श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ देव कुठे असतो ? — भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
सावित्रीबाई घाईत होत्या. देवीचा उत्सव जवळ आला होता.. त्याना एकटीला एवढी तयारी करायची होती.. मदतीला त्त्यांचा भाऊ जगदीश येतो दरवर्षी, पण त्याचा संसार मोठा, वीस गुर होती गोठ्यात, शेती मोठी शिवाय आंब्याच्या बागा.. घरी गाडीमानस रोज.. त्याचे दोन मुलगे, सुना सर्वजण राबत होती म्हणून.. तरी ताईच्या मदतीला जगदीश येतोच.
सावित्रीबाईचें दोन मुलगे अनंता आणि वसंता. दोघेही मुंबईत. अनंता फायझर मध्ये चिकटला, त्याचा पगार, बोनस मोठा.. शिवाय त्याची बायको अंजली शाळामास्तरीण. त्याला एक मुलगा.. अनंताचा मोठा ब्लॉक मुलुंडमध्ये. शिवाय चारचाकी गाडी, घरी एसी वगैरे.
वसंता एका स्कुलबसवर ड्रायव्हर, त्याची बायको वनिता कपड्याच्या दुकानात कामाला. त्याना दोन मुली. मुंब्राच्या चाळीत संसार. सतत ओढातांड पैशाची. त्यामुळे सतत भांडण नवराबायकोमध्ये.
सावित्रीबाईंनी ऐशी पार केलेली, आता पाय गुढगे कामातून गेलेले, नजर कमी झालेली, ऐकू कमी येऊ लागलेले. घरवाले गेले त्यापासून एकटी राहिलेली.. त्यामुळे जेवण करायचा आळस, त्यामुळे खाणे कमी. त्यामुळे अंगात ताकद कमी झालेली. भाऊ जगदीश किंवा त्याचे मुलगे अधूनमधून यायचे.. घरी केलेले माशाचे कालवण आणुन दयायचे.. मग त्या दिवशी त्या भात शिजवायच्या आणि दोन घास जेवायच्या.. बाकी दिवशी चहा आणि दोन बिस्किटे यावर दिवस काढायच्या.
त्यान्च्या भावाला जगदीशला ताईची काळजी वाटायची, तो ताईला आपल्या घरी चल असं म्हणायचा. पण सावित्रीबाईना ते योग्य वाटायचे नाही. एकतर रोज देवींची पूजा करायची असायची आणि वर्षातून एकदा देवीचा उत्सव असायचा.
तो माघ पौर्णिमेचा देवीचा उत्सव म्हणजे त्या गावची शान होती. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या दिवशी देवींची पूजा व्हायची. चार ब्राम्हण चार तास पूजा करायचे… मग महा आरती दोन तास चालायची. मग देवीचा प्रसाद.. तो प्रसाद घयायला लोक गर्दी करत. सायंकाळी बायका ओटी भरायला येत.. गाऱ्हाने घालत. रात्री भजने होत.
सावित्रीबाईंचे दोन्ही मुलगे मुंबईत. त्याना आधी यायला जमायचे नाही. कसेबसे आधल्या रात्री येऊन पोचत. त्त्यांचा नवरा होता, तोपर्यत त्याना काळजी नसे, , पण आता थकायला झाले.. एकदिवस त्या आपल्या भावाशी बोलायला लागल्या..
“जगदीशा, माका आता झेपणा नाय रे.. डोळ्यांनी धड दिसणा नाय.. हे दोघे झील आधल्यादिवशी येतले.. पुढे पुढे या देवीचो उत्सव कसो होतलो?
“, मी इचारतंय अनंताक.. काय तरी मार्ग काढुक होयो.
दुसऱ्यादिवशी जगदीशमामाने भाच्याला म्हणजे अनंताला फोन लावला..
“अनंता, तुझी आई आता थकली रे.. वय झाला ना.. आता तूझ्या आईचो आणि देवीच्या उत्सवाचो काय तरी विचार करा.. तुम्ही दोघांनी.
“होय मामा.. आता आई थकली.. देवीच्या पूजेचो पण प्रश्न आसा.. आणि वार्षिक उत्सव पण. देवींची पूजा बंद होता नये.. या देविमुळे आमच्या कुटुंबाची भरभराट झालीया.. यंदा गावक देवीचो उत्सव करूया आणि पुढच्या वर्षीपासून माझ्या घरी मुलुंडमध्ये… “
“आणि आई तुझी.. तिका आता झेपत नाय रे.. तिका पण घेऊन जा.
“मी अंजलीक विचारून सांगतय.. नायतर आई वसंताकडे रवात.. थोडे दिवस माझ्याकडे रवात.
“काय ता ठरवा.. मी वसंताक पण फोन करतय..
असं म्हणून जगदीशमामांनी फोन खाली ठेवला.
जगदीशमामाने वसंतला फोन लावला..
“वसंता, यंदा उत्सवाक इलास काय देवीच्या पूजेचो, वार्षिक उत्सवाचो आणि आईचो प्रश्न मिटवूक होयो. तुझी आई आता थकलीया.. तिका दिसत नाय.. कानाने व्यवस्थित ऐकू येना नाय.. अनंताक फोन केल्लय.
“मग काय म्हणता माझो दादा? तो पैसोवालो आसा.. तेची जागा मोठी आसा.. मी चाळीत दोन खोल्यात रवतंय..
“पण दोघांनी काय ता ठरवा.. अनंता म्हणालो मी देवी माझ्याकडे नेताय.. आईक वसंता नेता काय विचारा..
“माझी जागा केदी? माझे दोन मुली..
“बरा बरा.. तू इलंस उत्सवक. मग बोलूया.
अनंताने भावाला फोन केला आणि दोन्ही भावांनी गावच्या घरातील देवी मुंबईला आणायचे ठरविले. मग दोन्ही भावांनी जगदीशमामाला फोन करून हा निर्णय सांगितला. मामा आपल्या ताईकडे आला आणि तिला म्हणाला
“ताई, तूझ्या दोन्ही झिलांनी फोन केल्लो, दोघांचा मत देवी मुंबईक नेऊया, कारण रोजची पूजा कारणा आसाच पण येदोमोठो वार्षिक उत्सव, तेची तयारी करुची तुका जमाचा नाय.. तेंका तयारीसाठी लवकर गावक येना जमणा नाय आणि दुसरा महत्वाचा म्हणजे या घर पण पडाक झाला, एकतर दुरुस्थ करूंक होया, नायतर नवीन बांधूक व्हया.. त्यापेक्षा देवी मुंबईक नेणा बरा. देवी बरोबर तू पण झिलाकडे जा.. झील, सुनो, नातवंडा यांच्यात म्हातारपण घालवशीत.
“होय बाबा.. आता झेपणा नाय.. आता नातवंडाबरोबर पुढचा आयुष्य..
सगळ्या गावात बातमी पसरली. खानोलकरा देवी मुंबईला नेत आहेत, त्यामुळे यावर्षीचा या गावातील शेवटचा देवीचा उत्सव. सगळ्या गावाची विशेषतः महिलांची या देवीवर श्रद्धा होती, त्या श्रद्धेने देवींची ओटी भरत, तिला नवस बोलत.
जगदीशमामाला माहित होते, या गावातील देवीचा शेवटचा उत्सव, हे लोकांना कळले आहे, त्यामुळे यावर्षी गर्दी होणार, म्हणून त्यानी आपल्या मुलाला सांगून मंडप उभा केला. चारही बाजूला पताका लावल्या, इलेक्टिक तोरणे लावली. मुख्य रस्त्यापासून घरापर्यत वाट सारवली.. सारं घर शेणाने सारवले.. रांगोळ्या घातल्या. मग देवीच्या पूजेची तयारी. देवीचा मुखवटा रंगवून घेतला.. देवघराची झाडलोट केली.. रंग काढला.
एक दिवस आधी अनंता आणि त्याची बायको आली. आल्या आल्या अनंताने घरात काय काय हवे आहे, त्याचा अंदाज घेतला, तसे जगदीशमामाने बहुतेक सर्व तयारी केली होती, किराणा सामान, पंचे, केळीची पाने तयार होती. अनंताने कुडाळला जाऊन फुले, वेण्या आणल्या आणि तो पूजेसाठी येणाऱ्या भटजीना भेटायला गेला.
वसंता आणि त्याची बायको वनिता दुपारी आली. थोडे खाऊन ती दोघे वाडीत आमंत्रण द्यायला गेली. प्रत्येक घरी जाऊन उद्या देवीच्या उत्सवाला या, असे आमंत्रण देत होती. राजाभाऊ हे त्यान्च्या वडिलांचे मित्र. वसंतला पहाताच ते म्हणाले..
“काय आता हो शेवटचो उत्सव देवीचो गावातलो..
“होय काका, आईक आता जमणा नाय.. तिचा वय झाला.. ह्या उत्सवाची तयारी मोठी… जगदीशमामाचा पण वय झाला… मामा म्हणाले, तुम्ही आता ही देवी तुमच्याकडे न्या, कारण तिची रोज पूजा होऊक होयी आणि हो उत्सव सुद्धा..
” मामाचा बरोबर आसा.. पण वसंता.. तुका एक सांगतय.. मी तूझ्या बाबाचो दोस्त.. ही देवी म्हणजे लक्ष्मी देवीचो अवतार.. तुजा पणजोबानी काशी हुन घरात आणलेली. जो हेची पूजा करीत आणि ज्या घरात हिची पूजा होईत, त्या घराची ही देवी भरभराट करतली. तुज्या पणजोबाकडे काय व्हता? भिकारी होतो.. पण देवींची पूजा करूंक लागलो आणि परिस्थिती बदलली.
काकांचे हे बोलणे ऐकून वसंतांची बायको चमकली. तिने नवऱ्याला खुणा केली.. चला म्हणून.
वसंता बाहेर पडला तशी वनिता पण त्याच्यासोबत बाहेर पडली. ती नवऱ्याला म्हणाली
“ऐकलेत ना.. काका काय म्हणाले ते.. जो कोण या देवींची पूजा करेल आणि ज्या घरात ही देवी असेल, त्या घराची भरभराट होईल.. तुमचे बाबा गेल्यापासून तुमचा मोठा भाऊ दरवर्षी पूजा करत आलाय.. तरीच त्त्यांची परिस्थिती एकदम टॉप.. चार खोल्यांचा ब्लॉक, मोटर.. आता या वर्षी तुम्ही पूजा करा आणि देवी आपल्या घरी नेऊया आणि तुमची आई तुमच्या भावाकडे….
“अग पण.. तो मोठा आहे ना.. त्याचाच मान असतो पूजा करण्याचा.
“पण यावर्षी तुम्ही पूजा केलीत तर काय होईल? मी सांगते मामांना.. यावर्षी आमचे हे पूजेला बसतील म्हणून. आणि देवी मात्र कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी न्यायची… तरच आपली परिस्थिती सुधरेंल.. मला पण ब्लॉकमध्ये राहायचय.. माझ्या मुलींना चांगले नवरे मिळायला हवेत…
“अग पण आपली जागा एव्हडीशी.. त्यात देवींची पूजा..
” मी करीन ऍडजस्ट बरोबर… आणि तुमच्या म्हातारीला आपल्या घरी नको हा… आता त्यान्च्या म्हातारपणात कोण बघणार त्याचेकडे?
– क्रमशः भाग पहिला
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈