श्री कौस्तुभ परांजपे
विविधा
☆ “पाणीपुरी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
अरे किती मोठ्ठा घास घेतला आहेस. चावता तरी येतय का? तोंड बघ…… फुगलय नुसत. येवढा मोठ्ठा घास घेतात का? अस दरडावून, रागाने, किंवा प्रेमाने विचारणाऱ्यांच तोंड पाणीपुरी खाताना याच पद्धतीने भरलेल असत. पाणीपुरी खाण्याची दुसरी पद्धतच नाही.
इतर पदार्थांचा घास किती मोठा असावा हे आपण ठरवू शकतो. पण छोटा छोटा घास घेऊन पाणीपुरी खाताच येत नाही. पाणीपुरीचा घास हा फक्त आणि फक्त त्या पुरीच्या आकारावरच ठरत असतो. या पुरीच्या आकारात स्माॅल, मिडीयम, लार्ज असा प्रकार माझ्या पाहण्यात नाही.
वेगवेगळ्या चवीच चवदार पाणी एकत्र त्या पुरीत भरून जेव्हा ती तोंडात भरतो किंवा सरकवतो तेव्हा त्यातलं पाणी तोंडावाटे बाहेर पडणार नाही ना याचीच कसरत करावी लागते.
ही कसरत करुन ती पूरी तोंडात सरकवल्यावर जर आतल तिखट पाणी पटकन घशात उतरल तर मात्र काही क्षण जिवाचं पाणी पाणी होतच आणि नकळत डोळ्यांच्या कडांना देखील पाणी जमा झाल्यासारखं वाटत. कधी कधी तर नाकावाटे सुध्दा……
जळजळ हा शब्द आपण कधी कधी वापरतो. पण तो समजवून सांगायचा असेल तर….. पाणीपुरी तोंडात सरकवल्यावर ती खातांना नकळत आणि पटकन जे तिखट पाणी घशातून छातीपर्यंत गेल्यावर जी जाणीव होते ती जळजळ. आणि ही तात्पुरती असली तरी पाणीपुरी खाताना व्यवस्थित जाणवते.
या पुरीला नाजूकपणे व हळूवार हाताळाव लागत. नाहीतर आपला जबडा उघडण्या अगोदरच ती तिचा जबडा उघडते आणि त्यातल्या पाण्याने बोटं चिकट होतात. त्यामुळे तिने तिचा जबडा उघडण्याअगोदर आपला जबडा उघडा करून ती त्यात ढकलण्याची काळजी घ्यावी लागते.
पाणीपुरी मधल पाणी कमी वाटत कि काय, त्यात अजून उकडून बारीक केलेला बटाटा आणि उकडून किंवा भिजवून ठेवलेले हरभरे घालून परीक्षा थोडी कठीण करतात.
पाणीपुरी ही तोंडात भरावी, सरकवावी, किंवा ढकलावीच लागते. या पध्दतीने खाल्ली तरच तिला न्याय दिल्यासारख होत. नाहीतर तिच्यावर झालेला अन्याय ती पाणी अंगावर किंवा प्लेटमध्ये काढून व्यक्त करते.
ही तोंडात भरण्याची सुध्दा एक खास पध्दत आहे. दोन बोट आणि अंगठा यात तिला धरून तोंडाचा जबडा उघडा करून तोंडाजवळ आणली की लगेच वेळ न घालवता तर्जनीने तोंडात सरकवतात.
यावेळी मला सहज शेव, चकली, कुरडइ यांच ओल पिठ, किंवा चिक त्या मोकळ्या साच्यात भरतात त्याची आठवण होते.
पाणीपुरी खायला वेळेच बंधन नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र. जेवणाअगोदर किंवा नंतर अशी कोणतीही वेळ त्यासाठी योग्य असते. पण ठिकाण मात्र बऱ्याचदा बाग, मैदान, तलाव याच्या जवळ आणि जवळजवळ रस्त्यावरच असत. बंद वातावरणात मजा नाही. आता घरातल्या सगळ्यांना घरातच करतो तेव्हा पर्याय नाही. पण शक्यतो उघड्यावर खाण्यातच मजा येते.
पाणीपुरी साधारण एकाचवेळी बऱ्याच जणांना एक एक करून दिली जाते. त्यामुळे पहिली तोंडात सरकवल्यावर दुसरीचा नंबर लागेपर्यंत पहिली संपवावीच लागते.
पाणीपुरी हा काही जणांचा विकपाॅइंट असतो. तर विकली कुठल्या कुठल्या पाॅइंटवर पाणीपुरी खायची हे काही जणांच ठरलेल असत. तरीसुद्धा गावात पाणीपुरी कुठे चांगली मिळते याची माहिती घेण्याचा प्रयत्न असतोच. आणि तिथे भेट देणं गरजेचं वाटतं.
बरेच पदार्थ हे हातगाडीवर उभ्या उभ्या खाल्ले जात असले तरी एक दोन बाक त्या गाडीजवळ बसण्यासाठी असतात. पण पाणीपुरीच्या गाडी जवळ असे बाक क्वचित दिसतात. त्यामुळे स्टॅंडींग ओवेशन देउन खायचा मान पाणीपुरीला आहे.
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈