श्री संभाजी बबन गायके
जीवनरंग
☆ अखेरचे आलिंगन! (अनुवादित कथा) – मूळ इंग्लिश लेखक : जोएल लोपेझ ☆ अनुवाद – श्री संभाजी बबन गायके ☆
तिच्या डोक्यावरचा सूर्य नुसता चमकत नव्हता… तळपत होता! त्याच्यापासून हजारो प्रकाशवर्षे दूर असलेल्या पृथ्वीवर जणू कुठल्या जन्मातला रागच व्यक्त करत होता… त्याच्या सहस्र किरणांनी… किरणं कसली? जशा नंग्या तरवारीच! आधीच भेगाळलेली भुई.. ती उन्हाच्या मा-याने अधिकच गलितगात झाली होती. त्यात वारा… भुईवरची धूळ आभाळात उधळण्यात त्याला पाशवी आनंदच होत होता…. ही तप्त धूळ म्हणजे धारदार खंजीर… आणि या धुळीने हवा सुद्धा पेटवून दिली होती. कधीकाळी सर्वांगावर हिरवाई मिरवलेली झाडं आता वृद्धापकाळाने जराजर्जर होऊन केवळ पडत नव्हती म्हणून उभी होती… अस्थिपंजर झालेली. पण एका झाडाच्या अशाच सुकलेल्या फांदीच्या सावलीखाली ती बसलेली होती. त्या फांदीमुळे सावली ती कितीशी मिळणार? ती निम्मी तर उन्हातच होती…. पण तिच्या कुशीत असलेल्या तिच्या मुलावर मात्र तिची सावली पूर्ण होती.. तिच्या काळजातल्या मायेसारखी… पण ही सावली तिच्या आणि तिच्या बाळाच्या जठरातील क्षुधाग्नी विझवू शकत नव्हती याचं तिला खूपच वैषम्य वाटत होतं. तिचं नाव होतं लुमा आणि तिच्या लहाग्या मुलाचा नाव होतं.. बेको. बेको हे नाव देखण्या मुलालाही देता येतं आणि देखण्या नसलेल्या मुलालाही. तिच्या साठी बेको देखणा होता… प्रत्येक आईला आपलं लेकरू बेकोच वाटत राहतं… राज्यात राजा एकच असतो… पण प्रत्येक घरात एक राजा असतोच… मातृसाम्राज्य सम्राट!
लुमा त्या उन्हातही तिच्या पूर्वायुष्यातील हिरव्या स्मृतींमध्ये हरवून गेलेली होती… रात्रीच्या अंधारातलं डोक्यावरचं चांदणं, थंड हवा, पोटात भुकेपुरतं अन्न गेलेलं, पाऊसही गरजेपुरताच… जीवनाचा प्रवास संथ होता पण अव्याहत होता… हेच समाधान. पण पाऊस लांबू लागला आणि पुढे तर थांबलाच… पिकं सुकून गेली… जित्राबं टाचा घासून मेली.. माणसं अन्नाच्या शोधात रानोमाळ पांगली… लुमा मात्र त्यांच्यासोबत नाही जाऊ शकली… तिच्या पदरात हे तान्हं बाळ होतं त्यावेळी…. वातावरणात भुकेचा गंध भरून राहिला होता… आणि हा गंध दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र होत गेला. लुमाने आधी खाणं सोडलं… पुढे बेकोला सुद्धा खाणं कमी करावं लागलं… दोघांना पुरेल असं मिळतच कुठे होतं. बेको थोडासा जाणता झाला होता तोवर… त्याला समजू लागलं होतं.. आईचा तोल जातोय ती उभी राहते तेंव्हा… तिचे गालही आताशा खोल खोल जाताना दिसताहेत. बेकोने तिने त्याच्या हाती दिलेला कंदमुळाचा एक तुकडा तिच्या तोंडापाशी नेला… ”आई.. खा ना थोडं! तुला ताकद पाहिजे आता. ” “नको, तू खा. माझ्यात अजून भरपूर शक्ती आहे.. तुझ्यामुळे! ” लुमा खोल गेलेल्या आवाजात म्हणत होती आणि तिने बेकोच्या कपाळाचं हलकेच चुंबन घेतलं… तिच्या सुकलेल्या ओठांनी. लुमा रोज सकाळी अन्नाच्या शोधात भटकत राहिली… मिळेल ते जमा करीत राहिली… अगदी काहीही. पोटात अन्न असलेल्या कोणाही माणसाच्या कल्पनेतही येणार नाहीत असे पदार्थ ती खाण्यासाठी मिळावेत जीवाचं रान करीत होती… तिच्या पाठीवर बेको असायचा.. झोळीत बांधलेला. झोळीचं वजन आणि बेकोचं वजन जवळजवळ सारखंच भरेल असा कृश झाला होता बेको तोवर. संध्याकाळी उशिरा लुमो परतायची… रोज रात्री बेकोला एक गोष्ट सांगायची… भरून वाहणा-या नद्यांची, चुलीवरल्या भरलेल्या भांड्याची आणि भरलेल्या पोटांची, हंबरणा-या गुरांची…! भुकेने रडणारं एकाही मूळ तिच्या गोष्टीत कधी डोकावलं नाही!
अशाच एका रात्री गोष्ट ऐकून झाल्यावर बेको ने लुमाच्या पोटावर त्याचं डोकं ठेवलं… त्याचं अंग गार पडत चाललं होतं… तिने त्याला घट्ट मिठी मारली… जणू तिच्या बाहुपाशामुळे त्याची भूक कमी होणार होती… बेको म्हणाला.. ”आई! उद्या तरी आपल्याला खायला काही मिळेल का गं? ” त्यावर ती म्हणाली, ” हो, रे राजा! उद्या भात आणि मध… अगदी पोटभर! तुला आवडतो ना मध? ” बेकोचा त्याच्या आईवर विश्वास होता… ते ऐकून तो स्वप्नात गुंग झाला आणि झोपी गेला.
दुसरी सकाळ उगवली ती मागील दिवसांसारखीच… काहीच फरक नाही.. तीच धूळ, तेच ऊन आणि तीच भूक. बेको किती तरी तासांपासून काहीच बोलला नव्हता… तिच्या झोळीत केवळ निजून होता. तिने मागे हात करून झोळी चाचपुन पाहिली…. आणि तिचं काळीज हललं… जगायला आरंभ करण्यापूर्वी बेको जगाचा निरोप तर घेणार नाही ना? तिचं मन चिंतेने काळवंडून गेलं… ती मोठ्यानं किंचाळली… पण ऐकायला कुणाला सवड होती…. आभाळ जेवढं निरभ्र तेवढंच मनानं कोरडं.. आणि शांत. देवा, माझे उरलेले श्वास माझ्या बाळाला देशील का? तिने देवाकडे याचना करायला सुरुवात केली! बेको हळूहळू मृत्यूच्या मांडीवर शांत शांत होत गेला… तिने त्याच्या कपाळावर तिचे ओठ अगदी जोर लावून टेकवून ठेवले होते… त्याला देण्यासाठी तिच्याकडे प्रेमाशिवाय काहीही नव्हतं.. आणि प्रेमाने भूक भागत नाही देहाची! त्यानंतर काही दिवस लोटले… परदेशातून आलेल्या काही सहृदय स्वयंसेवकांनी लुमाला पाहिलं… तिच्या कुशीत बेको तसाच होता… निष्प्राण. लुमाही गलितगात्र… अर्धवट बेशुद्धीत पडलेली होती. भूकेपुढे तिच्या हृदयातील प्रेमाचा हुंकार क्षीण झालेला होता… तिचा बेको निघून गेला होता.. आता त्याला भूक सतावणार नव्हती!
त्या स्वयंसेवकांनी तिच्या बाहुपाशांतून बेकोचा देह अलगद बाजूला काढून घेतला… ते असे करीत असताना लुमाने तिला जमेल तेवढा विरोध केला.. बेको.. बेको.. ती म्हणत राहिली… जणू अंगाई गाते आहे! ती म्हणत होती… बेको… उठतोस ना… बघ.. खायला नाही पण पाणी मिळाले आहे थोडेसे… पितोस का माझ्या हातून? बेको उठणार नव्हता कधीच!
तिला हीच तर भीती होती आयुष्यभर… भुकेने मरण्याची… आणि तीच आज खरी ठरली होती. आता तर तिची अवस्था भयावह झालेली होती… ज्याच्या साठी जगायचं तेच मूल आज मरण पावलं… आणि आपण तर जिवंत आहोत… हा जीव जगवणं किती कठीण असेल यापुढे… अन्न मिळून सुद्धा!
बेकोचं पार्थिव शरीर म्हणजे जणू भुकेचं एक शिल्प झालं होतं… भूक सगुण साकार झालेली दिसत होती. स्वयंसेवकांच्या डोळ्यांतही हे दृश्य पाहून आसवं उभी राहिली. त्यांनी बेकोला एका मातेच्या कुशीतून काढून मातीच्या कुशीत पोहोचवलं! लुमाला मदत छावणीत आणलं गेलं.
त्यांनी तिला अन्नपाणी देऊ केलं… ”आता या भाकरीच्या तुकड्यांचं मी काय करू… ज्याच्यासाठी हा तुकडा मिळवण्याचा प्रयत्न करीत होते.. तोच आता नाही! ” ती शोक करीत राहिली न रडता… केवळ बेकोचा शर्ट उराशी कवटाळून बसायची.
नर्सने तिच्या बेडजवळच्या मेजावर पेन्सिल आणि कागद आणून ठेवला… तुला वाटेल तेंव्हा लिही तुझ्या बेको विषयी.. भूकेविषयी… जगाला समजू दे तुझी कहाणी.. नर्स म्हणून गेली. सात दिवस उलटून गेले तरी लुमाने पेन्सिलला हातही लावला नव्हता… पण ज्याक्षणी तिने ती पेन्सिल उचलून कागदावर लिहायला आरंभ केला… वाटलं… दु:खाच्या धरणाचे सारे दरवाजे धाडकन उघडले गेलेत आणि प्रवाह झेपावू लागलाय खाली… पुढे.. चहुदिशांना… ती आणि तिचं मूल… त्याची भूक आणि त्या भुकेने कातरल्या गेलेल्या कित्येक रात्री… आणि त्या फाटलेल्या रात्री सांधणारे प्रेमाचे धागे… बेको म्हणाला होता एकदा… आई, मी शेतकरी होणार.. आणि धान्य पिकवणार…. मग कुणीही उपाशी नाही राहणार!
.. लुमाचे शब्द थांबता थांबत नव्हते… काही काळाने ते शब्द जगापुढे आले… ते वाचून काही हृदये पिळवटून निघाली… त्यांपैकी काहींनी अन्नधान्यासाठी देणग्या जमा करून दिल्या आणि लुमाच्या गावासारख्या आणखी काही गावांना पाठवल्या… हजारो मुखांना अन्न लाभू लागले… भुकेचा राक्षस त्या गावांतून पलायन करता झाला… कदाचित तो आणखी पुढे कुठे गेला असावा…!
लुमाने तिच्या गावातल्या एका कोप-यात आता एक झाड लावले आहे… बेकोच्या स्मरणार्थ. त्या झाडाखाली तिने बेकोचा तो शेवटचा शर्ट पुरला आहे… ते झाड आता वाढते आहे… लुमा त्याला म्हणते… बेको, उंच हो, बहरून जा… फळे दे… इतका उंच हो की भूक तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही…. बेकोच्या झाडावरून वाहणारा वारा लुमाचे शब्द दूरवर पोहोचवत आहे… जणू एखादी प्रार्थना पसरत राहावी!
मूळ इंग्लिश कथा : जोएल लोपेझ
अनुवादक : संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
(Joel Lopez नावाच्या लेखकाच्या The Last Embrace नावाच्या इंग्रजी कथेचे हे स्वैर रूपांतर आहे. जोएल फिलिपाईन्स देशातल्या हवाई दलाच्या Search and Rescue Team मध्येही सेवा करत असतो. ही कथा नेमकी कुठे घडते ते काही लक्षात येत नाही. पण भुकेची समस्या ही जागतिक समस्या आहे. गरजूंना अन्नदान करणा-या लोकांना यानिमित्ताने अभिवादन.)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈