सौ. राधिका भांडारकर
जीवनरंग
☆ चैत्रपालवी… भाग – २ ☆ सौ. राधिका भांडारकर ☆
(“या कशावरही आपण विश्वास ठेवायचा नाही. लोकांना म्हणावं आमचं आम्ही पाहून घेऊ. तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही. “…. पण असं होत नाही ना?) – इथून पुढे —
आणि आजकाल तर नंदा प्रत्येक गोष्ट वैयक्तिक व्यथेशाच जोडत होती.
कुणी म्हणायच, “देव तरी कसा असतो, नको तिथे उदंड देतो. आणि इथे पहा कशाचीही कमतरता नसूनही. “.
लोक का बोलतात?
काही दिवसांपूर्वी मैत्रिणीच्या डोहाळे जेवणाला ती खूप उत्साहाने गेली होती. खरोखरच ती खूप आनंदात होती. कुठलीही असूया, मत्सर, द्वेष भावनाही तिच्या मनात नव्हती. स्वच्छ, निर्मळ भावनेने त्या सोहळ्यात ती सामील झाली होती. पण मैत्रिणीच्या ओटी भरण्याच्या वेळी, तिच्या सासूबाई नंदाला अडवत म्हणाल्या,
” तू राहू दे. तू जे काय आणलं आहेस ना ते इथे ठेव. “
भयंकर दचकली नंदा. खूप मोठा धक्का होता हा. सर्वांसमोर आपण कुठेतरी कमी आहोत याचा जाहीरपणे केलेला उच्चार होता तो.
समाज बदललेला नाही. कुठला विकास? कुठली प्रगती? तेच सारे नासलेले विचार.
दुसऱ्या दिवशी मैत्रिणीचा फोनही आला.
” सॉरी ग! माझ्या सासूबाईंना कुठे काय बोलावं याचं भानच नसतं. तू नको इतकं मनावर घेऊस. त्यांच्या वतीने मीच तुझी क्षमा मागते. “
पण जे व्हायचं ते होऊन गेलं होतं. यानंतर मात्र बारसे, डोहाळे जेवण अशा समारंभाला जाणं ती टाळू लागली. हळूहळू ती अशी तुटत चालली होती. एका कोषात जाऊ लागली. एकाकीपणाच्या भयानक पोकळीत शिरत गेली. सगळच मावळत गेलं. आनंद, हास्य, सौख्य. आयुष्य कोरडं झालं.
शास्त्रोक्त उपचारातूनही जी पंधरा वीस टक्क्यांची शक्यता होती, तीही फोल ठरली. श्रीरंगच्या नकळत नंदाने काही व्रतं, पूजा, स्तोत्रपठणे वगैरे केलं होतं. पण ईश्वराने झोळी भरलीच नाही.
ते निष्पर्ण झाड पुन्हा पुन्हा तिला सतावत होतं.
तिने मॉन्टेसरीचा कोर्स केला होता. श्रीरंगच्या हट्टा मुळेच तिने जवळच्या एका शाळेत बालवर्ग घेण्याचे ठरवले. ती शाळेत जाऊ लागली. मुलांची किलबिल, चिवचिव, हसणं, रडणं यात ती गुंतू लागली. एक विरंगुळा तिला मिळाला. पण एक दिवस तिच्या वर्गात, मुलांचे खेळ घेत असताना एक छोटासा अपघात झाला. एका मुलाला थोडं लागलं. त्याच्या नाकातून रक्त आलं. नंदाने त्याला व्यवस्थित सांभाळलेही. शांतही केलं. पण संध्याकाळी जेव्हा त्या मुलाच्या आईला हे समजलं तेव्हां ती थोडी तिच्यावर नाराज झाली.
” मुलाला काही झालं ना तर जीव कसा कळवळतो हे तुम्हाला नाही कळणार. “
या तिच्या बोलण्याने नंदाच्या डोळ्यातून अश्रुंचा पाऊसच कोसळला.
काय आपलं आयुष्य? कसं सावरायचं?? हे युद्ध होतं. फक्त हरवणारं.
अशीच उदासपणे गॅलरीत उभी राहून ती त्या निष्पर्ण झाडाकडे पाहत होती. खरं म्हणजे कधीतरी हे झाड हिरवगार होतं. बहरलेलं होतं. ही पानगळ कधी झाली? आणि आपल्याला ती आत्ताच का सतावते?
तिच्या पाठमोऱ्या खांद्यावर श्रीरंगने हलकेच हात ठेवले. तिला वळवलं. तिचा चेहरा हातात घेतला. डोळ्यातले वाहणारे अश्रू पुसले. आणि म्हणाला,
” ऐक. माझ्याकडे एक प्लॅन आहे. खरं म्हणजे ही कल्पना माझ्याच ग्रुप मधल्या मित्रांची. आमच्यात बरेच दिवस चर्चा चालू होती. योग्य, अयोग्य साऱ्या पातळीवर ताऊन सुलाखून या निष्कर्षावर पोहोचलो आहोत. “
नंदाला काहीच समजत नव्हतं. हा नक्की काय सांगतोय?
” हे बघ, ऐक ऐक, मी काय म्हणतोय ते.
” बोल. “
” आपण मूल अॅडाॅप्ट करूया. काय हरकत आहे? अगं जगात कितीतरी अनाथ मुलं आहेत, ज्यांच्या आई-वडिलांचा ठाव ठिकाणा नाही. जन्माला येणाऱ्या मुलांचा काय दोष असतो? आपण अशाच एखाद्या मुलाचं पालकत्व स्वीकारलं तर? “
नंदा पार हादरून गेली. इतकं सोपं आहे का हे?
” बघ. बायोलॉजिकली नसलो तरी आपण प्रेमाचं एक नातं नक्कीच निर्माण करू शकतो. “
” थांब. मला थोडा विचार करू दे. ”
मात्र यानंतर दोघांच्या संवादाला एक विषय नक्कीच मिळाला होता. निराशा, मरगळ एका वेगळ्या वाटेवर वळवली जात होती. काहीतरी रचनात्मक मनात आकारत होतं. आता निसर्गाची वाट पाहायची नाही. मुल अडॉप्ट करायचं. कदाचित आपल्यासाठी हीच परमेश्वरी योजना असेल.
अनेक प्रश्नांचा उहापोह केला. कुटुंबीय, जवळचे नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्र मैत्रिणी, यांची नेमकी काय प्रतिक्रिया होईल? जे मूल घेऊ त्याच्यासोबत येणार्या अज्ञात अनुवांशिक गुणांचं काय? मूल वाढत असताना इतरांच्या, सभोवतालच्या, बेधडक प्रतिक्रियांचा त्याच्या मनावर काय परिणाम होईल? भविष्यात त्याने विचारलेल्या प्रश्नांना आपण उत्तरं देऊ शकू का? इथपर्यंत सगळ्या शंका कुशंकांचं चर्वण झालं. पण एक मात्र खरं— मूल अडॉप्ट करण्याच्या विचारातून मात्र माघार घेतली गेली नाही. मुलगी अॅडाॉप्ट करुया या विचारावरही एकमत झालं.
श्रीरंगच्या मित्राच्या, एका सामाजिक काम करणाऱ्या नातेवाईक महिलेनी एका आश्रमाची संपूर्ण माहिती दिली. अॅडाॅप्शनच्या कायदेशीर बाबी, भरावे लागणारे अर्ज, अटी, नियम, लागणारा वेळ याविषयी सविस्तर माहिती तिने दिली.
श्रीरंग आणि नंदा एक दिवस त्या आश्रमात जाऊनही आले. तिथल्या संचालकांना भेटले. तिथली ती खेळणारी बागडणारी, काम करणारी लहान मोठी मुले पाहून मन गदगदलं. आणि खरोखरच मुल अडॉप्ट करण्याच्या विचाराला एक प्रकारची पुष्टीच मिळाली.
श्रीरंग— नंदाच्या आयुष्यात या नव्या विचाराने खरोखरच नवी पालवी फुटत होती. एका वेगळ्याच विश्वात, , कृतीशीलतेत, एका धाडसी अथवा जोखमीच्या निर्णयानेही निर्माण झालेल्या सुखद वळणावर दोघेही खूप आनंदी होते. आयुष्यातल एक निराळंच आवाहन त्यांनी स्वीकारलं होतं. आणि त्यात गंमत होती.
सर्व प्रक्रियेत अर्थातच काही दिवस उलटले. त्यादरम्यान घरात एका बाळ पाहुण्याची स्वागत तयारी सुरू झाली. बालसंगोपनाचे वर्गही त्या दोघांनी अभ्यासले. जे घडणारच नव्हतं ते घडणार म्हणून त्या घराच्या भिंतीही हसू लागल्या.
खूप दिवसांनी नंदा गॅलरीत आली. रस्त्यावरची वर्दळ, वाहनांचे आवाज, खेळणारी मुलं, आरडाओरडा या चैतन्यपूर्ण वातावरणाचा ती नकळत एक भाग बनली. आणि ते दूरवरचे झाड? अरेच्या! त्या निष्पर्ण झाडावर पोपटी, लालसर, इटुकल्या पानांची पालवी अंगभर फुटली होती. त्या चैत्रपालवीने ते झाड आता कसं बहरलं, हसलं. ते आता ऊर्जीत वाटत होतं.
श्रीरंग तिच्पा मागेच उभा होता. त्यानं नंदाला प्रेम भावनेने मिठीत घेतलं.
दूरवरचं पालवलेलं झाडही हळुवार सळसळलं.
– समाप्त –
© सौ. राधिका भांडारकर
वाकड, पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈