सौ. राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ पराधीन… भाग – १ ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
(शोभा साठी तर साराच अंधार होता. स्वमग्न सायली आणि अपंग नवरा. देव एकाच माणसाला इतकी दुःखं का देतो?) – इथून पुढे —-
ताईला सहज आठवलं. सर्व भावंडात शोभा देखणी होती. काहीशी नाजूकही होती. पप्पा तिला ‘चमेली’ म्हणायचे. पप्पांची फार लाडकी. सारी भावंड तिला ‘लाडावलेलीच’ म्हणायचे. तिनेही पप्पांना बजावून सांगितले होते, ” पप्पा मी काही ताई सारखी नोकरी वगैरे करणार नाही बरं! मला श्रीमंत, जमीनदार, सुखात ठेवणारा नवरा हवा. ”
भैय्यासाहेबांचं स्थळ अगदी तसंच होतं. घरदार, शेतीवाडी, गोधन असलेलं. भैय्या साहेबांचा स्वभावही खूप मनमिळाऊ, समंजस, सर्वांची काळजी घेणारा असाच होता. शोभा चांगल्या घरात पडली याचं पप्पांसकट सर्वांनाच समाधान होतं.
पण दैव जाणिले कुणी?
सायलीच्या जन्मानंतर जीवन जणू ढगाळलंच. ती ऑटिस्टिक आहे हे स्वीकारायलाही खूप महिने लागले. ती मंदबुद्धी नव्हती पण नॉर्मल नक्कीच नव्हती. वयाप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक माईलस्टोन वर ती अडखळत होती. बुद्धी, शरीर याची संगती नव्हती. मात्र मुलगी म्हणून वाढत असतानाचे शारीरिक नियम निसर्गाने पाळले होते. ती ऋतुमती झाली. तारुण्याच्या खूणा अंगावर उमटू लागल्या. पण हे तारुण्य मोरपिशी नव्हतं. ते विकृत भासत होतं. त्या तारुण्यात स्वप्नांची पिसं नव्हती. भुताटकीचा नाच होता. तिच्या अंगावर चढणाऱ्या गोलाईने शोभाचं उर धडधडत होतं.
एकदा तिला स्वप्नही पडलं होतं… ‘अजस्त्र गिधाडांच्या टोळीने सायलीला उंच आकाशात उचलून नेलं. ’
घामाघूम होऊन शोभा झोपेतून उठली. सायली शेजारी शांत झोपली होती. झोपेतच शोभाने सायलीला घट्ट पकडले आणि म्हटले, ” बाळा! माहित नाही हे जग तुझ्यासाठी कसं असेल? पण आता आपलं दोघींचं एकच जग. त्या जगात फक्त तू आणि मी. ”
ताईच्या मनात जेव्हा या आठवणी उतरल्या तेव्हा तिला वाटलं एकाच आई-बाबांच्या पोटी जन्माला आलो आपण, एकाच अंगणात खेळलो, वाढलो पण शोभाच्या नशिबाने अशी थट्टा का मांडली? पूर्वजन्मीची कर्म, भोग, देणी घेणी हे संकेत खरे आहेत का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? तो नियंता? ज्याच्या हाती जीवनाची सारी सूत्रं आहेत. शेवटी हेच खरं आपण सारेच पराधीन आहोत, कठपुतळी समान आहोत. ”आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना”
सायली.. ईश्वराने बनवलेलं एक ॲब्सट्रॅक्ट माॅडेल. पण त्यातही मन होतं. भावना होत्या. त्या व्यक्त करण्याची क्षमता नसेल पण त्यांचं अस्तित्व होतं. सायलीच्या खोलीत भैय्यासाहेबांचा फोटो होता. त्या फोटोशी ती गप्पा करायची. असंबद्ध बडबड करायची. शोभाला कुणी बोललं, शोभा रडली तर तिला आवडायचं नाही. ते ती कधी आरडाओरड करुन हातवारे करुन व्यक्त करायची.
तिच्याजवळ एक बाहुली होती. कधी असं वाटायचं त्या बाहुलीत ती स्वत:ची प्रतिमा पाहते. त्या बाहुलीवर ती प्रेमही करायची तर कधी तिचा राग राग करायची. सायलीच्या वागण्याचं हंसुही यायचं आणि करुणाही वाटायची.
शोभाची मृत्यूशी अखेरची झुंज चालू होती. विनय आला होता. शोभाचे दीर— जाऊ आले होते. तेही आता वयस्कर झाले होते! थकले होते. काळ इतका लोटला होता की एक पिढी सरली होती. आता पुढच्या पिढीचे पर्व सुरू होतं.
सगळ्यांपुढे प्रश्न होता शोभानंतर आता सायलीचे काय?
विनय म्हणाला,” सायली सारख्या मुला मुलींची काळजी घेणारी भारतात काही केंद्रं आहेत. तारांगण या संस्थेची माहिती मी काढली आहे.
शोभाचे दीर म्हणाले, “गावाकडची काही पडीक जमीन आम्ही नुकतीच विकली आहे. त्यातून येणाऱ्या पैशांचा आम्ही सायली साठी ट्रस्ट करणार आहोत. सायलीचा संपूर्ण खर्च तिच्या शेवटापर्यंत ट्रस्टमार्फत होईल. ”
शोभाचा शेवटचा क्षण आणि सायलीचे उर्वरित भविष्य हे दोनच विषय सर्वांच्या मनात घोळत होते. या विषयावर जे काही ठरवायचं ते त्यांना नंतर नसतं का पार पाडता आलं? पण कदाचित आज सर्वजण एकत्र आहेत. उद्याचं काय माहित? सारेच विखुरतील.
पण या सगळ्या उहापोहात फक्त विनयच्या लक्षात आलं की सायली कुठेच दिसत नाहीय. गेली कुठे? ती एकटी जिना उतरून कुठेही जात नाही. पण आता या वेळेस ती घरात नाही हे सत्य होतं. मग ती गेली कुठे?
एक वेगळीच धावपळ सुरू झाली. शोधाशोध. रस्तोरस्ती, गल्लोगल्ली, मंडईत, मंदिरात, उद्यानात सर्वत्र. सायली कुठेही सापडली नाही. पोलीस चौकीत तक्रार नोंदवली. तपासचक्रं सुरू झाली.
शोभाचा श्वास मंद होत चालला होता. एकीकडे ताईने मृत्युंजयाचा जप चालवला होता.
॥ ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥
आणि दुसरीकडे सायलीची शोधाशोध. मध्यरात्री पोलिसांचा फोन आला.
विनयच हॉस्पिटलमध्ये गेला. पांढर्या चादरीत देह गुंडाळला होता.
मखमलीच्या तळ्यात पोलीसांना एक मृतदेह सापडला होता. विनयने चेहऱ्यावरची चादर हळूहळू उचलली.
तो निरागस, निर्विकार, निश्चेष्ट चेहरा सायलीचा होता!
शवविच्छेदनाच्या अहवालात “अपघात”अशी नोंद होती. सापडलेल्या वस्तुंमध्ये सायलीची बाहुली होती. तिचा पार लोळागोळा झाला होता.
त्याच क्षणी अतिदक्षता विभागातून परिचारिकेचा संदेश आला.
“ सॉरी! शी इज नो मोअर. ”
शोभा गेली. मुक्त झाली. शोभाच्या आयुष्यात एकच गोष्ट मनासारखी झाली होती. त्या अनोळच्या जगात शोभा आणि सायलीने हातात हात घालून प्रवेश केला होता.
लोकांसाठी ही जरी शोकांतिका असली तरी शोभाच्या दृष्टीने ही एक तिच्या आयुष्यात घडलेली फार मोठी सुखांतिका होती. तिच्यासाठी असा शेवट सकारात्मक होता. आता तिचा आत्मा मुक्त झाला असेल. नियतीच्या दृष्टीने सायलीने घेतलेला या जगाचा निरोप म्हणजे एक समर्पित दान होतं. तिच्या जन्मदात्रीसाठी.
या इहलोकात प्रश्न एकच होता. का आपण जाणाऱ्याची, त्याच्या मागे उरणार्यांची चिंता करतो? याला त्याला, नशिबाला दोष देतो? जर तर करतो? कोणाचा दोष असतो?
दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…
– समाप्त –
© सौ. राधिका भांडारकर
वाकड, पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप छान शेवट!