श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “अर्थात” -लेखक : श्री अच्युत गोडबोले ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : अर्थात
लेखक – श्री. अच्युत गाेडबाेले
प्रकाशक : बुकगंगा
पृष्ठ: ५४४
मूल्य: ४९९₹
हे पुस्तक एकाच वेळी अनेक पातळ्यांवर रचलेलं आहे. एका पातळीवर इथे आधुनिक अर्थशास्त्राची तत्त्वं अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितली आहेत.
दुसऱ्या पातळीवर हा चक्क एक सामाजिक इतिहास आहे. म्हणजे अगदी पुराणकाळापासून, मध्ययुगातल्या सरंजामशाहीपासून, भांडवलशाहीच्या उगमापर्यंत आणि अगदी २००० सालाच्या दुसऱ्या दशकाच्या शेवटापर्यंतच्या काळाचा हा अर्थशास्त्रीय इतिहास आहे. पैसा कसा सुरू झाला, बँकिंग, कंपन्या, स्टॉक एक्स्चेंजेस वगैरेही कशा सुरू झाल्या हे सगळं यात आहे.
तिसऱ्या पातळीवर यात अर्थशास्त्रज्ञांची अतिशय विस्मयकारक चरित्रंही वाचायला मिळतील.
यात अर्थशास्त्रातल्या वेगवेगळ्या विचारसरणींची आणि त्यांच्यातल्या वादांविषयीचीही खोलवर चर्चा आहे आणि त्यातलं काय बरोबर आणि काय चूक आहे त्याचा निर्णय वाचकांवर सोडलेला आहे.
या पुस्तकाच्या सुरुवातीला अर्थशास्त्राच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेतलाय आणि नंतर ‘अर्थशास्त्राचा गाभा’ या विभागात अर्थशास्त्राची तत्त्वं अगदी सोप्या शब्दांत सांगितली आहेत.
त्यानंतर अर्थशास्त्राचा इतिहास पाच भागांत सांगितलाय. शेवटचा विभाग आजच्या प्रश्नांसाठी राखून ठेवलाय.
या पुस्तकामुळे निदान काही वाचकांना तरी अर्थशास्त्राचा जास्त खोलवर अभ्यास करावा असं वाटलं, त्यातलं चैतन्य जाणवलं, त्यात जगाला दिपवून टाकेल असं संशोधन करावंसं वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातले महत्त्वाचे प्रश्न आपले आहेत असं वाटून ते सोडवावेसे वाटले तरी या लिखाणाचं चीज होईल.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈