सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “लिहिते मी…” – (आत्मकथन) – लेखिका : डॉ. जयश्री फिरोदिया ☆ परिचय – सुश्री सौ राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक परिचय

पुस्तक : लिहिते मी… (आत्मकथन)

लेखिका : डॉक्टर सौ. जयश्री फिरोदिया.

पृष्ठे:१४४

नुकतेच प्रकाशित झालेले डॉक्टर जयश्री फिरोदिया पुणे. यांचे लिहिते मी हे आत्मवृत्त वाचले आणि त्यांच्या संपूर्ण रसभरीत, चैतन्यमय, प्रेरणादायी जीवन पटाने मी अत्यंत प्रभावित झाले.

वास्तविक मूळचे नगरचे आणि पुणे येथे स्थायिक झालेले उद्योजक फिरोदिया कुटुंब हे ख्यातनामच आहे आणि डॉक्टर अरुण फिरोदिया या नामांकित उद्योजकाची पत्नी जयश्री फिरोदिया आणि त्यांनी लिहिलेले हे आत्मवृत्त.

सुरुवातीला हे पुस्तक वाचायला घेताना मनात बरेच गृहीत असे विचार होतेच. म्हणजे एका सुखी गर्भश्रीमंत महिलेची ही एक आनंदयात्रा असणार पण जसजसे मी ते पुस्तक वाचत गेले तसतशी लेखिकेच्या या लेखनातून एक अत्यंत साधी, मध्यमवर्गीय कुटुंबातील, बाळबोध संस्कृतीत वाढलेली, नीतिमूल्य जपणारी, अभिरुची संपन्न अशी अत्यंत तेज बुद्धीची, सामाजिक बांधिलकी असणारी, दुसऱ्यांच्या सुखदुःखाशी सहजपणे समरस होणारी, स्वतःचे वैद्यकीय ज्ञान समाज स्वास्थ्यासाठी समर्पित करणारी आणि प्रसिद्ध उद्योगपतीची पत्नी म्हणून त्यांच्याही विश्वव्यापी कारभारात समंजसपणे सहभागी होणारी एक अत्यंत आदर्श व्यक्ती उलगडत जाते.

डॉक्टर जयश्री फिरोदिया यांनी त्यांचं हे आत्मवृत्त २४ भागात लिहिले आहे.

प्रीतीची अनमोल भेट म्हणून पतीकडून मिळालेल्या अनोख्या भेटीने त्या भारावून जातात. महाबळेश्वर येथे डॉक्टर जयश्री फिरोदिया पॉईंट स्थापित होतो आणि अशी ही निसर्गरम्य भेट स्वीकारताना त्या किती भावनावश होतात हे सांगत त्या त्यांच्या आत्मवृत्ताची सुरुवात करतात. पहिल्याच प्रकरणात एका सुरेख सहजीवनाची ओळख होते.

ठाण्याच्या जयश्री पाठक या मध्यमवर्गीय ब्राह्मण कन्येचा जैन राजस्थानी अरुण फिरोदियाशी झालेल्या प्रेमविवाहाची आणि त्यांच्या असाधारण सुरेख, प्रेममय, विश्वासपूर्ण सहजीवनाची ही कहाणी वाचताना मन अगदी रमून जाते.

जब वी मेट या प्रकरणात लेखिकेने फार हळुवारपणे त्यांचं हे प्रीतीचं गुपित उलगडलेलं आहे. चुपके चुपके प्रेम करण्याचा तो काळ होता. प्रेमिकांच्या मनात बुजुर्गांविषयी भय त्यावेळी असायचं. प्रेम व्यक्त करण्याची माध्यमे त्यावेळी प्रभावी नव्हती. अशा काळातलं त्यांचं जवळजवळ पाच-सहा वर्षाचं डेटिंग वाचताना वाचकाच्या मनावर हळुवार मोरपीस फिरत रहातं पण तरीही वाचताना जाणवतात ती दोघांचीही सुसंस्कारी मने. उमलत्या वयातल्या प्रेम पण उतावळेपणा नव्हता. गांभीर्याने, कर्तव्य बुद्धीने केलेला एक विचार होता, एक निर्णय होता आणि म्हणूनच त्यांचं हे साठ वर्षांचं सहजीवन अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी झालं.

लिहिता लिहिता जयश्रीताई जागोजाग पुढच्या पिढीसाठी संदेश देत राहतात आणि ते अनमोल आहेत.

सरस्वती आणि लक्ष्मी यांचा सुरेख संगम जयश्री आणि अरुण यांच्या बहारदार सहजीवनात आढळून येतो. फिरोदिया परिवार म्हणजे पिढीजात गांधीवादी, देशप्रेमी, स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगवास भोगलेला, समाजाभिमुख कार्य करणारा. या पार्श्वभूमीचा परिणाम अथवा संस्कार जयश्रीच्या जीवनावर होतोच आणि मुळातच नीती मूल्य वैचारिक तत्वं बाळगणाऱ्या जयश्रीच्याही जीवनाला एक समाजदर्शी दिशा मिळत जाते आणि त्याचा संपूर्ण वृत्तांत या पुस्तकात त्यांनी अत्यंत अभिमानाने पण सहजतेने आणि प्रामाणिकपणे मांडला आहे.

एक स्त्री ही चौफेर अंगाने किती आदर्शवत असू शकते याचा सुरेख वस्तुपाठ म्हणजेच हे पुस्तक, लिहिते मी. 

या पुस्तकात बोर्डात पहिली येणारी शालेय विद्यार्थिनी आहे, एक प्रेयसी आहे, लग्नानंतर जात- धर्म- संस्कृती रिती -भाती यांची तात्विक बैठक जाणणारी पालनकर्ती आहे. सासर, माहेरची सर्व नाती आयुष्यभर जपणारी एक कौटुंबिक गृहिणी आहे. चारही मुलांचं जातीने संगोपन करणारी, त्यांच्यात सद्गुणांचं भरणपोषण करणारी एक आई आहे, जाणीवपूर्वक आणि अभ्यासपूर्ण जगभर प्रवास करणारी एक प्रवासिनी आहे, एक मनमिळाऊ मैत्रीण आहे, या सर्वांवर कडी म्हणजे एक उत्तम सामाजिक जाण ठेवून कार्यरत असणारी कर्तव्यनिष्ठ डॉक्टर आहे आणि आयुष्याच्या संध्याकाळी मनस्वीपणे छंद जोपासणारी चित्रकार, गायिका, नृत्यांगनाही आहे. लिहिते मी या पुस्तकात दिसते ती अशी सहस्त्ररश्मी, तेज:पुंज, निर्मळ, प्रेमळ आणि तितकीच करारी स्त्री. यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. म्हणून मला हे पुस्तक फार आवडले. ही एका गर्भश्रीमंत, ब्रॅण्डेड गाडीतून फिरणाऱ्या, महालासदृश घरात आरामात राहणाऱ्या, नवऱ्याच्या पैशावर केवळ मौजमजा करणाऱ्या, त्याच्या नावाच्या वलयात जगणाऱ्या, जगभर सुखैनेव प्रवास करणाऱ्या, निव्वळ आरामात आयुष्य व्यतीत करणाऱ्या स्त्रीची मनोरंजनात्मक कहाणी नसून ही एका कर्तव्य कठोर, स्वतःच अस्तित्व जपणाऱ्या, समाजासाठी, देशासाठी, रंजल्या गांजल्यांसाठी, पीडित -पतितांसाठी तसेच गुणपारखी, इतरांच्या कलागुणांना मनापासून दाद आणि स्फूर्ती देणाऱ्या सक्षम, सकारात्मक, स्फूर्तीदायी स्त्रीची ही कथा आहे. यात डॉं जयश्री फिरोदिया पाॅईंट महाबळेश्वर ते डॉ. जयश्री फिरोदिया फीटल मेडीसीन सेंटर दीनानाथ मंगेशकर हॉस्पीटल पुणे पर्यंतचा लक्षवेधी जीवनप्रवास आहे.

हे संपूर्ण पुस्तक जितकं शब्दमय आहे तितकंच चित्रमय आहे. वाचताना आणि पाहताना लेखिकेची कलात्मकता, निसर्गप्रेम, रसिकता पावलोपावली जाणवते. या पुस्तकात एक हळूच लपलेली जीवनविषयीची काव्यात्मकताही जाणवते. सदैव मशिनरीच्या रुक्ष वातावरणात अरुण फिरोदिया नावाचा एक हळुवार संवेदनशील कवी यात अनुभवायला मिळतो.

या वाचनीय पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातला साधेपणा, शब्दातला प्रामाणिकपणा. कसलाही बडेजाव, बढाईसदृश अविर्भाव नाही. आपण सारे एक ही भावना देणारे हे पुस्तक आहे. पुस्तकचा समारोप करताना डॉ. जयश्री फिरोदिया सहजपणे, विश्वात घडणाऱ्या मानवी संहाराविषयी सखेद भाष्य करतात. ढळणार्‍या मानवतावादाविषयी त्या चिंता व्यक्त करतात आणि याही पार्श्वभूमीवर आपला भारत देश सुजलाम सुफलाम आणि निरामय, शांततापूर्ण, समृद्ध, विकसित देश असावा अशी मनोकामना व्यक्त करतात.

डॉक्टर जब्बार पटेल यांची सुरेख प्रस्तावना लाभलेलं हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे. डॉ. जब्बार पटेल म्हणतात त्याप्रमाणे खरोखरच ही एक परीकथा आहे.

आणि जाता जाता एक.. लिहिते मी या पुस्तकाद्वारे वाचकांनीही लिहिण्याची प्रेरणा घ्यावी.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी

राधिकाताई,
तुमच्या परीक्षणातून मूळ पुस्तक वाचल्याचा प्रत्यय येतो. छान लिहिलंय. अभिनंदन. यापुढेही अशाच प्रकारे नवनवीन पुस्तकांवर लिहित्या राहा. शुभेच्छा.

धन्यवाद सर!!