सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “सर्वसाक्षी…” – लेखक : श्री पुरुषोत्तम रामदासी ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक : सर्वसाक्षी

लेखक : पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी.

प्रकाशक : मिलिंद राजाज्ञा.

प्रथम आवृत्ती :२०२५

पृष्ठे : २६८

माननीय पुरुषोत्तम रामदासी हे मराठी साहित्य क्षेत्रातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या दर्जेदार लेखनाचं गारुड नकळत वाचकांच्या मनावर आरुढ होतं. त्यांच्या कथांतून, कादंबरीतून नेहमीच जीवनापलीकडचं काहीतरी गूढ अनुभवायला मिळतं. त्यांनी रंगवलेली पात्रं, घटना, वातावरण हे जरी नेहमीचंच, सर्वसाधारणपणे ओळखीचं असं वरवर वाटलं तरी त्यातून उलगडणारं मानवी जीवन हे अनाकलनीय पण एक सखोल वास्तव दाखवणाऱ्या दिशेला अचूकपणे घेऊन जातं.

कादंबरी हा एक विशेष साहित्य प्रकार आहे. यात मूळ कथेचं एक मुख्य बीज असतं आणि हे बीज अंकुरताना हळूहळू त्यात अनेक वेगवेगळ्या स्वभावाची, निरनिराळ्या विचारांची, पद्धतीची पात्ररुपी रोपं फुलत असतात. प्रत्येक पात्राभोवती कुठलं ना कुठलं कथानक गुंफलेलं असतं. विविध पात्रांच्या नातेसंबंधांना घेऊन जाणाऱ्या या विविध छोट्या कथा मूळ कथानकाशी हळूहळू जुळत जातात आणि एक संपूर्ण कथानक पूर्ण होतं. सर्व पात्रांचा मूळ कथेशी काय संबंध असेल या उत्सुकतेपोटी वाचकांचे वाचन चालू राहतं. मनोमन वाचक सहजपणे अंदाज बांधतो. कधी तो अंदाज खरा ठरतो तर कधी त्यात होणार्‍या विस्मयकारी बदलाने थक्क व्हायला होते. कादंबरी कधी शोकांतिका तर कधी सुखांतिका असते तर कधी या दोन्ही मधलं एक धक्कादायक वास्तवही असू शकतं आणि या कथेशी वाचकाला खिळवून ठेवण्याची भूमिका फक्त आणि फक्त लेखकाचं लेखन कौशल्य, लेखन सामर्थ्य, शब्दांचा आणि विचारांचा ओघच करू शकतो. या सर्वांचा अनुभव प्राध्यापक पुरुषोत्तम रामदासी यांची नुकतीच प्रकाशित झालेली सर्वसाक्षी ही कादंबरी वाचताना येतो.

आदिनाथ गडकरी नावाच्या एका लेखकाची ही कथा आहे. या लेखकाचा मनातल्या मनात कालपुरुषाशी संवाद घडत असतो. काळाने उद्गारलेले शब्द त्याच्या कानात घुमतात. ” मी म्हणजे एक पळ. तुमच्या भाषेत एक क्षण. क्षणाक्षणाची अविरत, अखंड आणि चिरंतन साखळी म्हणजे मी. होय! मी काळ आहे. सर्वसाक्षी काळ! ”

इथूनच आदिनाथ गडकरी या लेखकाला झटकन एक प्रेरणा मिळते आणि हळूहळू त्याच्या जीवनपटाची कहाणी उलगडत जाते.

या कादंबरीत आदिनाथ गडकरी आणि उषा साबणे या दोन व्यक्तींच्या निस्सीम प्रेमाची कहाणी केंद्रस्थानी आहे आणि त्या अनुषंगाने रामराव बेळे, राघव, मंदा बेळे, अंजली, दिगंबर, अनु, केशव, सचिन, निरंजन अशी विविध पात्रे स्वतःची एक एक स्वतंत्र कथा घेऊनच या प्रपंचात समाविष्ट होतात.

मला कादंबरीची संपूर्ण कथा तुम्हाला सांगून तुमच्या वाचनाचा रसभंग करायचा नाही. मला फक्त ही कादंबरी वाचताना काय वाटले तेवढेच सांगायचे आहे.

या कादंबरीतल्या कुठल्याही पात्राभोवती कसलंही वलय नाही. समाजात वावरणारी, नेहमीच भेटणारी ही सारीच साधीसुधी माणसं आहेत. यांच्या जीवनात प्रेम आहे, शृंगार आहे, प्रेमातली फसवणूक आहे, शेजारी, बहीण- भाऊ, माय -लेकी यांच्या मधली नाती आहेत, समाजाने ठरवलेल्या नैतिक चौकटीबाहेरची अनैतिक कर्मं आहेत पण अशा कर्मांनाही अनैतिकतेच्या आवरणातून अलगद बाहेर आणण्याचे, त्यांची कारणमीमांसा देतानाचे शाब्दिक आणि वैचारिक कौशल्य लेखकाने या कादंबरीतून सुरेख पद्धतीने दाखवलं आहे.

आयुष्य म्हणजे ॲबिस आहे हे वाक्य वाचकाच्या मनावर खोल परिणाम करतं. आयुष्याला दिलेली ही कृष्णविवराची, कृष्णदरीची कल्पनाच खूप भिडणारी आहे. वास्तविक “ काळाच्या उदरात दडलंय काय” असा विचार करताना कादंबरीतल्या या एकेका पात्राच्या जीवन डोहात खोलवर जाऊन बघण्याचा लेखकाचा प्रयत्न खरोखरच अलौकिक आहे.

मी कादंबरी अक्षरशः झपाटल्यासारखी एका बैठकीत वाचली. सुरुवातीला वाचताना मला एखादी मसालेदार चित्रफीत पहात आहोत असंच वाटलं कारण यात विवाहबाह्य संबंध आहेत, स्पष्ट संवाद आहेत, भडक नसले तरी अश्लीलता टाळून केलेली शृंगारिक वर्णनं आहेत आणि तरीसुद्धा कथेतला एक सुंदर, कोमल, मनाची घालमेल करणारा प्रेमाचा रेशीम धागाही आहे.

रामराव आणि मंदा यांचे पती पत्नी पलीकडचे वेगळेच नाते, राघवचे नपुंसकत्व, सचिनचा मानसिक पिसाटपणा, सचिन आणि राघव मध्ये अडकलेल्या अंजूची व्यथा… या सर्वांबद्दल वाचकाच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. एक सुंदर रहस्यमयता या कादंबरीत आहे आणि समोर पसरलेल्या विविध पात्ररूपी सुमनांची माळ आपल्यापुढे हळूहळू सहजपणे गुंफत जाते. या पात्रांशी वाचकाचं नकळत नातं जडतं आणि कादंबरीच्या शेवटी सारी नाती एक वेगळाच धडा देत अचंबित करतात. आयुष्याची एक संपूर्ण अनाकलनीय बाजू दाखवतात. लेखकाच्या भाषेत सांगायचं तर “अनाकलनीय घटनांच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या वाळक्या पानासारखं वहावं लागतं. कर्तुम अकर्तुम अज्ञात शक्तीविषयीचं हेअज्ञान की वंचना?” असं काहीसं वाटत राहतं.

या कादंबरीचे वैशिष्ट्य असं आहे की यात अवास्तव योगायोग नाहीत, गिमिक्स नाहीत, मेलोड्रामा नाही. लेखकाने पात्रांची निर्मिती केली पण त्यांना त्यांच्या प्रवाहात स्वतंत्रपणे लोटून देत त्यांच्याभोवती घडणाऱ्या घटनांबद्दल सहजपणे, सुंदर शब्दशैलीत भाष्य केले. त्यामुळे या कादंबरीत कुठलीही कृत्रिमता जाणवत नाही. ओढूनताणून केलेलं लेखन वाटत नाही. सहज, प्रवाही आणि परिपक्व असं हे लेखन आहे. प्रसंगानुरूप संवाद, भाषेचा साज चढवत सारं काही खुलत जातं आणि दूरस्थपणे वाचक या संपूर्ण कालचक्राचा एक भाग बनून जातो.

कादंबरीच्या सुरुवातीला काळ बोलत असतो आणि शेवट ही काळाच्या वक्तव्यानेच होतो. काळाच्या साक्षीने सारं काही घडत असतं म्हणून काळच सर्वसाक्षी.

अशी ही प्रा. पुरुषोत्तम रामदासी यांची जीवनावरची सखोल, अभ्यासात्मक, काहीशी अध्यात्मिकतेकडे झुकणारी कादंबरी सर्वांनी जरूर वाचावी अशीच..

या सुंदर लेखनासाठी मा. रामदासी सरांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

परिचय –  सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments