श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ “ही देशाची खरी कन्यारत्ने …” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
होय, याच त्या कर्नल सोफिया कुरेशी मॅडम. तुम्ही आज भारताने पाकिस्तानी अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर चढवलेल्या हवाई हल्ल्याचे media briefing करताना पाहिलेल्या सैन्याधिकारी ! आणि त्यामध्ये सहभागी झालेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग !!
– – एक ASEAN मध्ये गवसलेलं रत्न ! आणि एक आकाशाने भारताला दिलेलं कन्यारत्न !
या दोघींनी आज जे केलं.. तो खरा इतिहास असणार आहे !
The Association of South East Asian Nations अर्थात ASEAN संघटनेचे नाव भारतासाठी नवीन नाही. आशियातील दक्षिणपूर्व देशांनी एकत्रित येऊन ही संघटना स्थापन केली आहे. अर्थातच आपल्या भारत देशाचा या चळवळीत मोठा वाटा आहे.
— — थायलंड,व्हिएतनाम,म्यानमार, सिंगापूर, फिलिपिन्स,मलेशिया,ब्रुनेई,लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक,इंडोनेशिया,कंबोडिया इत्यादी बहुदा १८ देश आसीयान मध्ये सामील आहेत. जगात इतर जागतिक महासत्ता असताना आणि त्या त्यांचे प्रश्न सोडवण्यात गुंतलेल्या असताना, त्यांच्या तुलनेने लहान असणाऱ्या देशांच्या स्वतःच्या काही समस्या असतात,त्या सोडवण्यासाठी या लहान देशांनी एकत्रित येणे गरजेचे होते.
या सर्व अठरा देशांच्या पायदळ सैन्याचा एक मोठा प्रशिक्षण आणि संयुक्त सराव २०१६ मध्ये पुण्यात पार पडला. यापैकी १७ देशांच्या सैन्याचे नेतृत्व पुरुष करीत होते…मात्र भारतीय सैन्यतुकडीचे नेतृत्व होते सोफिया कुरेशी या कणखर तरुणीकडे! भारतीय सैन्याच्या दळणवळण विभागात Corps of Signals मध्ये या एक अतिशय आदरणीय अधिकारी म्हणून गणल्या जातात. दळणवळण संदर्भातील कामांत त्या वाकबगार असून अतिरेकी विरोधी कारवायांत आघाडीवर असतात.
Asean सारख्या मोठ्या सैन्य संमेलनात भारतीय सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यांचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे ! त्यावेळी मेजर जनरल पदावर असलेले व पुढे Chief of Defence Staff या सर्वोच्च पदावर पोहोचलेले दिवंगत बिपीन रावत साहेब यांनी सोफिया यांच्याबद्दल बोलताना..’ त्या अंगभूत नेतृत्वगुण आणि कौशल्याच्या जोरावरच या सन्मानास पात्र ठरल्या आहेत..’ असे गौरवोद्गार काढले, हे लक्षणीय आणि सोफिया यांचे कर्तृत्व अधोरेखित करणारे आहे!
गुजरात मध्ये वडोदरा येथे १९८१ या वर्षी जन्मलेल्या सोफिया या microbioligy विषयात पदवीधर आहेत. त्यांचे आजोबा भारतीय सैन्यात धार्मिक शिक्षक पदावर कार्यरत होते..त्यामुळे त्यांच्यावर भारतीय सैन्याचे संस्कार लहानपणापासूनच होत गेले. त्यांनी १९९९ मध्ये OTA Chennai येथून भारतीय सेनेत प्रवेश मिळवला. २००१ मध्ये ऑपरेशन पराक्रम मध्ये त्या पंजाब येथे कर्तव्यावर होत्या. त्यांचे यजमानही mechanized infantry मध्ये कार्यरत आहेत!
सोफिया यांनी UN Peace Keeping Force मध्ये आणि पुढे Congo या युद्धग्रस्त देशात अनेक वर्षे सेवा बजावली असून त्यांना military negotiations आणि सेवाकार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.
आजच्या briefing मध्ये सहभागी झालेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या व्योमिका नावाचा अर्थच मुळी आकाश कन्या असा आहे..त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच हवाई दलात कारकिर्द घडवण्याचा चंग मनाशी बांधला होता. आणि हा हट्ट खराही करून दाखवला. भारतीय हवाई दलात एक अत्यंत धैर्यवान,कुशल हेलिकॉप्टर पायलट म्हणून त्यांचे नाव सन्मानपूर्वक घेतले जाते! चिता आणि चेतक नावांची अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स त्या लीलया उडवतात…अडीच हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणे त्यांनी यशस्वी केली असून काही वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेशात आलेल्या नैसर्गिक आपत्तींमध्ये त्यांनी अत्यंत खराब हवामानात एकही अपघात होऊ न देता संकटग्रस्त लोकांची सुटका करण्यात यश मिळवले होते. व्योमिका सिंग यांनी २१,६५० फूट उंचीवर असणाऱ्या माउंट मणिरंग शिखरावर यशस्वी चढाई सुद्धा करून दाखवली आहे! २००४ मध्ये हवाई दलात प्रवेश मिळवलेल्या व्योमिका मॅडम २०१७ मध्ये विंग कमांडर बनल्या!
या दोघींनी ही briefing ची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली .. आणि त्यांच्या द्वारे भारतीय सैन्य आणि राजकीय नेतृत्व यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला आहे….सुवासिनी महिलांचे सौभाग्य कुंकू पुसणाऱ्या नेभळट देशाला या आरशात काही दिसेल, ही अपेक्षा !
India is proud of you both…
Col. Sofiya madam and Wing Commander Vyomika Singh madam …Jai Hind!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈