श्री सुधीर करंदीकर
इंद्रधनुष्य
☆ “कोर्टाचा असाही एक आगळावेगळा निर्णय ” ☆ माहिती संकलन व प्रस्तुती – श्री सुधीर करंदीकर ☆
घटनास्थळ: परदेशामधील कोर्ट
बेरोजगारी, कामधंदा न मिळणे, हा प्रकार सगळ्याच देशांमध्ये कमीजास्त प्रमाणात असतोच. त्यामुळे कमीजास्त प्रमाणात चोऱ्यामाऱ्या होणे, हे पण ओघानी येतेच.
परदेशामधली एक घटना आहे – एका माणसाला दोन दिवस काहीही काम मिळाले नाही, त्यामुळे ते दोन दिवस त्यानी उपाशी राहून कसेबसे काढले. काहीतरी काम मिळेल आणि पोटाला काही खायला मिळेल या आशेवर तिसरा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवशी पण काम नाही आणि दोन दिवस पोटात अन्नाचा कण नाही, शेवटी अनावर होऊन त्यानी एका दुकानामधून ब्रेड चोरला आणि भूक थोडी शांत केली. दुकानदारानी त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले.
कोर्टामधे केस उभी राहिली. उपस्थित मंडळी स्थानापन्न झाली. लिपिकानी केसची माहिती कोर्टाला वाचून दाखवली.
जज्ज : (आरोपी माणसाला) तू ब्रेडची चोरी केली, हे खरे आहे का? आणि केली असेल तर का केली? चोरी करणे हा गुन्हा आहे हे तुला माहित आहे ना?
त्या माणसानी चोरी केल्याचे कबूल केले, चोरी करणे हा गुन्हा आहे, हे माहित असल्याचे पण कबुल केले, आणि चोरी का करावी लागली ते कारण पण त्यानी सांगितले.
त्याचे बोलणे ऐकून सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली. हा गुन्हा या वेळेस आरोपीला माफ करावा, अशी एका वकिलानी कोर्टाला विनंती केली. सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जज्ज साहेबांनी असा निर्णय जाहीर केला – –
जज्ज : आरोपीनी चोरी का केली, याचे कारण जरी पटण्यासारखे असले आणि चोरी तशी किरकोळच असली, तरी, चोरी करणे हा कायद्याने गुन्हाच ठरतो. आणि चोरी करणाऱ्यांना शिक्षा ही असतेच. आणि शिक्षेचे प्रयोजन अशाकरिता असते, की, त्यानी पुन्हा चोरी करू नये. ही जी चोरी केली आहे, त्याकरता १० डॉलर दंड भरणे ही शिक्षा आरोपीला कोर्ट देत आहे.
सगळेच उपस्थित लोक चेहेऱ्यावर हळहळ व्यक्त करतात.
जज्ज : अजून निर्णयाचे काम संपलेले नाही. आरोपी हा दंड भरू शकत नाही, हे कोर्टाला पक्के समजते आहे. म्हणून आरोपीतर्फे १० डॉलर ही दंडाची रक्कम मी आरोपीच्या वतीने कोर्टाकडे भरत आहे. असे म्हणून जज्ज नी खिशामधून १० डॉलर ची नोट काढून बाजूला बसलेल्या लिपिकाकडे दिली.
सगळ्यांच्या चेहेऱ्यावर समाधान उमटले.
जज्ज : निर्णयाचा पुढचा भाग – आपल्या देशात पोट भरण्याकरता माणसाला काम मिळू शकत नाही, ह्याकरता आपण सगळेच जबाबदार आहोत आणि शिक्षेला पात्र आहोत. म्हणून कोर्ट इथे हजर असलेल्या सगळ्यांना १० डॉलर दंड करत आहे. सगळ्यांनी दंडाची रक्कम सरकारी लिपिकाकडे जमा करायची आहे आणि मगच बाहेर पडायचे आहे.
सगळ्यांनीच आनंदी चेहेऱ्यानी १० – १० डॉलर जमा केले. २ मिनिटात २०० डॉलर जमा झाले.
जज्ज : हे २०० डॉलर मिस्टर क्ष (चोरी करणारी व्यक्ती) यांना कोर्ट देत आहे. त्यांनी छोटा मोठा उद्योग सुरु करावा आणि मेहेनत करून आपली रोजीरोटी कमवावी. इथे कोर्टाचे या केसचे कामकाज संपते आहे.
मिस्टर क्ष नी खाली मान वाकवून जज्ज साहेबांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.
सगळेजण जज्ज साहेबांना धन्यवाद देत आणि त्यांचे कौतुक करत बाहेर पडले.
माहिती संकलन व प्रस्तुती : श्री सुधीर करंदीकर
मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈