श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ “डॉक्टर जयंत नारळीकर समजून घेताना…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’, असे म्हणतात ते जयंत नारळीकर यांच्या बाबतीत काही खोटे नव्हते. शालेय जीवनात त्यांचे गणित आणि विज्ञान अत्यंत उत्कृष्ट होते, तर त्यांना मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांची आवड होती. कारण त्यांचे वडील गणितज्ञ होते, तर आई संस्कृत तज्ञ. त्यांच्या घरात त्यांना लहानपणापासून प्रश्न विचारण्यास मुभा दिली होती आणि उत्तरे शोधण्याचा प्रयत्न कसा करावा याचे दिग्दर्शन केले जात असे. त्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण हिंदीतून झाले तरी त्यांना कुठल्याही न्यूनगंडाने ग्रासले नाही. (आजच्या काळात इंग्रजी माध्यमात मुलगा शिकला नाही तर तो मागे पडेल असे समजणाऱ्या पालकांसाठी हे महत्त्वाचे आहे. ) लहानपणापासूनच त्यांचे गणितज्ञ असलेले वडील रँगलर विष्णुपंत नारळीकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून ते वाटचाल करू लागले होते. उच्च शिक्षणासाठी केंब्रिजला गेल्यावर त्यांनी 1963 मध्ये पीएचडी प्राप्त केली. या काळात त्यांना स्मिथ पुरस्कार, ॲडम पुरस्कार आणि रँगलर ही पदवी तसेच खगोलशास्त्राचे टायसन पदक, असे अनेक सन्मान मिळाले.
डॉ. जयंत नारळीकर यांचा पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मितीला अंतराळातून आलेले जीवाणू कारणीभूत आहेत का, याचा शोध घेणारा वैज्ञानिक प्रयोग प्रचंड गाजला. “कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिएरी” अर्थात “स्थिर स्थिती सिद्धांत” हे त्यांचे विज्ञानातील महत्त्वाचे योगदान. हा सिद्धांत ‘फ्रेड हॉएल-नारळीकर सिद्धांत’ म्हणून जगभर ओळखला जातो. त्यांचे मराठी माणसासाठी असलेले आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी विज्ञानाला मराठी भाषेत सन्मान मिळवून दिला. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे देशातील अनेक तरुणांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यास मदत झाली. त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी लोक अभूतपूर्व गर्दी करायचे. बव्हंशी अंधश्रद्धाळू असलेल्या भारतात एखाद्या शास्त्रज्ञाला अशी लोकप्रियता मिळणे हे खरोखरच आश्चर्याची बाब म्हणावी लागेल.
इंदिरा गांधी यांच्या सांगण्यावरून 1972 ला भारतात आले. मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (TIFR) खगोलशास्त्र विभागात प्रमुख पद स्वीकारले. त्यानंतर त्यांनी वैज्ञानिक संशोधनाबरोबरच पुण्यातील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA / आयुका) सारख्या संस्थांच्या उभारणीत महत्त्वाची कामगिरी बजावली. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांमध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या विज्ञान कथा, कादंबऱ्या आणि वैज्ञानिक माहिती लिहिलेली पुस्तके मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली. विज्ञानासंबंधी वस्तुनिष्ठ मांडणीबरोबरच विज्ञानातील बुवाबाजी विरोधात त्यांची स्पष्ट भूमिका होती. त्यासाठी त्यांनी प्रसंगी काही जणांचा रोषही पत्करला. फलज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे किंवा फार तर त्याला समोरच्या माणसाच्या मनाचा ठाव घेत अंदाजपंचे केलेली भाकिते एवढेच महत्त्व द्यायला हवे, असे त्यांचे मत होते.
भारत सरकारचे पद्मभूषण, पद्मविभूषण हे पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा “महाराष्ट्र भूषण”, विज्ञानातील कामगिरीबद्दल शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार तसेच इतरही अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले. २०२१ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या निमित्ताने त्यांनी “आयुका”च्या आवारात “भवताल”ला खास मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी जीवसृष्टीची निर्मिती अंतराळातून आलेल्या जिवाणूंपासून झाली का, त्याबाबतचा प्रयोग, मातृभाषेतून शिक्षण, आपली शिक्षणपद्धती, विज्ञानाचा प्रसार, पर्यावरण, अवकाशातील कचरा अशा अनेक विषयांवर स्पष्टपणे मते मांडली होती.
सामाजिक भान सदैव जागृत असलेल्या जयंत नारळीकर यांची देव, धर्म आणि अंधश्रद्धा याविषयी अत्यंत स्पष्ट मते होती आणि ही मते नेहमी ते व्याख्यानातून आपल्या मृदू भाषेत ठामपणे मांडत. त्याची ही काही उदाहरणे…
१. “देव या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. “
२. “विज्ञानात प्रश्न विचारणं महत्त्वाचं असतं. धर्मात प्रश्न विचारायची मुभा नसते. “
३. “आपण आपल्या बुद्धीचा वापर न करता काही गोष्टी केवळ परंपरेने करत असतो. हे चुकीचं आहे. “
४. “मी विज्ञानप्रसारासाठी लिहितो कारण मला वाटतं की समाजात अंधश्रद्धा खूप आहे. “
५. “धर्म म्हणजे माणसाच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचं एक साधन आहे. “
अशा स्पष्टवक्त्या पण मृदूभाषी असलेल्या भारताचा नावलौकिक जगभरात पोहोचवणाऱ्या जयंत नारळीकरांनी निर्माण केलेली विज्ञान यात्रा त्यांच्या निधनानंतरही वारीसारखी पुढे चालत रहाणार. त्यांच्या तीनही कन्या या शास्त्रज्ञ असून नारळीकर घराण्याचा विज्ञानाच्या प्रगतीचा वारसा पुढे नेत आहेत.
त्यांचा जन्मदिवस १९ जुलै हा ‘राष्ट्रीय विज्ञानकथा दिन’ म्हणून संपन्न होत असतो.. देशात प्रत्येक पिढीत वैज्ञानिक निर्माण होत रहावेत, देशाची वैज्ञानिक क्षेत्रात प्रगतीची कायम घोडदौड व्हावी यासाठी जन्मभर कार्य करणाऱ्या या महान खगोल शास्त्रज्ञाचे वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगणारा समाज निर्माण करण्याचे ध्येय होते. त्या ध्येयाला अनुसरून जरी आपण प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोनाने जगायचे ठरवले तर ती त्यांना खऱ्या अर्थाने वाहिलेली आदरांजली असेल.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈