श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ “प्रतिक्रिया आणि प्रतिसाद…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यात नेमका फरक काय ? खरं तर दोन्हीही प्रत्युत्तरे… एखाद्या घटनेवर व्यक्त होण्यासाठी केलेली एक क्षणैक कृती आणि दूसरी कालांतराने केलेली कृती.. प्रतिक्रियेत विचाराला संधी नाही. आधी करून मोकळे व्हायचे, मग मागचा पुढचा विचार. अनेकदा ती स्वसंरक्षणार्थ घडते… कधी बचावात्मक पवित्रा, तर कधी आक्रमणात्मक हल्ला. पण क्षणाचीही उसंत न दवडता घडते, ती प्रतिक्रिया… ‘आरे ला का रे म्हणणे’ म्हणजे प्रतिक्रिया.
प्रतिसादाचे तसे नाही. तेथे वेळ आणि विचार महत्वाचा. समोरच्याच्या विधान आणि कृतीचा पूर्ण परामर्श घेऊन, त्यातील गर्भितार्थ जाणून घेऊन, ठरवून केलेली क्रिया म्हणजे प्रतिसाद. प्रतिसाद म्हणजे एक बुध्दीबळाचा डाव. माणसाला अर्थपूर्ण जगायचे तर प्रतिसाद सक्षम आणि विचारी हवा. अंगाशी येणारा विषय टाळायचा असेल तर प्रतिक्रिया तीक्ष्ण हव्यात. गरज असते ती दोहोंमध्ये समन्वय साधण्याची आणि कुठे काय वापरायचे याचे तारतम्य ठेवण्याची. प्रतिक्रियेत बरेचदा तारतम्य आणि ताळतंत्र सुटते. भान हरपून शब्द चुकीचे वापरले जातात, प्रसंगी भाषा शिवराळ होते आणि मस्करीची कुस्करी होते.
प्रतिसाद ही अभ्यासाने साध्य करावयाची गोष्ट आहे, तर प्रतिक्रिया ही ‘स्व’ला जपण्यासाठी होणारी नैसर्गिक उर्मी आहे. माणसाच्या बुध्दीमत्तेचा जसजसा विकास होत गेला आणि तो जसजसा वानाराचा नर होत गेला तसतशी त्याच्या प्रतिसादात उत्क्रांती होत गेली. प्रतिक्रिया मात्र त्याच्या उगमाच्या वेळी जशा होत्या तशाच राहिल्या आणि पुढची अनेक शतके त्या तशाच रहातील. म्हणूनच नराचा नरोत्तम होण्यासाठी त्याच्या प्रतिसादामध्ये सकारात्मक गुणवत्ता वाढीस लागली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने अंतर्भूत होऊन कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करतांना थोडासा विचार करण्याची गरज आहे. महत्वाचे म्हणजे विचाराने केलेली कोणतीही कृती म्हणजे प्रतिसाद हा क्षणिक प्रतिक्रियेच्या प्रत्युत्तरापेक्षा अधिक लाभदायी ठरतो, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈