श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

|| श्री नारद उवाच || 

सात्वस्मिन्परमप्रेमरूपा ॥ २ ॥

सा – ती (भक्ती), अस्मिन् – या, प्रत्यक्ष नित्यअपरोक्ष परमात्म स्वरूपाचे ठिकाणी, परमप्रेमरूपा – म्हणजे परमप्रेम असणे हेच तिचे स्वरूप (अशी आहे).

वरील सूत्राचा अर्थ सोप्या शब्दात पुढील प्रमाणे सांगता येईल. भक्ति हे परमप्रेमरूप आहे. खरंतर इतका सुलभ अर्थ असताना याचे अधिक विवरण करण्याची गरज आहे? पटकन उत्तर नाही असेच येईल, पण गरज आहे हेच त्या प्रश्नांचे खरे उत्तर आहे.

या नश्वर जगातील प्रत्येक जण प्रेमाचा भुकेला आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. इतकेच नव्हे तर प्रत्येक जण कमीअधिक प्रमाणात दुसऱ्यांवर प्रेम करीत असतो, हे आपल्याला मान्य असेल…!

आणखी एक गोष्ट आपल्याला सर्वांना मान्य होण्या सारखी आहे ती म्हणजे सामान्य मनुष्य ज्याला प्रेम म्हणतो किंवा प्रेम करतो ते प्रेम नसते, तर स्वार्थापोटी केलेली कृति असते. एका गावात एक कुटुंब होते, त्या पती पत्नीचे एकमेकांवर निरतिशय प्रेम होते. दुर्दैवाने त्यातील पतीचे आकस्मिक निधन झाले. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. लोकं अंत्ययात्रेला जमले. पत्नी कलेवर उचलू देईना. शेवटी गावातील म्हाताऱ्या बायकांनी तिची समजूत काढली आणि अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा वेशीपर्यंत पोचते न पोचते तोच त्या स्त्रीचा आवाज लोकांना ऐकायला आला. ती म्हणाली, भाऊ, यांच्या करगोट्याला तिजोरीची चावी आहे, ती काढून द्या…

तर, सामान्य मनुष्य असे प्रेम करतो.

आपण आता खऱ्या प्रेमाचे खरे (सत्यकथा) उदाहरण पाहू.

एक मोठे कीर्तनकार होऊन गेले. आयुष्यभर त्यांनी पांडुरंगाची सेवा केली. वयोमानानुसार दोघांनाही वृद्धत्व आले. त्यांच्या शेवटच्या आजारपणात घरातील मंडळींनी असे ठरवले की महाराजांचे काही बरेवाईट झाले तर त्यांच्या पत्नीला लगेच सांगायचे नाही. त्यांना ते सहन होणार नाही….

एके दिवशी महाराजांनी प्राण सोडला. बातमी घरातील कर्त्याला सांगण्यात आली. घरावर दुःखाचा डोंगरच कोसळला…. ! पुरेशी काळजी घेऊनही ती बातमी कोणीतरी त्या माउलीला सांगितली. बातमी ऐकताच ती माउली म्हणाली की आगी, महाराज गेले !! मग मी इथे काय करते ? त्या माउलीने त्याक्षणी प्राण सोडला…. !

याला म्हणतात, “संपूर्ण समर्पण, परमप्रेम!!!”

मनुष्याचे खरे प्रेम कोणावर असते ? सांगा पाहू. कोणी म्हणेल, आईवर, कोणी म्हणेल बाबावर, कोणी काही कोणी काही सांगेल. सर्व उत्तरे कदाचित बरोबर असतील पण अचूक असतीलच असे म्हणता येणार नाही. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, मनुष्य आपल्या देहावर सर्वात जास्त प्रेम करतो. देहाला जरा कष्ट झाले तरी मनुष्याचे चित्त विचलित होतं. मनुष्य 

दिवसभर देहाला सुख कसे लाभेल, यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतो. (यातून त्याला किती सुख मिळते, हा प्रश्न न विचारलेला बरा…)

भगवतांनी एकट्याला करमेना, म्हणून हा पसारा निर्माण केला, पण तो सर्व व्यापून वेगळा राहिला. मनुष्य पण एकट्याला करमत नाही, म्हणून प्रपंच पसारा निर्माण करतो, पण मनुष्य मात्र त्या पसाऱ्यात गुरफटला जातो, इथेच त्याची फसगत होते…, असो.

लौकिक व्यवहारात मनुष्य प्रेम करतो ते वस्तूसापेक्ष किंवा व्यक्तिसापेक्ष असते. पण परमार्थमार्गात प्रगती सुरु झाली की तेच प्रेम ‘योग’ बनते. सर्वत्र एकच भगवंत आहे अशी पक्की खात्री झाली कि द्वैत गळून पडते आणि सद्गुरु आणि मी एकच आहोत, याची अनुभूती येते. हा साधनेतील परमोच्च बिंदू म्हणता येईल.

निःस्वार्थी प्रेमाची अनुभूती देणारी सर्वात पहिली व्यक्ती म्हणजे आपली जननी (आई). आपल्या बाळाचे लिंग, चेहरा, रंग, सौंदर्य काहीही माहित नसताना ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. आपले सद्गुरु देखिल आपली जीवापाड काळजी घेतात, आपण प्रपंचात बुडतोय हे बघून त्यांच्याही जीव आपल्यासाठी तिळ तिळ तुटतो. पण जेंव्हा एखादा ब्रम्हानंद बुवासारखा सत्शिष्य भेटतो तेंव्हा सद्गुरुंना प्रसूतीचा आनंद मिळतो, दोघेही प्रेमात न्हाऊन निघतात, दोघेही एका विशिष्ठ सम पातळीवर एकरूप होतात, मग तिथे कोणी गुरू नसतो, कोणी शिष्य नसतो, सर्वत्र प्रेम प्रेम आणि प्रेम भरून राहते.

” तिर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल… “ असा सर्व परिवार ‘विठ्ठल’ झाल्याची अनुभूती तो साधक घेतो.

संत तुकाराम महाराजांचे पांडुरंगावर निरतिशय प्रेम होते. ते प्रेम पुढील प्रमाणे व्यक्त करतात. साधकांसाठी हा आदर्श ठरावा.

आवडे हे रूप गोजिरे सगुण

पाहता लोचन सुखावले || धृ. ||

*

आता द्रूष्टी पुढे एसाची तू राहे

जो मी तुज पाहे वेळोवेळा || १ ||

*

लाचावले मन लागलीस गोडी

ते जीव न सोडी ऐसे झाले || २ ||

*

तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी

पुरवावी आळी माय बाप || ३ ||

(अभंग क्रमांक ३१३८, सार्थ तुकाराम गाथा. धार्मिक प्रकाशन संस्था)

देवर्षी नारद महाराज की जय!!!

– लेख दुसरा 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments