डाॅ. मीना श्रीवास्तव
इंद्रधनुष्य
☆ ‘१ मे ची कहाणी…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
दरवर्षी १ मे हा दिवस आपण “ महाराष्ट्र दिन “ म्हणून उत्साहाने साजरा करतो. या महाराष्ट्र दिनाचा हा इतिहास जाणून घेऊ या.
या इतिहासाला काळी चौकट आहे ती हुतात्म्यांच्या रक्तलांछित बलिदानाची ! २१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी मुंबईच्या फ्लोरा फाउंटनच्या आसपास तणाव जाणवत होता. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. या अन्यायकारक निर्णयामुळे मराठी माणसाचा संताप शिगेला पोचला होता. सर्वदूर होणाऱ्या सभांमधून या निर्णयाचा जाहीर निषेध होत होता. याचा परिणाम म्हणजे मराठी अस्मिता जागी झाली. सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाऊंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर मोठा जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून अत्यंत त्वेषाने घोषणा देत, फ्लोरा फाउंटनच्या ठिकाणी गोळा झाला. तो पांगवण्याकरता पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र मोर्चेकरी बधले नाहीत. मग मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले आणि शेवटी १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. म्हणून १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.
या १०६ हुतात्म्यांनी जिथे बलिदान केले त्या फ्लोरा फाउंटनच्या चौकात १९६५ मध्ये हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. आता तो ‘हुतात्मा चौक’ म्हणून ओळखला जातो. या आंदोलनात आचार्य अत्रे यांचे प्रत्यक्ष रित्या आणि त्यांच्या मराठा या दैनिकात छापल्या जाणाऱ्या ज्वलंत लेखांचे खूप मोठे योगदान आहे.
१ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणूनही ओळखला जातो. ४ मे १८८६ मध्ये अमेरिकेतील कामगारांनी आठ तास काम करण्यास नकार दिला आणि आपल्या न्यायहक्कासाठी संप केला. शिकागोत अनेक कामगार ठार झाले. त्यानंतर १८८९ मध्ये या कामगारांच्या स्मरणार्थ १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्याची घोषणा समाजवादी संमेलनात करण्यात आली. म्हणूनच दरवर्षी जगभरात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा 🌹🙏
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈