सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ सोनं -भाग दुसरा ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(मुलगी झाली तर घरात घेणार नाही – सासूच्या या धमकीने हताश झालेली सुमा परसात बसून रडत असे ……)

अशीच एक दिवस रडत बसली असताना तिला शोधत शोधत शरद परसात आला.

“आलात तुम्ही? थांबा. चहा करते.”

“थांब, थांब. तुला एक चांगली बातमी सांगायची आहे.”

‘आपल्या आयुष्यात… आणि चांगली बातमी येणार!’ सुमाच्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही.

“अगं, माझी बदली झालीय. थोडा पगारही वाढेल.”

“म्हणजे? तुम्ही मला सोडून जाणार? मी एकटीच राहू इकडे?”

“वेडी की काय तू! तुला घेऊनच जाणार मी.मावशीच्या शहरातच आहे माझं ऑफिस. मी तिला फोन करून कळवलं. ती म्हणाली, ‘सुरुवातीला माझ्याकडे उतरा. मी घर शोधून ठेवते. तुमचा संसार मांडून देते. मग तिथे राहायला जा.’ चालेल ना?”

सुमा काय बोलणार!मावशी म्हणजे तीन मुलींना सोन्याने मढवून त्यांची पाठवणी करणारी. म्हणजे आपण आगीतून उठून फोफाट्यात पडणार.

घरात कोणाला वाईट वाटण्याचा प्रश्नच नव्हता. ही चाललीयत, म्हटल्यावर सासूने थोडी भांडीकुंडी, धान्यं -कडधान्यं वगैरे दिली.

मावशींनी आनंदाने, मायेने त्यांचं स्वागत केलं. सुमाला अगदी भरून आलं. तिचे भरलेले डोळे बघून मावशींनी तिला जवळ घेतलं, “माहेरची आठवण झाली? अशा दिवसांत मन हळवं होतं, बाळा. तुला काही खावंसं वाटलं, तर सांग मला. मी करून देईन तुला.”

आणि नेमकी सुमाला मुलगीच झाली. हा सोन्याचा विषय तिच्या डोक्यात एवढा मुरला होता, की मुलीचं नाव तिने ‘कनक’ ठेवलं.

महिनाभर माहेरी राहून ती मुलीला घेऊन आपल्या घरी परतली.सासरचं कोणी ना बाळाला बघायला आलं, ना त्यांनी काही भेट पाठवली.

‘जाऊदे. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे आपलं हक्काचं घर तर आहे आता. पण आपल्यावर जी वेळ आली ती आपल्या लेकीवर यायला नको.’

मग एक दिवस धीर करून सुमाने मावशींकडे विषय काढला, “तुम्ही तीन मुलींना सोन्याने कसं काय मढवलं? तेही काकांच्या एकट्यांच्याच पगारात?”

“अगं, काही नाही. मोठी नंदा झाल्यापासून मी दर महिन्याला थोडंथोडं सोनं घ्यायला सुरुवात केली. हे अख्खा पगार माझ्या हातात ठेवायचे. मग मी शक्य तिथे काटकसर करायचे. वाचलेल्या पैशांचं सोनं घ्यायचे. मग मंदा झाली. पुढे चंदा. पण माझा नेम चालूच होता. कपड्याबिपड्यांवर पैसे उधळायचे नाही मी. पाठोपाठच्या मुली असल्यामुळे मोठीचे कपडे धाकटीला व्हायचे. असं करतकरत तिघींसाठीही भरपूर सोनं जमलं. मग लग्नाच्या खर्चासाठी पैसे जमवायला सुरुवात केली.”

क्रमशः….

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments