सौ. मंजुषा सुनीत मुळे
इंद्रधनुष्य
☆ ‘भोपाळची “हिरकणी”…’ – लेखक : श्री मिलिंद वेर्लेकर ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
ट्रक ड्रायव्हर योगिता रघुवंशी, भोपाळची “हिरकणी”…
तब्बल गेली २० वर्षे ट्रक चालवणारी भारताची ही पहिली महिला ट्रक ड्रायव्हर सध्या ३० टनांचा १४ चाकांचा अजस्त्र ट्रक घेऊन भोपाळ ते केरळ मधल्या पलक्कड पर्यंत रोज सतत पुरुष ट्रक ड्रायव्हर्सना अचंबित करेल अश्या ट्रिप्स करतेय… स्वतःचा ट्रक्सचा व्यवसाय सांभाळून.
या सर्वाची सुरुवात झाली २००३ साली भोपाळ इथे….
योगिता आणि तिचे पती, राजबहादूर रघुवंशी, त्यावेळी महाराष्ट्रात राहणाऱ्या योगिता यांचा विवाह होऊन त्या भोपाळ इथे गेल्या. स्वतः वकिल म्हणून या वकिल माणसाशी लग्न केले. पण लग्नावेळी वकील म्हणून सांगितलेल्या रघुवंशी यांचा ट्रकचा छोटासा व्यवसाय असल्याचे धक्कादायक वास्तव योगिता यांना भोपाळला गेल्यावर कळले. तरीही कॉमर्स तसेच वकिलीचे शिक्षण झालेल्या आणि साधेसेच लग्न झालेल्या योगिता यांनी मोठ्या मनाने नवऱ्याला माफ करून नेटाने आणि धीराने संसार सुरु केला.
एक दिवशी ट्रकबरोबर काही कामासाठी गेलेल्या त्यांच्या पतींचा त्यांच्याच ट्रकच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अस्मानी धक्क्यातून सावरत असणाऱ्या योगिता यांच्यावर अश्याच दुसऱ्या दुर्दैवी बातमीची कुऱ्हाड पाठोपाठ कोसळली.. त्यांचा भाऊसुद्धा नवऱ्याच्या दिवसांसाठी येत असताना एका अपघातात मृत्यू पावला.
पदरी दोन मुले, मोठी मुलगी १० वर्षांची येषिका आणि धाकला मुलगा ४ वर्षांचा अश्विन… पती आणि सख्खा भाऊ नुकतेच अपघातात मृत्यू पावलेले, सगे सोयरे कुणी नाही, मुलांचे सगळे व्हायचे असताना बेताचीच परिस्थिती असताना त्यांना रोजचे खायला काय घालायचे हा सुद्धा प्रश्न होता. पतींचा व्यवसाय सुद्धा यथातथाच सुरु असल्याने अश्या अवस्थेत योगिता यांनी नेटाने दिवंगत पतींचा व्यवसाय घरूनच कसाबसा सुरु ठेवला. त्या सोबतच दु:ख बाजूला सारून कंबर कसून योगिता यांनी एका ज्येष्ठ वकिलांकडे असिस्ट करण्याचा प्रयत्न केला, पण वकिलीच्या कामांत खूप वेळ जाऊ लागला आणि पैसेही पुरेसे मिळेनात.
पैसे तर कमवायला लागणारच होते, ब्युटीशियनचा कोर्स झाला होता, एका ब्युटी पार्लरमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला पण तिथेही पैसे लगेच आणि नेमके मिळेनात.
आणि याच भयंकर अडचणीच्या प्रसंगी ‘तो’ प्रसंग घडला..
आभाळ फाटले असतानाच जोडीला भयंकर भूकंप सुद्धा झाला….
त्यांच्या तीन ट्रक्सपैकी एक ट्रक जो हैद्राबादला भाडे घेऊन गेला होता त्याच्या ड्रायव्हरने तो ट्रक शेतात घुसवला आणि मोठा अपघात झाला, ट्रकचे आणि मालाचे भयंकर नुकसान झाले, ड्रायव्हर पळून गेला…
मुलांना शेजारच्या लोकांच्या भरवशावर ठेऊन योगिता यांनी एका हेल्पर आणि मेकॅनीकला घेऊन हैद्राबाद गाठले. रस्त्याच्या शेजारी ४ दिवस उभे राहून मेकॅनीक कडून ट्रक दुरुस्त करून रस्त्यावर आणला आणि हेल्परच्या मदतीने अनेक अडचणींचा सामना करत करत कसाबसा भोपाळला आणला.
हेल्परला ट्रक नीट चालवता येत नव्हता, अपघातग्रस्त ट्रक म्हणून रस्त्यात झालेला पोलिसांचा त्रास, ढाब्यांवर ढाबे मालक आणि अन्य ट्रक चालकांकडून होणारा त्रास, नैसर्गिक विधींना महिलांना रस्त्यांत होणार्या अडचणी आणि या सगळ्यात पोटची दोन मुले शेजाऱ्याकडे ठेऊन आलेली असल्याने उराची होणारी घालमेल….
… या एकाहून एक भयंकर अनुभवांनी डगमगून न जाता वर याच अनुभवांनी समृद्ध होत या सगळ्यांनी मिळून व्यवस्थित शिक्षित आणि विचारी योगीतांना या प्रवासात पैलू पाडले आणि साध्या काचेच्या खड्याची ही “हिरकणी” झाली…
भोपाळला परतल्यावर योगिता यांनी पहिले काय केले असेल तर, पतींना प्रिय असणारा आणि नीट चालवला तर बरे पैसे देणारा हा धंदा नीट चालवायचा असेल तर स्वतःला ट्रक नीट चालवता आला पाहिजे या खमक्या विचाराने “लोक काय म्हणतील, या पुरुषबहुल क्षेत्रात आपला कसा निभाव लागणार? ” वगैरे वगैरे सर्व विचारांना मनात अजिबात थारा न देता पूर्ण विचारांती आणि धैर्याने ट्रक ड्रायव्हिंग स्कूलमध्ये नाव घातले आणि सर्व शारीरिक, सामाजिक, आर्थिक, व्यावहारीक अडचणींचा एक एक करत सामना करत धैर्याने ट्रक ड्रायव्हिंग आणि रस्त्यावर उपयोगी पडेल असे जुजबी ट्रक रिपेरिंग सुद्धा शिकून घेतले.
मूळ उत्तर प्रदेशाची असलेल्या योगिता त्यांच्या लहानपणी महाराष्ट्रात राहत होत्या आणि इथेच त्यांनी रायगडावरल्या मुलांसाठी अवघड कडा उतरून गेलेल्या हिरकणीची गोष्ट ऐकली होती. त्याचं जिद्दीने आता त्यांनी पोटच्या मुलांसाठी ट्रक ड्रायव्हिंग शिकून घेतले आणि ट्रक चालक म्हणून स्वतःच्याच ट्रकवर काम सुरु सुद्धा केले.
आज गेली तब्बल २० वर्षे योगिता सूर्यवंशी ट्रकचालक म्हणून काम करत आहेत. एकेकाळी ट्रकड्रायव्हर महिला म्हणून त्यांची चेष्टा करणारे लोक आज त्यांच्या कामाचे, धैर्याचे, चिकाटीचे, नेटाचे आणि हिरकणी स्पिरीटचे दाखले देताहेत. योगीतांची दोन्ही मुले आज कॉलेजात उच्चशिक्षण घेत आहेत आणि त्यांना त्यांच्या आईचा अभिमान आहे.
योगिता देशातल्या केवळ पहिल्या महिला ट्रक ड्रायव्हर आहेत इतकेच नव्हे, त्या देशातल्या जवळपास सर्व मोठ्या हायवेजवर ट्रक चालवून देशभरातल्या सर्व राज्यात ट्रक चालवलेल्या महिला आहेत असे नव्हे, तर त्या देशातल्या सर्वात जास्त शिकलेल्या ट्रक ड्रायव्हर आहेत. हिंदी सोबतच त्यांना मराठी, गुजराती आणि तमिळ भाषा सुद्धा छान बोलता आणि लिहिता येतात.
योगिता म्हणतात की ट्रक ड्रायव्हरच्या व्यवसायात त्यांना कधीच धोका वा भीती वाटली नाही पण तरीही त्यांना नेहमीच जागरूक राहून येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची मानसिकता ठेवावी लागते जेणेकरून खास महिला असल्याने काही अवघड प्रसंग निर्माण होणार नाही. आजपर्यंत एकदाच संध्याकाळी रस्त्यावर शेजारी ट्रक थांबवून जेवण करत असताना तिघा जणांनी त्यांच्यावर हल्ला केला होता पण त्याही अवस्थेत त्यांनी या तिघांना पिटाळून लावले आणि तेवढ्यात रस्त्यावर इतरांनी ट्रक थांबवून यांना मदत केली.
योगिता ट्रक चालवतांना पुरुष ट्रक ड्रायव्हर्सचे सर्व नियम काटेकोरपणे पाळतात, सहकारी ट्रक ड्रायव्हर आणि कर्मचारी यांना नितांत आदराने वागवतात, अन्य ट्रक ड्रायव्हर सुद्धा योगीतांचे खूप कौतुक करतात आणि त्यांना वाट्टेल ती मदत करतात.
योगिता आपले स्वतःचे जेवण ट्रक संध्याकाळी उभा राहिल्यावर जिथे असतील तिथे करतात, सर्वसामान्य ट्रक ड्रायव्हरप्रमाणेच सर्व ढाब्यांवर असणारी टॉयलेट्स वापरतात, ट्रकमध्येच रात्री सर्व आवश्यक ती काळजी घेऊन झोपतात, भल्यामोठ्या ट्रकचे टायर यदाकदाचित पंक्चर झाले तर सहकाऱ्याच्या मदतीने टायरसुद्धा बदलतात. पुरुष ट्रकड्रायव्हर प्रमाणेच व्यवस्थित आवश्यक असतील तश्या शिफ्टस करून ट्रक चालवून वेळेवर माल पोहोचवतात, माल उतरवणे, चढवणे या कामात सुद्धा सहकाऱ्यांना मदत करतात. ट्रक घेऊन बाहेरगावी गेलेल्या असताना देखील आपला ट्रक्सचा व्यवसाय प्रोफेशनली सांभाळतात, आपले ट्विटर हँडल सुद्धा सांभाळतात…
… आणि महत्वाचे म्हणजे आता कालौघात १२ गावाचे पाणी पिऊन तयार झालेल्या योगिता अजूनही स्वतःला नम्रपणे एक साधी भारतीय महिला म्हणवून घेतात…
“हम भारतकी नारी है, फ़ुल नहीं चिंगारी है’ हा वास्तव पथदर्शी अनुभव देशभरातल्या महिलांसाठी तयार करणाऱ्या भारताच्या या रणरागिणीला, योगिता रघुवंशी यांना सन्मानपुर्वक साष्टांग नमस्कार…
*******
लेखक : श्री मिलिंद वेर्लेकर
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈