श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “ब्लड रिपोर्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
…….
सकाळी चहा पिण्याआधी, आणि जेवणानंतर साधारण दिड तासाने, अशा दोन्ही वेळेस सुई टोचून घेत दिलेल्या रक्ताचे रिपोर्ट आता हातात पडले होते.
शाळेत असतांना वार्षिक परिक्षेचा निकाल मिळण्याआधी जेवढी उत्सुकता असायची तेवढीच आजही ब्लड रिपोर्ट साठी होती.
फक्त शाळेत भाषा, गणीत, सामाजिक शास्त्र, विज्ञान असे विषय आणि त्यापुढे कमीतकमी आवश्यक असणारे, आणि मिळवलेले गुण असे आकडे असायचे. तर इथे CBC, Liquid Profile
Liver function test, Thyroid profile
Urine-R/M
Blood sugar- Fasting&PP
HbA1c अशी नांव असणाऱ्या विषयांपुढे रक्तात आवश्यक असणारे आणि सापडलेले गुण यांची आकडेवारी होती.
शाळेत काही ठिकाणी अर्धा अर्धा गुण देऊन अपूर्णांकात आमची (पूर्ण नसलेली) बौद्धिक क्षमता दाखवणारे शिक्षक होते. तर रिपोर्ट मध्ये सुद्धा असेच अपूर्णांकात आकडे देत आमच्या शरीराची क्षमता दाखवली होती.
शाळेतल्या विषयात बरेच कष्ट (ज्याला सोप्या भाषेत अभ्यास म्हणतात.) करून जेमतेम गुण मिळवण्यापर्यंत मजल मारली जात होती. पण या ब्लड रिपोर्टमधल्या काही विषयांचे आकडे मर्यादित ठेवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागणार होते. म्हणजे शाळेत आकडे वाढवण्यासाठी कष्ट. तर रिपोर्ट मधले काही आकडे कमी करण्यासाठी प्रयत्न.
माझ्या अर्धांगिनीने सगळा रिपोर्ट पाहिला असला तरी तिचा फोकस मात्र फक्त शुगर या एका गोड असणाऱ्या आणि या वयात जाणवणाऱ्या गोष्टीवर जास्त होता.
आणि ती हळूच म्हणाली… रिपोर्ट तुमचाच आहे नां…
मी म्हटलं हो… पण का विचारतेस असं…
नाही, शुगर थोडीशी प्रमाणाबाहेर आहे म्हणून. आणि त्या बद्दलच मला शंका वाटली… म्हणजे बाकी काही वाढणं शक्य असेल… पण शुगर…
बोलतांना जराही गोडवा नसणाऱ्या तुमच्या रक्तात इतकी शुगर आलीच कुठून. हाच विचार मनात येतोय. बरं गोड बोलण्याचा प्रयत्न केल्यावर तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या गोडव्याने रक्तातली शुगर कमी होईल का?… किंवा ज्याच्या रक्तातच इतकी शुगर आहे, त्यांच बोलणं गोड का नाही?… असाही विचार आला.
इतक्या वर्षात तुम्हाला मी पूर्ण ओळखते. यांनी फक्त रक्ताच्या काही थेंबांचा अभ्यास करून सांगीतलेला गोडवा मला कधीच दिसला, किंवा जाणवला का नाही?… असे वेगवेगळे विचार फक्त कागदावर दाखवलेल्या तुमच्या गोडव्यामुळे मनात आले… रक्तातला गोडवा वागण्यात का दिसत नाही. संक्रांतीला सुद्धा सगळे तिळगुळ घ्या गोड बोला, असं म्हणतात. पण तुम्हाला हातावर तिळगुळ ठेवल्यावर तोंडाने फक्त गोड बोला. इतकच म्हणतात.
इतकं बोलल्यावर ती खरंच अर्धांगिनी आहे याची खात्री झाली. आता कंट्रोल करायच्या गोष्टींवरून मला ट्रोल केल जात होतं.
पराभूत उमेदवारांना जसं वाढलेले मतदार, ठराविक वेळी वाढलेलं मतदान, याचबरोबर यंत्रांत काही घोळ आहे का? … कारण समोरच्याला इतकी मतं मिळतातच कशी?… अशी शंका येते. तशीच काहीशी शंका तिला माझ्या शुगर बद्दल आहे. गोडवा नसताना शुगर वाढतेच कशी?…
शाळेच्या रिपोर्ट मध्ये सगळ्या गुणांची गोळाबेरीज करून पुढच्या वर्गात ढकलला आहे. परिश्रम घ्या. असा शेरा असायचा. तर या रिपोर्ट वरुन गोळाबेरीज करून पुढलं वर्ष चांगलं जाण्यासाठी परिश्रम घ्या. उगाचच चालढकल करु नका. हेच सांगतील. शाळेत ढकलल्यामुळे पुढल्या वर्गात जात होतो. तर आता पुढल्या वर्षात जायचं असेल तर चालढकल चालणार नाही असंच सांगतील.
रिपोर्ट मधल्या पुढच्या काही विषयांकडे बारीक नजर जाण्याआधीच मी शांतपणे तो रिपोर्ट घडी करून पाकिटात टाकला. आणि आलोच डाॅक्टरांना भेटून. असं सांगत बाहेर पडलो.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈