… मलाही डाॅली नि लिली दोघी घरी चल म्हणत होत्या आणि पाऊस थांबल्या वर घरी जा असं सांगत होत्या… पण त्यांच्या मालकीण बाईंनी त्यांनाच तेव्हढं घेऊन गेल्या आणि मला बाहेरच्या बाहेर हुसकावून लावल्या… व्हॅगाबाॅंन्ड कुठला असं काहीसं मला पाहून पुटपुटल्या… कानपाडून नि तोंड खाली लावून त्यांच्या दारातून परत फिरलो.. डाॅली नि लिली घरातून बराच वेळ आपल्या आईशी आणि मालकिण बाईशी भुंकुन भुकुंन बेजार करून सोडत राहिल्या… पण ते त्या दोघींच्या बहिऱ्या कानाला ऐकू गेलंच नाही… मी बराचवेळ तू मला न्यायला येशील याची वाट पाहत बसलो… पण तुझा पत्ताच नाही… आणि हा पाऊस काही थांबायचं नाव घेईना… थोडावेळ तसाच बसलो.. पण वाढता वाढे पावसाचा तो जोराने अंग भिजायला लागलं आणि सुटलेल्या गार हवेने अंगात हुडहुडी भरू लागलीय… आणि तशी मला आता भुकही लागलीय… मग आई उघडना दारं लवकर आणि घे की गं घरात मला लवकर… “
“.. टाॅमी आज तुला घरात घेणारं नाही… समजलं.. तू दिवस दिवसभर नुसता उनाडक्या करत असतोस.. घरात किंवा आजुबाजूला मिनिटभर तुझं बुड टेकत नाहीस… सतत बाहेर बाहेर त्या टवळ्यांच्या नादाला लागून खेळत बसतोस… आता तू काही लहान नाहीस.. वयाच्या मानानं तुला चांगली जाणं आलेली आहे… तरीपण तू असा माणसा सारखा थिल्लर वागतोस… तुझा नुसता खायला कार नि भुईला भारच झालाय… अलिकडे तू कुणाचचं ऐकेनासं झाला आहेस.. असं माणसा सारखं मनमौजी आपल्याला राहून कसं चालेल… घरातल्याशीं आपण कसं नीट वागलं तरचं ते आपल्याला ठेवून घेतील कि नाही.. नाही तर घराबाहेर हाकलून दिल्यावर उकिरडे फुंकत जावे लागेल… आपण काही रस्तावरील भटक्या, बेवारशी कुत्र्याच्या गोत्रातले नाहीत… आपली घरंदाज जातीची उच्च भ्रू परंपरेच्या समाजातील आहोत.. हे तुला कितीतरी वेळा कानीकपाळी ओरडून सांगितलयं.. पण तू ते लक्षात घेत नाहीस… त्यात तुझे वडील आता आपल्यासोबत असत नाहीत. मी आणि तू दोघंच मायंलेकरं एकमेकांना असताना.. घरच्या मालकांनी आणि घरातल्या सगळ्या माणसांशी कसं प्रेमानं नि जीव लावुन राहायला पाहीजे.. मी तसं वागत राहिलेय म्हणून आपला दोघांचा इथं टिकावं लागलाय बरं… हे तू लक्षात घेत नाहीस… खरचं तुझं वागणं व्हॅगाबाॅंन्ड सारखंच आहे… अश्या तुझ्या वागण्याने एक दिवस आपल्या दोघांना एव्हढ्या चांगल्या आधाराचं प्रेमळ सहवासाला मुकावं लागेल असेच वाटतयं… मी तुला सांगून सांगून थकलेय… कधीतरी तुला चांगला धडा शिकवायचाच होता. तो आज हा दिवस उगवला.. दाराच्या मागेच मी बसलेय… घरातले सगळे ते दारं उघडून तुला आत घ्यायला गडबड करायला लागले तसे मी त्यांना तिथं बसून अटकाव करतेय… नको नको आज त्याला आत घेऊया नको… बसू दे त्याला बाहेर.. होऊ दे जरा भुकेने कासावीस नि गारठू दे चांगला थंडीने कुडकुडून.. पावसाने सगळा ओला कच्च चिखल झालाय. कि बसायला नि झोपायला देहाचं मुटकुळं करण्या इतकी जागा देखील मिळाली नाही कि मग कळेल घराची आणि माझ्यासकट घरातल्यांची किंमत.. आज त्याला हि कडक शिक्षा आहे.. त्याशिवाय काही तू वठणीवर यायचा नाहीस… आता तू कितीही दारावर पायाने खुसूखुसू केलास, गळा काढून विव्हळून भुंकत रडत भेकत राहिलास तरी मी काही तुला दारं उघडून आत घेणार नाही म्हणजे नाही… तुला काय वाटलं आपली आई करारी नसेल म्हणून… कळू दे तुला आज आपल्या आईकडे वात्सल्य आहे तितकचं करारीपणा देखील आहे… जसं प्रेम द्यावं तसं प्रेम घ्यावं.. फाजील लाड बिलकुल सहन करून घेतले जाणार नाहीत… अजून तुला आईचा खरा स्वभाव कळला नाही… आज तो तुला चांगला कळू दे… पुढच्या भवितव्यात तुला त्रास होऊ नये म्हणून आज तूला हा धडा शिकवणार आहे… “
“आई माझी चुक मला समजून आलीयं.. पुन्हा मी तसं वागणारं नाही.. तू सांगशील तसचं वागेन.. इथून पुढे तुला आणि घरच्यांना कुठलाच त्रास देणार नाही… पण झाली एव्हढी शिक्षा पुरे गं… आणि मला घरात. घे… “
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈