कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? इंद्रधनुष्य ?

☆ “दुश्मनी में भी इक शराफत रखते हैं…” भाग – २ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

(कॅम्पमध्ये पोचल्यानंतर आमच्यापैकी काहीजण रेडक्रॉसतर्फे मिळालेली पुस्तके वाचण्यात दंग झाले, तर काहीजणांनी धार्मिक वाचन व प्रार्थनेला वाहून घेतले. काही थोडेजण मात्र अगदीच सैरभैर झाले आणि अखेरपर्यंत निराशेच्या गर्तेतच राहिले.) – इथून पुढे —– 

डुंगरसिंग नावाचा एक सुभेदार आमच्या कॅम्पचा प्रमुख जेसीओ (ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर) होता. कॅम्पचे व्यवस्थापन आणि आमच्यामध्ये असलेला तो एकमात्र दुवा होता. सडसडीत बांध्याचा, मध्यम उंचीचा, काळा-सावळा डुंगरसिंग तसा दिसायला सामान्यच होता. मात्र त्याचे अंतरंग हळूहळू उलगडत गेले. तो एक अतिशय कर्तव्यनिष्ठ, सरळसाधा, मनमिळाऊ आणि संवेदनशील माणूस वाटे. प्राप्त परिस्थितीत त्याने आणलेले ते सोंग असू शकेल असे कुणालाही वाटणे साहजिक होते, पण कालांतराने घडलेल्या काही गंभीर प्रसंगातून मला त्याचा खरा स्वभाव कळत गेला.

भारतीय सैन्यातल्या एका इन्फन्ट्री बटालियनमध्ये शिपाई म्हणून भरती होऊन सुभेदार पदापर्यंत पोचलेला डुंगरसिंग रोहतक-हिसार भागातला राहणारा होता. आमच्याकडच्या पंजाबी लोकांप्रमाणेच भारतातले रोहतकी लोकदेखील बोलण्या-वागण्यामुळे काहीसे आडदांड वाटले तरी वृत्तीने साधेसरळ असतात. त्यांची रोखठोक पण काहीशी शिवराळ अशी उर्दूमिश्रित पंजाबी भाषा आणि नर्मविनोदी बोलणेही सहजच मनाला भिडणारे असते.

आम्हाला लागणाऱ्या, साबण, टूथपेस्ट व ब्रश, दाढीचे सामान, अशा दैनंदिन वापराच्या वस्तूंची एक यादी करून महिन्याच्या सुरुवातीला डुंगरसिंगकडे सुपूर्द करणे हे माझे काम होते. दरमहा भत्त्यापोटी मिळणाऱ्या दरडोई ९० रुपयांमधून ही खरेदी केली जाई. या व अशा प्रकारच्या संभाषणातून माझा व डुंगरसिंगचा परिचय वाढत गेला आणि आमच्यादरम्यान एक वेगळेच नाते निर्माण झाले. त्या विलक्षण माणसासोबतच्या नात्याचे स्मरण ठेवूनच आज चाळीसहून अधिक वर्षानंतर माझे हे मनोगत मी लिहितो आहे.

पैसे, घड्याळे, अंगठ्या वगैरे मौल्यवान वस्तू बाळगायला बंदी असल्याने त्या आमच्याकडून आधीच काढून घेतल्या गेल्या होत्या. माझी साखरपुड्याची अंगठी मी मोठ्या हिकमतीने लपवून ठेवलेली होती. एके दिवशी मी ती अंगठी कुरवाळत बसलेलो असताना अचानकच डुंगरसिंगने मला पाहिले. ती अंगठी माझ्या वाग्दत्त वधूने मला दिली असल्याने ती जमा केली नसल्याचे मी त्याला सांगितले. डुंगरसिंगच्या पुढच्या वाक्यामुळे, त्याची संवेदनशीलता आणि त्याच्या मनाच्या मोठेपणाबाबत माझी खात्री झाली, “साहेब, देव तुमचे भले करो. ती मुलगी खरोखरच मोठी भाग्यवान आहे. “

काही दिवसातच, आमच्या खोलीतून आम्ही एक भुयार खणायला सुरुवात केली होती. रोज रात्री थोडे-थोडे काम आम्ही करत होतो. आमच्यापैकी एकजण खिडकीशी बसून टेहळणी करत असे. कॅम्पचे एकमेव प्रवेशद्वार तिथून दिसू शकत होते. प्रवेशद्वारापासून आमच्या खोलीपर्यंत पोचायला सहजच पाचेक मिनिटे लागत असत. माझी खणायची पाळी संपवून मी विश्रांती घ्यायला पाठ टेकणारच होतो तेवढ्यात खोलीच्या दरवाज्यावर जोरजोराने थापा पडू लागल्या. आमच्या ‘टेहळणी बुरुजा’ला बहुदा मध्येच डुलकी लागली होती. आमची एकच तारांबळ उडाली. कॅम्प व्यवस्थापनाला पक्की खबर मिळाली असणार. म्हणूनच भारतीय शिपाई तडक आमच्या खोलीपर्यंत येऊन पोचले होते. आमच्या बराकीची बित्तंबातमी डुंगरसिंगशिवाय कुणाकडे असणार होती?

आम्ही घाईघाईने सर्व झाकपाक केली आणि दरवाजा उघडण्यापूर्वी झोपेच्या नाटकाचे संपूर्ण नेपथ्य तयार केले. आम्हाला बराकीतून बाहेर काढून उभे केले गेले. खोलीची झाडाझडती सुरु झाली. बाहेर पडण्यापूर्वी, माझी अंगठी मी शिताफीने माझ्या सामानातून काढून माझ्याजवळ ठेवली होती. पण लगेच आमची अंगझडतीही सुरु झाली. अंधारातच माझ्या खांद्यावर कुणीतरी हलकेच थापटल्यासारखे केले आणि एक हात माझ्यापुढे पसरला गेला. तो डुंगरसिंगचा हात होता. मी काय करणे अपेक्षित होते हे मला कळून चुकले. मुकाट्याने त्याच्या हातावर माझी अंगठी मी ठेवली. झडतीची कारवाई संपली आणि डुंगरसिंगासह सगळी पार्टी निघून गेली. आमचा पलायनाचा बेत तर फसलाच होता, पण त्या रात्री मला झोप लागणे तसेही अशक्यच होते. त्या अंगठीतल्या सोन्याचे वजन आणि त्याच्या किंमतीची मला पर्वा नव्हती. पण ज्या प्रतिकूल परिस्थितीत मी होतो त्या काळातला माझा एकमेव भावनिक आधार मी गमावला होता!

दुसऱ्या दिवशी मंद हसत आणि डोळे मिचकावत सुभेदार डुंगरसिंग माझ्यापाशी येऊन म्हणाला, “तुम्ही लोक काहीनाकाही ‘चमत्कार’ दाखवण्याच्या तयारीत असणार याची कल्पना मला होतीच. इतर बराकीतल्या लोकांपेक्षा अधिक लाल दिसणारे तुमचे डोळेच सर्व काही सांगत होते! ” हे बोलत असतानाच डुंगरसिंगने खिशातून एक कागद काढून गुपचूप माझ्या हातात कोंबला. त्या कागदामध्ये माझी अंगठी गुंडाळलेली होती!

डुंगरसिंगच्या माणुसकीचा मला त्या दिवशी आलेला प्रत्यय मोठा विलक्षण होता.

आमच्या प्रियजनांकडून आलेली पत्रे रेड क्रॉसतर्फे आम्हाला मिळत असत. अर्थातच ती कॅम्प व्यवस्थापनाद्वारे उघडून, वाचून, सेन्सॉर केली जात. सुभेदार डुंगरसिंग ती पत्रे आमच्यापर्यंत पोचवत असे. आमच्यापैकी विवाहित आणि मुलेबाळे असलेल्या अधिकाऱ्यांच्या मुलांची नावे, इयत्ता, त्यांचे छंद अशा गोष्टीही हळूहळू डुंगरसिंगला पाठ झाल्या होत्या. त्या अधिकाऱ्यांशी तो त्याविषयी चर्चा करत असताना असे वाटे की जणू तो स्वतःच्याच कुटुंबाविषयी बोलत असावा. डाक येण्याच्या दिवशी एखाद्या अधिकाऱ्याच्या नावे एकही पत्र न आल्यास, डुंगरसिंग अगदी आत्मीयतेने त्या अधिकाऱ्याची समजूतही काढत असे.

डुंगरसिंगच्या चांगुलपणाची परतफेड करण्याची संधी एके दिवशी मला मिळाली. आमच्या बराकीच्या कोपऱ्यातल्या त्याच्या ठराविक जागी बसून तो हळूहळू हुंदके देत असल्याचे मला दुरूनच जाणवले. मी त्याच्या जवळ पोचेपर्यंत, आपले अश्रू पुसून शांत दिसण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. परंतु, मी त्याच्या खांद्यावर हात ठेवताक्षणी मात्र त्याचा बांध फुटला. सुभेदार डुंगरसिंग हमसून-हमसून रडू लागला. १५-१६ वर्षांची त्याची मुलगी अचानकच वारल्याचे त्याला नुकतेच पत्राद्वारे समजले होते. तिच्या अंत्यसंस्कारालाही तो जाऊ शकला नव्हता!

युद्धात जिंकलेला सैनिक असो किंवा पराभूत सैन्यातील एखादा युद्धकैदी असो, दोघेही मनुष्येच तर असतात. त्यांच्या भावभावनाही एकसारख्याच असतात. त्यांना आपापली दुःखे एकाच तीव्रतेने टोचतात किंवा आनंदही सारख्याच उत्कटतेने होत असतो!

कालांतराने, कैदेतून आमची सुटका होण्याची वेळ आली. सुभेदार डुंगरसिंग काहीशा विमनस्क अवस्थेत होता. त्याच्या मनात दोन परस्परविरोधी भावना उचंबळत असाव्यात असे जाणवले. परंतु, त्या दोन्ही भावना त्याच्या नैसर्गिक स्वभावधर्माला अनुसरूनच होत्या. युद्धकैद्यांची पहिली तुकडी रवाना झाली तेंव्हा त्याचे डोळे भरून आले होते. डोळ्यातले अश्रू कसेबसे मागे सारत तो चेहऱ्यावर उसने हसू आणू पाहत होता, पण त्याचे थरथरणारे ओठ सत्य सांगून गेले. आम्ही मायदेशी परतणार म्हणून तो आमच्या आनंदात सहभागी होता, पण आमच्या जाण्याचे दुःखही तो लपवू शकत नव्हता.

मनाने पर्वताएवढ्या विशाल अशा डुंगरसिंग नावाच्या माणसाचा अल्प सहवास मला लाभला हे माझे थोर भाग्यच म्हणायचे. तो जिथे असेल तिथे परमेश्वराने त्याला सर्व सुखे द्यावीत इतकीच माझी प्रार्थना आहे. त्या कठीण काळातले आमचे दिवस त्याच्यामुळे अविस्मरणीय होऊन गेले!

– समाप्त – 

[ब्रिगेडियर मेहबूब कादिर (सेवानिवृत्त) यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा त्यांच्या पूर्वानुमतीसह केलेला भावानुवाद]

लेखक / अनुवादक : © कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments