सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मनमंजुषेतून ☆ भरली वांगी – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

??  ? ??

“हॅलो सुमा, सुशी बोलतेय. मगाचपासून   फोन करतेय तर एंगेज्ड् लागतोय.”

“अगं,नागपूरहून ताईची मृणाल गप्पा मारीत होती. ती मधेच म्हणाली ‘मावशी,आता किती वर्ष झाली तुझ्या लग्नाला?’ 50 होतील म्हटल्यावर ‘अभिनंदन, अभिनंदन’ म्हणायला लागली. तर मी म्हटलं, त्यात कसलं अभिनंदन ?आमच्या वेळी घटस्फोटाची पद्धत नव्हती ना, म्हणून झाली पन्नास वर्ष”

“हा हा हा ! काय ग बाई बोलणं  तुझं सुमे!”

“गंमत केली जरा. पण पेपरातून डोकं वर उचलून यांनीही रोखून बघितलं माझ्याकडे चष्म्यातून. संसारातल्या बारीकसारीक गोष्टी टोकाला न्यायच्या नसतात हे या नवीन मुलींच्या कानावर असलेलं बरं ! तू का फोन करीत होतीस?”

“तुझ्याकडे भरल्या वांग्यासाठीचा गरम मसाला आहे ना, तो थोडा तुझ्याकडच्या  कुंदा बरोबर पाठवून दे ना!”

“पाठवते. पण चार दिवसांपूर्वी भेटली होतीस तेव्हा म्हणालीस की भरल्या वांग्यासाठी ताजा मसाला करून ठेवलाय म्हणून.”

“केलाय गं, पण तोच मेला सापडत नाहीये. फ्रीज उघडला तर छोले, सांबार, गावरान, मालवणी, चायनीज कसल्या कसल्या मसाल्यांच्या बाटल्या इकडून तिकडून हसताहेत मला. पण माझा भरल्या  वांग्यांचा मसाला कुठे सापडत नाहीये. ”

“सुमेधाने कुठे उचलून ठेवलाय का विचारलस का?”

“ती घरात कुठाय? राकेशला मराठीच्या क्लासला घेऊन गेलीय आणि तिथून……..”

“काय ?मराठीचा क्लास? रविवारचा ? दुसरीतल्या मुलाला?”

“काय करणार? तुला माहितीये हा धाकटा नातू मोठ्या सुरेश सारखा शांत, समंजस नाहीये. अर्क आहे अगदी अर्क. एकसारखा इंग्लिश मधून बोलतो. म्हणून त्याला म्हंटलं ‘अरे, घरात तरी मराठी बोलावं. आपली मातृभाषा आहे ती. तर म्हणाला, “ममा स्पीक्स  इन इंग्लिश. सो व्हॉट इज माय मदरटंग?” असली घोड्याच्या पुढे धावणारी अक्कल! वर्गात टीचरने ‘गाय’ या विषयावर दहा ओळी लिहायला सांगितल्या तर याने काय लिहावं ? “अमेरिकेत मुलांना ‘गाय’ असं हाक मारतात. भारतात गाय हा चार पायांचा प्राणी आहे. ती गवत खाते. ती दूध देते. पण आम्ही चितळ्यांचे दूध पितो.”

“हा हा हा”

“ऐक पुढे….गाईच्या शीला शेण म्हणतात. त्याच्या ‘गौर्या’ बनवतात. गाईची पूजा करतात. वर्गात माझ्या शेजारी पूजा बसते. ती मला खूप आवडते.

“छान, छान !अगदी मनापासून आणि मनःपूर्वक निबंध लिहिलाय राकेशनं.”

“आणि अगदी चक्क ‘गौर्या’…. ग ला काना आणि दोन मात्रा असं लिहिलं होतं.’ अरे, ‘गवऱ्या’असा लिहायचा तो शब्द!

“नो. टीचरने असाच सांगितलाय.”

‘टीचर ने सांगितलं आहे’या ब्रह्मवाक्यानंतर काहीही बोलण्यात अर्थच नसतो.’

‘त्याला म्हणावं, टीचरला पण घेऊन जा क्लासला”.

“हा हा हा.”

                            क्रमशः….

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments