सौ राधिका भांडारकर

 

? जीवनरंग ❤️

☆ कोनाडा… भाग 4 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

पपांची आणि जीजीची भांडणं व्हायचीच.

कधीकधी तर दोघेही मागे हटायचे नाहीत.

आपला मुलगा आपल्याला बोलतो याचं तिला खूप दु:खं होत असलं पाहिजे, आणि आम्हीही तिची बाजू उचलून धरायचे नाही. मग ती पिळवटून म्हणायची,

“जाते रे बाबा, मी आता देवळात. . बसते तिथे जाऊन.  आता या घरात माझी गरज नाही ऊरली. “

आणि ती खरंच जायची कुठेतरी. भांडण संपायचं. पण घरातलं वातावरण गढुळ व्हायचं. जीजीला आमच्याशिवाय कुणीच नव्हतं. ती जाणार तरी कुठे होती. . ?

त्यादिवशी दिवसभर शाळेत उदास वाटायचं. . मन हळहळायचं. . उगीच बोलतात पपा तिला. . पपांची तत्वं कठोर. . न पटणारं काहीही ते कधीच करायचे नाहीत. . .

जीजीनं तरी कशाला अट्टाहास करावा. . जाऊ द्यावं ना. . काय करायचं आता आपण. . . ?

पण शाळेतून घरी आल्यावर , मधल्या खोलीत जीजी पांघरुण घेऊन झोपलेली असायची. .

रात्री सगळे झोपले की मी हळुच तिच्या जवळ जायची. ती जागीच असायची.  मग डोळ्यात पाणी आणून मला जवळ घेत म्हणायची,

“मला एखादी तरी मुलगी हवी होती. . . मुलीची माया वेगळी असते!!”

खरं सांगू तेव्हां तिच्या जखमा आम्हाला दिसल्याच नाहीत. . .

त्याही वेळी तिने मला लपेटून घेत म्हटलं होतं. .

“तू जेवलीस ना? फडताळ्यात तुझ्यासाठी तळलेली सुरमई ठेवली होती. . आईनं तुला वाढली कां. ?”

किती विलक्षण प्रेमाचं नातं हे!याची जात कुठली?याचा रंग कुठला?या ओबडधोबडपणातही गुलाबपाण्याचा स्पर्श होता. जीवनातली ती शीतलता होती. . .

ती आजारी पडायची. इतकी आजारी पडायची की आम्हाला वाटायचं आता ती यातून वाचणार नाही.  पपा तिचे हात पाय दाबायचे. आणि त्यांच्या टपोर्‍या डोळ्यांतून अश्रु गळायचे.

एका मे महिन्यात आमची काश्मीरची सहल ठरली होती. आणि नेमकी जीजी आजारी  पडली. खूपच आजारी होती ती. . आता सहल कॅन्सलच. . . पण ती डाॅक्टरना सांगत

होती,

“डाॅक्टर , या वेळेस कसंही करुन मला बरं करा. . नाहीतर माझ्या नातींचा हिरमोड होईल. . . त्यांची काश्मीर सहल सुखरुप पार पडू देत. . मग माझं काही होऊ देत. . . “

डाॅक्टर हसायचे. त्यांना जीजीची चमत्कारिक प्रकृती माहीत होती. . ते म्हणायचे,

“आजी तुम्ही आज आजारी आहात. . . पण उद्या ओकांच्या घरी जाऊन जास्वंदीची फुलं आणाल. . . . “

जीजी मला म्हणाली होती. . “हे बघ!माझं काही बरं वाईट झालं तरी तुम्ही सहलीला  जाच बरं!माझं काय मेलं महत्व?मी म्हातारी. . कधीतरी मरणारच. . पण तुम्ही जा. . इतके पैसे भरलेत. . हौस केलीय् . . जाच बरं!

लोक काय म्हणतील याचा विचार नका करु?”. . . . . .

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments