सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “चार नगरातले माझे विश्व – (आत्मचरित्र) लेखक : डॉ. जयंत नारळीकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक : चार नगरातले माझे विश्व 

लेखक : जयंत विष्णू नारळीकर

प्रकाशक : मौज प्रकाशन 

पृष्ठसंख्या : ५४६.

वास्तविक डॉ. जयंत नारळीकर हे वैज्ञानिक म्हणून, विशेषत: खगोलशास्त्रज्ञ म्हणून उल्लेखनीय अंत:राष्ट्रीय किर्तीचे संशोधक म्हणून तुम्हा आम्हा सर्वांनाच परिचित आहेत. परंतु त्यांच्या या आत्मकथनातून आपल्याला त्यांच्या विशेष व्यक्तीमत्वाची ओळख होत जाते…

चार नगरातील माझे विश्व… ही आकाशाशी नाते जडलेल्या पण पूर्णपणे धरणीवर असणार्‍या, साध्या सभ्य, सज्जन माणसाची यशोगाथा वाचताना, त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अनेकविध कप्पे, इतक्या सहजपणे उलगडत जातात कि मग, ही व्यक्ती दूरस्थ न राहता, एक वेगळेच नाते आपलेही त्यांच्याशी जुळून जाते.

चार नगरातले विश्व म्हणजे नारळीकरांच्या आयुष्यातले चार महत्वाचे टप्पे,..

नारळीकर मूळचे कुठले या अनुत्तरीत प्रश्नापासून या आत्मवृत्ताची सुरवात होते. पाटगाव हे त्यांचे मूळ गाव.

नारळीकरांच्या परसात आंब्याची झाडे होती. त्या झाडाला नारळाएव्हढे आंबे लागत म्हणून हे नारळीकर..

बनारस हे त्यांच्या शालेय शिक्षणाचे विश्व.

बी. एस्सी. पदवीप्राप्तीनंतर, ऊच्च शिक्षणासाठी, प्रचंड महत्वाकांक्षा मनात ठेउन केलेले केंब्रीजमधले पदार्पण हे दुसरे विश्व. रँग्लर किताब, टायसन, स्मिथ अॅडम्स, आणि इतर अनेक सर्वोच्च मानाचे पुरस्कार मिळवत.

खगोलशास्त्रातील सापेक्षतावाद, गुरुत्वाकर्षण, विश्वरचनातंत्र यामधे अलौकिक संशोधनाचे टप्पे गाठत, करीअरचा आलेख सदैव उंचावर ठेवत गेल्याचा काळ म्हणजे त्यांचे चौदा पंधरा वर्षाचे केंब्रीजमधले वास्तव्य.. यात त्यांनी वैयक्तिक स्वरुपात केलेली मनोरंजक प्रवास वर्णने आहेत. त्यांनी गाजवलेल्या अनेक वैज्ञानिक परिषदेचे सुरस तपशील आहेत. त्यांच्या संशोधनाविषयीचं लेखन उत्कंठावर्धक, रसपूर्ण आहे.

एका परिषदेत, एकदा एका इंग्लीश प्राध्यापकाने त्यांना व एका पाकिस्तानी विद्यार्थ्याला विचारले,

“भारताचे विभाजन झाले तेव्हां ज्या, हिंदु, मुस्लीम, शीखांच्या कत्तली झाल्या त्या भारताला किंवा पाकिस्तानला कां थांबवता आल्या नाहीत? “

तेव्हा नारळीकर ताबडतोब उत्तरले,

“विभाजन ब्रिटीशांनी घडवून आणले. ते अस्तित्वात येत असताना, कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याची जबाबदारी ब्रिटीश सत्तेने पार पाडली असती तर ही दुर्दैवी घटना घडलीच नसती… “

पाकिस्तानी विद्यार्थ्यानेही त्यांच्या या भाष्याला अनुमोदन दिले.

पंधरा सोळा वर्षाचं, अत्त्युच्च मानाचं, सोयीचं, अनेक वैज्ञानिक आवाहने पेलुन स्वत:ला जागतिक कीर्तिच्या

वैज्ञानिकांमधे आणि विज्ञान विश्वात सिध्द केल्यानंतर, भारतात परत येण्याविषयीच. त्यांचं मनोगत मनात कोरलं जातं. ते म्हणतात,

“माझ्या मनात परदेशवास्तव्याबद्दल एक उपरेपणाची भावना घर करत होती. सर्व छान असले तरी ही जागा माझी नाही. इथे मी पाहुणाच आहे. भारतात परतल्यावर विविध गोष्टींबद्दल करावी लागणारी तडजोड विचारात घेउनसुद्धा, तिथे मी आपल्या देशात, आपल्या माणसात असेन ही भावना वरचढ होती… “

१९७२ साली ते भारतात परतले. आणि टाटा इन्स्टीट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR)या मुंबईस्थित

वैज्ञानिक संस्थेत ते दाखल झाले. भारतसरकारने त्यांचे मनापासून आदराने स्वागत केले. हे तिसरे पर्व! !

आपल्या देशात वावरताना, आत्मविश्वास, आप्तस्वकीयांची जवळीक, होणारे कौतुक या जमेच्या गोष्टी आहेत. आणि याचेच भान त्यांनी राखले म्हणून ते जनसामान्यात लोकप्रिय झाले.

स्वाक्षरी मागणार्‍या विद्यार्थ्यांना ते सांगतात……

“स्वाक्षरी मागण्यापेक्षा तू मला पोस्टकार्ड पाठवून, विज्ञानातला तुला भेडसावणारा, एखादा प्रश्न विचार. मी त्याला उत्तर स्वाक्षरीसकट पाठवेन.. “

पुढे मराठी विज्ञान परिषदेने याच प्रश्नोत्तरावर एक लहानसे पुस्तक त्यांच्याकडून लिहून घेतले. पुस्तकाचे नाव

“पोस्ट कार्डातून विज्ञान”

याशिवाय अनेक विज्ञानकथांचाही उगम त्यांच्याकडून झाला व ती विज्ञानप्रेमी माणसांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल.

TIFR मधे ते सतरा वर्षे कार्यरत होते. तिथे त्यांनी मनात

ठरवलेल्या आशाआकांक्षा बहुतांशी पुर्‍या झाल्या.

सहवैज्ञानिकांशी त्यांचे सलोख्याचे सबंध राहिले. ते कधी अंतर्गत राजकारण, गटबाजी या भानगडीत पडले नाहीत. त्यांची प्रतिमा, एक साधा सज्जन माणूस.. “अशीच राहिली. आणि आजही ती तशीच आहे.

नेहरु तारांगण ची स्थापना ही एक उल्लेखनीय कामगिरी. करमणुकीतून लोकशिक्षण ही संकल्पना त्यामागे आहे.

TIFR मधे संचालकपदाच्या नेमणुकी बाबत मात्र त्यांच्यासोबत गलीच्छ राजकारण खेळले गेले. ते पद त्यांच्यासाठी डावलले गेले. तेव्हां त्यांना वेदनादायी धक्का बसला. याविषयी त्यांनी सारे पारदर्शीपणे या पुस्तकात लिहीले आहे, ते विलक्षण वाचनीय आहे.

पुण्यात आयुकासाठी(Inter university for astronomy and astrophysics) आलेले आमंत्रण

हे त्यांना त्यांच्या संशोधनात्मक तत्वांसाठी, संकल्पनेसाठी, वैज्ञानिक दृष्टीकोनासाठी

आव्हानात्मक वाटल्यामुळे त्यांनी TIFRआणि मुंबई सोडली. आयुकासाठी पुणे विद्यापीठात जागा मिळवून देण्यापासून ते नियमावली, पदांची नेमणूक, एक साचेबंद,

सर्वसमावेशक घटना बांधण्यापासूनचे सगळे योगदान

नारळीकरांचेच आहे. या चवथ्या पर्वाचा. पुस्तकवाचनातून येणारा हा अनुभवही आनंददायी आहे.

शैक्षणिक, व्यावसायिक, व्यावहारीक, तात्विक, सामाजिक, कौटुंबिक.. असामान्य बुद्धीमत्तेच्या या व्यक्तीने आपल्या लेखनातून या सर्व स्तरांवर त्यांचे असे स्वत:चे ठसे

उमटवले आहेत आणि ते आदर्शवत आहेत…

आज जयंत नारळीकर निवृत्तीच्या मार्गावर आहेत

मागे वळून पाहताना, ताई(आई), तात्यासाहेब(वडील जे केंब्रीजचेच स्कॉलर होते. रँग्लर हा किताब त्यांना मिळालेला होता)त्यांचे गुरु फ्रेड हाॅएल, साहित्यिक

एडवर्ड माॅर्गन फाॅस्टर आणि पत्नीचे काका बाळासाहेब राजवाडे ही त्यांची स्फूर्तीस्थाने आहेत, असे ते आवर्जून सांगतात.

एक प्रश्न त्यांना नेहमी विचारला जातो,

“तुमचा देवावर विश्वास आहे का? “

ते म्हणतात, “देव आणि विश्वास या संकल्पना व्यक्ती सापेक्ष आहेत. एका परम शक्तीने विश्व निर्माण केले,

त्या परमशक्तीला देव म्हणता येईल. “

वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे कुठलाही तर्क प्रत्यक्ष निरीक्षणाने पुष्टी मिळाल्याशिवाय बरोबर मानायचा नाही, आणि त्याचे स्थान टिकवण्यासाठी, वेळोवेळी येणार्‍या भाकीतांची तपासणी करुन मूळ तर्काचे खरेखोटेपण ठरवता येते. यालाच तर्कशुद्ध विचारसरणी म्हणतात.

हे पुस्तक वाचताना एका वैज्ञानिकाबरोबरच, एक तत्वचिंतक आपल्याला भेटतो. गूढतेतून, गहनतेतून, एक

सरळ सोपी प्रकाशवाट दाखवणारा…

खरोखरीच्या या भारतरत्नाला, या दिव्यत्वाच्या प्रचीतीला सदैव कर जुळलेले राहतील…..

आज त्यांच्या दु:खद निधनाची बातमी ऐकून मन बेचैन झाले. मृत्यू अटळ आहे पण आठवणी निरंतर असतात. “चार नगरातले माझे विश्व “या पुस्तकातून झालेली त्यांची ओळख आठवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देते..

परिचय –  सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments