श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ अमृताची तळी राखू या… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

पुढच्या पिढीनं खरा महाराष्ट्र राखला पाहिजे, हे अगदी बरोबर आहे. पण राखण्यासाठी तो आधी जाणून घेतला पाहिजे, त्याला समजून घ्यावं लागेल. तो पर्यटनाच्या आणि मौजमजेच्या पलिकडे जाऊन पहावा लागेल.. !

वेड्या बाभळींमध्ये अडकलेल्या इतिहासाच्या खुणांचे श्वास मोकळे केले पाहिजेत.. गडोगडची दैवतं पाहिली पाहिजेत, पुजली पाहिजेत. तिथं घटकाभर बसून त्या वैभवी काळात डोकावून बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपले उघडे डोळे ४०० वर्षं मागं जाऊन गतकाळ पाहू लागतील.

प्रतापगडावरच्या आईभवानीचा आशीर्वाद घेऊन थोरले राजे अफजलखानाच्या भेटीस उतरले तेव्हां प्रतापगडाच्या दरवाज्यास काय वाटलं असेल, हे आपण विचारलंय का कधी? भर पावसात अंधाऱ्या रात्री ज्या राजदिंडीनं राजे पन्हाळा उतरले, ती पार नामशेष होऊ घातलेली दिंडी पाहिलीय का आपण? कधी विचारलंय का तिचं मनोगत? तान्हाजीरावांच्या समाधीपाशी बसलोय का आपण? थोडीथोडकी नव्हे, जवळपास चार शतकं उन्हातान्हाचे मार झेलत उभ्या असलेल्या बाजींच्या समाधीची वास्तपुस्त केली का आपण? “तुटून पडतां मस्तक खाली धुंद धडाने लढलेले” असं ज्यांचं वर्णन आहे, त्या मुरारबाजींची समाधी पाहिली आहे का आपण?

रायरेश्वरावर शिवरायांनी वाहिलेला बेलभंडारा दिसलाय का आपल्याला? महाबळेश्वर क्षेत्री शिवरायांनी त्यांच्या मातोश्रींची केलेली सुवर्णतुला दिसली का आपल्याला? नागोजी जेध्यांच्या घरी सांत्वनासाठी गेलेले शिवाजीराजे आपण पाहण्याचा प्रयत्न केलाय का? आपले बालपणापासूनचे जिवलग मित्र सूर्याजी काकडे धारातीर्थी पडल्याची बातमी कळल्यानंतर शोकाकुल झालेले राजे आपल्याला दिसले का? 

त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे ही नावं कदाचित कित्येकांना ठाऊकही नसतील. राजे आग्र्याहून निसटले, त्यानंतर फुलादखानाने आग्र्यात जोरदार झाडाझडती सुरु केली. त्यात शिवाजी महाराजांचे हे दोन वकील सापडले. तब्बल नऊ महिने त्यांचा अनन्वित छळ सुरु होता. आपली दोन माणसं हकनाक नरकयातना भोगत आहेत, या जाणिवेनं राजे अस्वस्थ होते. त्यांनी या दोघांच्या सुटकेबाबत औरंगजेबाशी पत्रव्यवहार केला. नऊ महिन्यांनी दोघे सुटले. त्यांना राजगडावर भेटताना राजांच्या मनी कोणते भाव असतील ?

बहिर्जी नाईक असोत, बाळाजी आणि चिमणाजी देशपांडे असोत, कान्होजी जेधे असोत, रामाजी पांगेरा असोत, यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय आपल्या मुलांना व्हायला नको का? महाराजांचे सुवर्ण सिंहासन साकारणारे रामजी दत्तो चित्रे आपल्या मुलांना का ठाऊक नसावेत?

जंजिऱ्याच्या तटाला शिड्या लावून रात्रभर कुमक येण्याची वाट पाहत बसलेल्या लायपाटलाचं कौतुक करणारे शिवाजीराजे, बजाजी नाईक निंबाळकरांची घरवापसी करवून घेणारे शिवाजीराजे, सप्तकोटेश्वराची पुनर्स्थापना करणारे शिवाजीराजे, पाचाड कोटात तक्क्याच्या बावेवर बसून आजुबाजूच्या आयाबहिणींशी सहज गप्पागोष्टी करणारे शिवाजीराजे, स्वतःच्या आईला सती जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे शिवाजीराजे… हे राजे जाणून घेतले तर आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात किती अमूल्य फरक पडेल.. !

आपला इतिहास, आपल्या परंपरा, आपली संस्कृती, आपली विचारधारा जाणून घेणं हे काम वाटतं तितकं सोपं नाही. मराठी इतिहास इतक्या अतर्क्य आणि विस्मयकारक गोष्टींनी भरलेला आहे की, त्याचा वेध घेताना आपण आजही मंत्रमुग्ध होतो. भल्याभल्यांची मती गुंग होते. पण आपल्या मुलांना ह्या सगळ्याचा परिचय आहे का? आणि तो परिचय असला पाहिजे असं त्यांच्या पालकांना मनापासून वाटतं का?

गावोगावी शालेय मुलांच्या पाठांतराच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. पण त्यात कवी भूषणाचे छंद म्हणून दाखवण्याची स्पर्धा मी पाहिली नाही. शालेय संस्कृत अभ्यासक्रमात सुभाषितमाला असतात. पण त्यात कवींद्र परमानंद गोविंद नेवासकरांच्या शिवभारतातले श्लोक नाहीत. आज्ञापत्र, राज्यव्यवहारकोष यांच्यावर आधारित धडे नाहीत. पोवाडे नाहीत, कवनं नाहीत. परिचय होणार कसा?

संस्कृती आणि इतिहासातल्या उत्तम चंदनी गोष्टी आपल्यापर्यंत आल्या, त्या जतन करण्यासाठी. पुढच्या अनेक पिढ्यांना चांगली प्रेरणा मिळावी, त्यातून त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी, त्यांच्या जगण्याला सुबक आकार यावा, असा इतिहासाचा सकारात्मक उपयोग आपल्याला करता येणार नाही का? इतिहासातलं विकसन आणि गुणवत्ता उलगडून दाखवता येईल का? त्यातून या सगळ्या परंपरेचे वारशाचे जाणकार आणि जतनकार तयार होतील का? यासाठी आपण सारे प्रयत्न तरी करुया.

ही अमृताची तळी आपल्या महाराष्ट्राला भरभरुन मिळाली आहेत, हे आपलं भाग्य. आता ती तळी अभ्यासपूर्वक राखणं, पुढच्या पिढ्यांना तयार करणं आणि त्यातलं चैतन्य अक्षय्य जपणं ही तर आपलीच जबाबदारी.. !

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments