सौ. शशी नाईक-नाडकर्णी 

☆ विविधा ☆ पूर्णांक ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

फेब्रुवारी महिना उजाडला. 29फेब्रुवारीला 40वर्षे सर्व्हिस करून मी बँकेतून  निवृत्त होणार होतो,  म्हणून मी माझ्या रजा  संपवत होतो.आम्ही दोघेच इकडे. मी आणि सौ. दोन वर्षांपूर्वी माझ्या  मातोश्रीचं निधन झालं.  मुलगा आणि सून अमेरिकेत. सून  पहीलटकरीण.तिचे दिवस भरत आले होते. मार्च मध्ये ड्यू होती.आमच्या सौभाग्यवती शेवटच्या आठवड्यात  तिकडे जाणार होत्या. आणि निवृत्ती नंतरची कामे आटपून मी एक महिन्याने जाणार होतो.

म्हटलं, चला रजा घेतली आहे, तर  व्यवहारी अपूर्णांकाचा पूर्णांक करु या. व्यवहारी अपूर्णांक मी मजेने सौ.ला ठेवलेले नाव आहे.कोणत्या तरी दिवाळी अंकात वाचनात आलेलं, मला आवडलेलं  नाव.खरं म्हणजे ती  सुशिक्षित, हुशार. एक तारखेला तिच्या हातात ठराविक रक्कम ठेवली,  की  माझी जबाबदारी संपली.सगळं कसं व्यवस्थित आखणार आणि पार पाडणार.आला-गेला,पै-पाहुणा, सणवार, औषधपाणी.मला काही बघायला लागत नाही.पण बाईसाहेब कधी मोठ्या व्यवहारात  लक्ष म्हणून घालणार नाहीत.डिपाॅझिट्स,एल.आय्.सी,गावच्या जमिनीचे व्यवहार…..ती  अजिबात बघायची  नाही.”मला काय करायचंय तुम्ही आहात ना खंबीर.”म्हणून मी तिला व्यवहारी अपूर्णांक म्हणायचो.

आज तिला बसवलं. माझी डायरी दाखवली. समजावून सांगितलं. म्हटलं, “तो जाऊन तिकडे अमेरिकेत  बसला आहे. त्याला ह्यात काही रस नाही; पण तुला माहीत असायला पाहिजे. कोणी उद्या तुला  फसवायला नको.”  तिने देखल्या देवा दंडवत केलं.

चला. सौ. ठरल्याप्रमाणे अमेरिकेला गेली. जाताना दक्ष गृहिणीप्रमाणे माझी सोय करून गेली.

“लोणचे, मुरांबा, चटण्या…. बघून ठेवा हो. लक्ष द्या हो. एखाद्या दिवशी मंगल (स्वयंपाकीणबाई) नाही आली तर पंचाईत नको”.

“अगदी मंगल नाही आली तर सुमन (कामवाली) आहे की ती करुन देईल आणि अगदी दोघीही नाहीच आल्या, तर मुंबई आहे ही. हाॅटेल्सची काय कमी? मी काही उपाशी मरणार नाही. तू अजिबात माझी काळजी करू नकोस”. कारण मला चहा व्यतिरिक्त काही येत नव्हतं, हे तिला माहीत होतं. खरं तर, हे तिचं दुःख होतं. जेव्हा जेव्हा ती मला स्वयंपाकातलं काही शिकवायला जायची, तेव्हा तेव्हा आमच्या मातोश्रीचं लेक्चर ऐकून गप्प बसायची, “आमच्याकडे नाही हो पुरुषांना सवय स्वयंपाकाची. अशोक काय बँक  सोडून तुला स्वयंपाकात मदत करत बसणार? ती बायकांची कामं. ” बिचारी गप्प बसायची. माझ्यातला पुरुष सुखावायचा तेव्हा. पण सौ. ने आमच्या  चिरंजीवाला मात्र हळूहळू जरुरीपुरता  स्वयंपाक शिकवला. म्हणून तर तिकडे त्याचं  आज काही अडत नाही.

झालं. सौ. तिकडे गेली. इकडे मी निवृत्त झालो.आता मज्जाच मज्जा. खूप मोकळा वेळ. आरामात उठायचं, मंगलच्या हातचा गरमागरम नाश्ता  खायचा, पेपर वाचन, देवपूजा, खाली फेरफटका, टीव्ही बघणं, जेवणं, दुपारी आराम, मधल्या वेळात बँकेची  कामं, मित्र मंडळी, फोन. मस्त दिवस जात होते. काॅलेज लाईफ परत  जगत होतो. नो टेन्शन, नो घाई गडबड.

माझं हे सुख फार दिवस नाही  टिकलं आणि तो दिवस उजाडला. लाॅकडाऊन.  सोसायटीच्या  समितीने निर्णय घेतला. कामवाली बाई बंद. फोन करून बाहेरुन मागवावे तर हाॅटेल्स बंद. आजूबाजूला कोणाशी माझे विशेष संबंध नाहीत. आता आली का अडचण?

सौ. ला अपूर्णांक म्हणून मिरवणारा मी.

आईचे लाड आणि तिने सौ. ला दिलेलं  लेक्चर,यांनी हुरळून गेलेलो मी…सारं आठवलं, डोळ्यांसमोर उभं  राहिलं.

मग दूध, साखर, पोहे खाल्ले. चला, नाश्ता तर झाला. मग नेहमीच्या वाण्याला फोन केला. ब्रेड मागवला. दुपारी जेवणाला  ब्रेड जाम खाल्ला. रात्री दूध ब्रेड. दुस-या दिवशी खाकरा लोणच्यावर दिवस भागवला. पण हे असं किती दिवस चालणार? मग संशोधनाला सुरुवात. कपाटातून सौ. ची अन्नपूर्णा, रुचिरा बाहेर काढली. पण मला  फोडणीच काय, साधा कांदा कसा  चिरायचा, हेपण  माहीत नाही. मग वरण, भात, तूपपासून सुरवात  केली.  हळूहळू मटार सोल,फ्लाॅवर तोड, ते  फोडणीला घाल. मीठ मिरची पावडर, हाताला येतील ते एव्हरेस्ट् मसाले घाल आणि छोट्या कुकरात शिजव. कधी यूट्यूबचा आधार घे,  तर कधी सौ. ला व्हीडीओ काॅल करून विचार. तेही वेळी-अवेळी. कारण दोघांची घड्याळे वेगळी.मी विचारायचो तेव्हा  सौ.अर्धवट झोपेत.

कधी पिठात पाणी जास्त,तर कधी कुकर करपायचा.पण मग नेटाने त्याच्या मागे पडलो. हळूहळू रडतखडत मला जमू लागलं. पदार्थाचे फोटो सौ. ला पाठवायला लागलो.  आणि चार महिन्यांत स्वतः अपूर्णांकाचा पूर्णांक  झालो. स्वयंपाक, भांडी घासणे, लादी पुसण्यापर्यंत सगळ्यात एक्सपर्ट झालो.

आता इतका एक्सपर्ट झालो,  की  नवीन मुलामुलींना व्यवस्थित मार्गदर्शन करून तयार करीन. त्यांना आणि त्यांच्या पालकांना बजावून सांगेन की  प्रत्येकाला बाकीच्या गोष्टींबरोबर जरूरीपुरता तरी स्वयंपाक बनवता आलाच पाहिजे. मग तो मुलगा असो वा मुलगी. कितीही नोकरचाकर ठेवण्याची ऐपत असली, तरीही स्वयंपाक येत नसेल तर ती व्यक्ती  अपूर्णांकच.

 

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments