श्री संदीप रामचंद्र सुंकले
इंद्रधनुष्य
☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ५ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
यत्प्राप्य न किञ्चिद्वाञ्छति, न शोचति, न द्वेष्टि, न रमते, नोत्साही भवति ॥ ५ ॥
अर्थ : जे (भक्तिप्रेम) प्राप्त करून (तो पुरुष) अन्य (कशाचीही) किंचितही इच्छा करीत नाही (कोणाकरताही) शोक करीत नाही, (कोणाशीही) द्वेष करीत नाही, (कोणत्याही विषयात, वस्तूत किंवा व्यक्तीमध्ये) रममाण (आसक्त) होत नाही, कोणत्याही (लौकिक कार्यात) उत्साहयुक्त होत नाही.
सदानाम घोष करु हरी कथा, लेणे माझ्या चित्ता समाधान ॥धृ. ॥
सर्व सुखाल्यालो अलंकार, आनंद निर्भय डुलतसे ॥१॥
असो ऐसा कोठे आठवच नाही, देहीच विदेही भोगू दशा ॥२॥
तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, लागो नाही अंगा पाप पुण्या ॥३॥
(संदर्भ: अभंग क्रमांक ३२५४, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)
जो साधक नामस्मरण भक्ति अथवा कोणतीही भक्ति करतो, त्याला सर्व सुख प्राप्त होतात, तो निर्भय होतो, जो गुण दोषांपासून तो मुक्त होतो, अर्थात त्यामुळे अधिकाधिक निर्भय होत जातो. त्याची अंतिम स्थिती अशी होते की तो अग्निप्रमाणे तेजःपुंज होतो, त्यामुळे त्याला या नश्वर जगातील सुखदुःखे त्रास देऊ शकत नाहीत. भक्तीमुळे काय मिळत किंवा काय मिळवायला हवं, त्याचा उहापोह संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात केला आहे.
एका मनुष्य झोपला होता. त्याला एक स्वप्न पडलं, त्यात तो राजा झालेला होता. प्रचंड ऐश्वर्य होतं, दासदासी होते, अनेक प्रकारची सुख होती…, काही काळ तो राजा राहिला, पण तेवढ्यात त्याला त्याच्या बायकोने हाक मारली…, तो उठला आणि कामाला लागला…, तो काही त्याच्या बायकोवर रागवत बसला नाही….! त्या मनुष्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वप्न पडले, त्यात तो भिकारी झाला होता, त्याला कोणीच भीक घालत नव्हते, सर्वत्र त्याला लोकं टाळत होते…, खूप त्रासला होता तो… इतक्यात गजर वाजला आणि तो झोपेतून जागा झाला आणि आपले नित्य व्यवहार करू लागला….! या दोन्ही स्वप्नांचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही कारण त्याला माहीत होते की आपण स्वप्न पाहिले आहे, स्वप्नांत राजा झालो काय किंवा भिकारी झालो काय, याने काय फरक पडतो….!
साधना वृध्दिंगत होत गेली की भक्ताची भूमिका बदलत जाते, नश्वर जगातील सुखदुःखे, लाभहानी, त्याला तुच्छ वाटू लागतात कारण हे जग त्याला स्वप्नवत वाटू लागते, याचा परिणाम असा होतो की त्याची इच्छा (वांछा) मरून जाते…, ज्याप्रमाणे भीक मागण्याची वेळ आली म्हणून दुःख करीत नाही, तसा तो शोकही करीत नाही. स्वप्नच असल्याने मनुष्य तेथे रमत देखील नाही. त्याच्या चित्तवृत्ती जीर्ण होऊ लागतात. त्यामुळे तो कोणत्याच गोष्टी अतिउत्साह दाखवत नाही, जे प्रारब्धाने वाट्याला येईल, ते आनंदाने स्वीकारतो…. आणि नित्य आनंदात राहतो…
असा भक्त आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट भगवतांचा प्रसाद म्हणून स्वीकारतो, स्वाभाविक त्याचे जीवन प्रसादरूप होऊन जाते….! !
जय जय रघुवीर समर्थ
नारद महाराज की जय!!!
– क्रमशः लेख क्र. ५
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈