सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. राधिका भांडारकर 

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सौ. राधिका भांडारकर यांच्या “दुर्वांची जुडी “ या नव्या कथासंग्रहाचे प्रकाशन दि. ०६/०४/२०२५ रोजी शुभंकरोति साहित्य परिवारातर्फे करण्यात आले. वीर सावरकर अध्यासन केंद्र पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात मा. ममता सकपाळ यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. (प्रकाशक:अमित प्रकाशन)

या नव्या कथासंग्रहाबद्दल आपल्या सर्वांतर्फे राधिकाताईंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच अखंड साहित्य सेवेसाठी असंख्य शुभेच्छा.

आजच्या आणि उद्याच्या अंकात वाचूया या नव्या संग्रहातली एक कथा चैत्रपालवी – दोन भागात.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

? जीवनरंग ?

☆ चैत्रपालवी… भाग – १ ☆ सौ. राधिका भांडारकर ☆

गॅलरीतून दूरवर दिसणाऱ्या त्या निष्पर्ण झाडाकडे नंदा कितीतरी वेळ पहात होती. दिवस सरत्या हिवाळ्यातले असले तरी उन्हातलं ते निष्पर्ण झाड अगदी भकास दिसत होतं. एखाद्या सुकलेल्या काड्यांच्या खराट्या सारखं. भासत होतं. त्या झाडाकडे पाहता पाहता नंदाच्या मनात आलं, “आपलंही आयुष्य असंच आहे. भकास, निष्पर्ण, शुष्क, ओलावा नसलेलं.

आजूबाजूला अनंत गोंधळ होते. वाहनांची वर्दळ होती. हॉर्न चे आवाज होते. समोरच्या मैदानात मुले खेळत होती. कोणाचे मोठ्याने बोलण्याचे ही आवाज होते. हसणे, ओरडणे, सारं काही होतं. खरं म्हणजे अशा प्रकारच्या वातावरणात नकळत एक ऊर्जा असते. हालचालीतलं चैतन्य असतं. पण नंदा, या क्षणी तरी या वातावरणाचा भाग होऊच शकत नव्हती. जणू काही तिचं सारं अस्तित्व, त्या दूरच्या पानं गळून गेलेल्या बोडक्या झाडाशीच बांधलेलं होतं. कुठेतरी तिच्या अंत:प्रवाहात एक लांबलचक कोरडा उसासा फिसकारला.

ती घरात आली आणि पुन्हा एका शून्यात हरवली. भिंतीवर कोलाज केलेली अनेक छायाचित्रे होती. दोघांची. ती आणि श्रीरंग. दोन हसरे, आनंदी चेहरे. घट्ट प्रेमाने बांधलेले, मिठीत विसावलेले, हातात हात धरलेले. जणू एक गाढ भावनेचा प्रवाहच त्या भिंतीवर या स्वरूपात दृश्यमान होता. फोटोतला नदीचा किनारा, फेसाळलेल्या लाटा, पौर्णिमेचा चंद्र, नारळाची गर्द झाडी, पाण्याने वेढलेल्या खडकावर बसलेल्या तिचा निवांत चेहरा. हे नुसतेच फोटो नव्हते, त्यांच्या आयुष्यातले आनंदाचे बंदिस्त क्षण होते.

एकमेकांबरोबर आयुष्याला सुरुवात करताना किती नादमय होतं सारं! नंदा आणि श्रीरंग सारखं जोडपंच नसेल कुठे? सौंदर्य, आरोग्य, बुद्धी, पैसा सारं काही होतं. कशाचीच उणीव नव्हती. पण बेभानपणे आयुष्य जगत असताना, कुठेतरी जीवनातला पोकळपणा नकळतच आजकाल जाणवायला लागला होता. काही प्रश्न सभोवती झडत होते.

“काय नंदा? संपलं नाही का तुमचं फॅमिली प्लॅनिंग? किती दिवस दोघे दोघेच राहणार? येऊ देत की आता बालपावलांची दुडदुड. “

कधी तिची आईच म्हणायची,

” लवकर विचार करा बाबा! आता आमचीही वय होत चालली आहेत. अधिक उशीर झाला तर आमच्याकडूनही काही होणार नाही बरं! आणि हे बघ प्रत्येक गोष्टीचं वय ठरलेलं असतं बरं का! आता उशीर नका करू, मग पुढे अवघड जाईल. निसर्गाचे काही नियम असतात. “

कोणी बोललं म्हणून नव्हे, पण नंदाला तिच्या स्वतःच्या देहाबद्दल आजकाल काहीतरी परकेपणा जाणून लागला होता.

त्यादिवशी बागेतल्या कुंड्यांना पाणी घालत असताना तिला जाणवलं, ही सदाफुली फुलली आहे, मोगऱ्यालाही वेळेवर फुले येतात, गुलाब उमलतात, घाणेरी सुद्धा सदाबहार असते, पण ही जास्वंदी? हिरवीगार, टवटवीत, भरपूर पान असूनही आजपर्यंत हिला एकदाही एकही फुल आलं नाही. असं का? मग तिने ठरवलं, आता विशेष लक्ष देऊन या झाडाला खत पाणी घालायचं. पण या विचारा बरोबरच एक उदासीनता तिच्या मनाला घट्ट पकडून राहिली.

या विषयावर व्हायला हवी तशी चर्चा त्या दोघांमध्ये आजपर्यंत झाली नव्हती. कदाचित दोघेही, कुणी कुणाला दुखावू नये म्हणून मुद्दामहून हा विषय टाळत असावीत. पण एक लक्षात आलं होतं की कसलेही अवरोधन वापरत नसताना ते का घडू नये? 

सुरुवातीला माणसं नाकबुलीमध्ये मध्ये असतात. आशावादी असतात. ‘होईल की. एवढी काय घाई आहे?’ याही विचारात असतात. पण मग असा एक क्षण येतो की तो शक्याशक्यतेच्या पलीकडे घेऊन जातो. माणसाला खडबडून जागा करतो. आणि गडद अंधारातही ढकलतो.

श्रीरंग तसा फारसा गंभीर नसावा. पण नंदाच्या उदासीनतेकडे तो दुर्लक्ष करू शकत नव्हता. अखेर त्यांनी दोघांनी वैद्यकीय सल्ला घ्यायचा ठरवले. तोही काळ नंदाला खूप कठीण गेला. दोष कुणात असेल? तिच्यात दोष निघाला तर त्यांच्या नात्यावर त्याचा काय परिणाम होईल? श्रीरंग नक्की कसा रिऍक्ट होईल? समजून घेईल की दुरावेल?या अपूर्णतेचा तो कसा स्विकार करेल? प्रेमाचं सहजीवन यांत्रिक होईल की आणखी भलतंच काही सोसावं लागेल? या विचारांनी नंदा पार विस्कटून जायची. आणि समजा, दोष श्रीरंग मध्ये निघाला आणि तो डिप्रेशन मध्ये गेला तर? सगळंच अनाकलनीय आणि अस्वस्थ करणार होतं.

श्रीरंग मात्र नंदाला म्हणायचा “नको इतका विचार करूस. काहीतरी मार्ग निघेल. आणि अगं! मुल झालंच पाहिजे या विचारापासूनच थोडी दूर जा की. जीवनात इतर आनंद नसतात का?”

असं कसं बोलू शकतो हा? स्त्री आणि मातृत्व यांचं अतूट भावनिक नातं याला समजत नाही का?

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चौफेर, नाना प्रकारच्या टेस्ट्स दोघांच्याही झाल्या. डॉक्टरांच्या प्रश्नांना उत्तर देतानाही कधी कधी मन खचायचं.

पण वैद्यकीय चाचण्यांमधून काहीच निघाले नाही. डॉक्टर म्हणाले, ” व्यंधत्वाचे कुठलेही दोष शास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर दोघांतही नाहीत. तुम्हाला मूल न होण्याचं तसं वैज्ञानिक कारण काहीच नाही. “

” मग?”

त्यानंतर डॉक्टर म्हणाले,

” काही वेळा वाढतं वय, मानसिक स्थिती, थकलेपण, ताण-तणाव, दडपण याचाही परिणाम होऊ शकतो. जितकी लैंगिक उत्कटता असायला हवी तितकी नसते. आजकालच्या पीढीची ही समस्याच आहे. पण निराश होऊ नका. शास्त्र खूप पुढे गेले आहे आता. आपण काही प्रगत तंत्रज्ञान वापरून प्रयत्न करू शकतो. म्हणजे इन्सेमिनेशन, आयव्हीएफ, यु आय आय वगैरे. विचार करा आणि पुन्हा भेटा. “

खरोखरच हे सगळं मानसिक दृष्ट्या खूप त्रासदायक होतं. अवघडवून टाकणार होतं. प्रगत शास्त्राच्या उपयोगालाही मर्यादा असतातच. शक्याशक्यताही असतातच. सारं कितीही अवघड असलं तरी याही प्रवाहात जाण्याचं नंदा आणि श्रीरंग ने ठरवलं.

आशावाद नव्हता असंच नाही. पण एक डोंगराएवढं ओझं होतं मनावर. शरीराच्या व्यथेपेक्षा मनाची व्यथा खूप मोठी होती. भावनांचे प्रचंड चढउतार होते. कमतरता, उणीव, काहीतरी नसल्याची जी भावना असते ना ती खचवून टाकणारी असते. सुखाची पानगळच असते ती.

यामधला एकच, अत्यंत सकारात्मक भाग म्हणजे दोघांमधलं नातं! ते अधिक घट्ट होत होतं. दोघंही एकमेकांची मनं जपत होते. पण त्यातही एक होतं की नंदाची मानसिक पडझड जास्त होत होती. श्रीरंगला तेही जाणवत होतं.

त्यादिवशी प्रधानांच्या आजी बोलता बोलता नंदाला सहज म्हणाल्या,

” का ग? तुमच्या पत्रिकांमध्ये एकनाड योग आहे का?”

“म्हणजे?” नंदाने विचारले.

” म्हणजे पत्रिकेत दोघांचीही अंत्यनाड असेल तर मुलं होण्यास बाधा येऊ शकते. कितीही प्रयत्न केले तरी मुल होत नाही, असं म्हणतात. “

नंदाने जेव्हा श्रीरंगला हे सांगितले तेव्हा तो उसळलाच. आणि ठामपणे म्हणाला,

” या कशावरही आपण विश्वास ठेवायचा नाही. लोकांना म्हणावं आमचं आम्ही पाहून घेऊ. तुम्ही काळजी करायचं काही कारण नाही. “

पण असं होत नाही ना?

– क्रमशः भाग पहिला 

©  सौ. राधिका भांडारकर

वाकड, पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments