श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “जे. पी. नाईक यांना आम्ही विसरलो…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

५ सप्टेंबर हा जे .पी. नाईक यांचा जन्मदिवस असतो. पण राधाकृष्णन यांचे स्मरण होताना जे पी नाईक यांची कोणीसुद्धा आठवण काढत नाही. युनेस्को’ने गेल्या २५०० वर्षांतील जगातल्या शंभर शिक्षणतज्ज्ञांची यादी प्रसिद्ध केली, त्या यादीत भारतातील केवळ तीन शिक्षणतज्ज्ञांची नावे आहेत. त्यांपैकी एक महात्मा गांधी, दुसरे रवींद्रनाथ टागोर आणि तिसरे नाव जे. पी. नाईक यांचे आहे! या कीर्तीचीदेखील फारशी माहिती महाराष्ट्रला नसते.

युनेस्कोने त्यांना आशिया खंडातील प्राथमिक शिक्षण-प्रसाराची योजना तयार करण्याची विनंती केली, कराची येथे आशियायी राष्ट्रांच्या परिषदेत त्यांनी सार्वत्रिकीकरणाची विविधांगी योजना मांडली, ‘कोठारी आयोगा’सारखा गाजलेला अहवाल नाईकांनी लिहिला हे फार थोडय़ांना माहीत आहे? आजची ‘अंगणवाडी योजना’ ही नाईकांच्या अहवालामुळे सार्वत्रिक झाली.

भारतात प्राथमिक शिक्षणाच्या सांख्यिकी नियोजनाचा आणि त्याच्याशी जुळणाऱ्या प्रशासकीय व अर्थसाहाय्याच्या योजना तयार करण्याचा पाया नाईकांनी घातला. केंद्रीय शिक्षण मंत्रालयात त्यांनी केलेले काम अतुलनीय आहे. समाजविज्ञान संशोधन परिषदेला गती देऊन त्यांनी शिक्षण, आरोग्य व शेती या भारतीय पुनर्निर्माणासाठी कळीच्या कार्यक्षेत्रांना प्राधान्य दिले.

असे अकांचन आणि साधेपणाने काम करणे ही काय नाईकांची चूक होती की काय म्हणून या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मराठी माणसाला महाराष्ट्र आज विसरला? 

किमान या वर्षीच्या पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाला तरी त्यांचा जन्मदिवस असतो हे लक्षात घेऊन प्रत्येक शाळा व शासकीय स्तरावर तरी नाईकांनाही अभिवादन केले जावे. 

आज मोठय़ा प्रमाणात झालेले शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण या माणसाच्या खांद्यावर उभे आहे हे आपण विसरता कामा नये..

लेखक : हेरंब कुलकर्णी 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments