सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

☆ जीवनरंग ☆ सहवेदना – भाग 1 ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

\सई आणि सचिन, दोघांचीही गेले ४-५ महिने नुसती धावपळ चालली होती. मुहूर्त काढून झाल्यावर, त्या दिवशी त्यांना हवं ते कार्यालय उपलब्ध आहे म्हटल्यावर, तातडीने त्यांनी ते बुक करून टाकलं….. आणि त्यांची खरी लगबग सुरु झाली. देणं-घेणं, मानपान हा प्रश्न व्याह्यांनीच निकालात काढल्याने मोठं टेन्शन कमी झालं होतं. पण इतर कितीतरी खरेदी, दागदागिने, घरात लागणारं सामान, पूजेची तयारी, घर-सजावट, आणि आमंत्रणांची यादी — मग आमंत्रण-पत्रिकेचे सिलेक्शन —–कामांचा नुसता डोंगर उभा होता. पण दोघांचं बऱ्याच बाबतीत एकमत झालं होतं. आणि ठरवल्यानुसार एकेक काम हातावेगळं होत राहिलं. बघता-बघता आमंत्रणं करून झाली. फराळाची ऑर्डरच दिलेली होती. जवळच्या माणसांना द्यायच्या भेटवस्तूंचं पॅकिंग करून तयार  होतं. स्वयंपाक-वरकाम यासाठी आणखी दोन बायका आठ दिवसांपासून यायलाही लागल्या होत्या. घराची सजावट करणं सुरु झालं होतं. कार्यालयात न्यायाच्या बॅगा भरून तयार होत्या—-म्हणजे झालीच होती की सगळी तयारी—- बघता-बघता देवदेवकाचा दिवस अगदी उद्यावर येऊन ठेपला होता. लेकीचा विरह होणार या विचाराने अस्वस्थ होण्यासाठीही इतके दिवस वेळ मिळाला नव्हता सईला—पण आज- आत्ता मात्र फक्त तेवढी एकच जाणीव मनाला सलत होती–आणि तिला तान्ही सई आठवली.

—-सलोनी—-किती गोड आणि साजरं नाव सुचलं होतं त्यांना तिच्यासाठी. ती तान्हुली होतीही तशीच गोड-गोंडस-हसरी, गव्हाळ वर्ण, गालावर पडणारी खळी, आणि अतिशय आकर्षक असे पाणीदार बोलके डोळे–पहाताक्षणीच दोघांनाही खूप आवडली होती ती. आता आणखी बाळे बघायचीच नाहीत हे ठरलं. आश्रमाच्या व्यवस्थापकांना त्यांनी निर्णय सांगून टाकला. कायदेशीर बाबींची पूर्तता झाली, आणि कोजागिरीला ते तिला आणायला गेले. मनात संमिश्र भावनांची खूपच दाटी झाली होती— भीती-दडपण-उत्सुकता-हुरहुर- आणि त्यातच तिच्या खऱ्या आईबद्दल मनापासून वाटणारी कणव— पोटाची पोर कुठल्या अनोळखी लोकांच्या हातात कायमची पडणार आहे, हे त्या माऊलीला कळणारही नव्हतं– आश्रमाची अटच होती तशी.

गेल्यागेल्या तिने त्या मुलीला उचलून नकळत छातीशी धरलं, आणि त्याक्षणी मनातले सगळे विचार जणू कायमचे हद्दपार झाले. ती तान्हुलीही लगेच तिला बिलगली. सईचा ऊर दाटून आला. तिने पटापटा तिचे मुके घेतले. तिच्यासाठी नेलेलं नवीन झबलं-टोपलं स्वतःच्या हाताने तिला घालतांना मन आनंदाने फुलून गेलं होतं तिचं. येतांना दोघे आलेले ते, आता कायमसाठी ‘तिघे’ झाले होते. एक वेगळीच उभारी घेऊन ते बाहेर पडले. मेनगेटपाशी पोचताच सई सलोनीला घेऊन तिथेच थांबली, आणि सचिन गाडी आणायला गेला. काहीही काळात नसलेल्या त्या छोटीशी सई सारखी बोलत होती—’ ती बघ पमपम — आवडली? आणि ते बघ- त्याला झाड म्हणतात– केवढं मोठ्ठ आहे ना? आणि हिरवं हिरवं गार–’ –अचानक तिची नजर त्या झाडामागून डोकावणाऱ्या दोन डोळ्यांनी वेधून घेतली– आसुसलेपणाने ते डोळे त्या मुलीकडे बघत होते. त्यातून टपटप अश्रू ओघळत असल्याचं सईला लांबूनही जाणवलं. तिने झाडाच्या दिशेने पाऊल उचलताच एक बाई हळूच बाहेर डोकावली—बरीच ठिगळं लावूनही कसंबसं अंग झाकणारी साडी, विस्कटलेले केस, कसलीच रया नसलेलं अशक्त शरीर—’पुढे येऊ नका’ असं तिने हातानेच सईला खुणावलं –तिथूनच कानशिलावर बोटं मोडत पोरीची दृष्ट काढली–हात उंचावून ‘छान-छान’ अशा खुणा करत पोरीला आशिर्वाद दिला, आणि झटदिशी मागे वळून, पळतच ती दिसेनाशी झाली. सईच्या मनात प्रचंड कालवाकालव झाली—-’ती आई असेल का हिची? किती काय काय भाव झरझर सरकत गेले होते तिच्या चेहेऱ्यावर–पोटच्या गोळ्याला असं वाऱ्यावर सोडून देतांना नक्कीच मेल्याहून मेल्यासारखं वाटलं असणार तिला. तिचे डोळे मात्र बरंच काही व्यक्त करून गेले होते तिचे—- लेकीला लांबून का होईना,एकदा तरी बघायला मिळालं याचा आनंद– पुन्हा कधीही ती दिसणार नाही याचं अपार दुःख– आणि एक अनामिक समाधान. एकदा आपल्या बाळाला त्या आश्रमाच्या दारात ठेऊन आलं की आयुष्यात पुन्हा कधीही तिच्यासमोर यायचं नाही, हा कडक नियम माहीत असूनही,आपल्या मुलीला कुणीतरी दत्तक घेतंय याचा सुगावा लागताच आज दुरून का होईना तिला शेवटचं पहाता यावं म्हणून तिने हे फारच मोठं धाडस केलं होतं—–

क्रमशः ….

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments