श्रीमती उज्ज्वला केळकर
विविधा
☆ सागरा(चा) प्राण तळमळला… भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
पाण्याची मला अगदी लहानपणापासून ओढ आहे. तळ्याचे ध्यानमग्न पाणी, ओढा-नद्यांचं वाहतं पाणी, समुद्राचं हेलकावे घेणारं सर्वदूर पसरलेलं पाणी, ही पाण्याची सगळीच रूपं मला मोहवतात. त्यातही संध्याकाळच्या वेळी सागर किनार्यावर केलेली भटकंती, म्हणजे `आनंदाचे डोही आनंद तरंग’.
माझं नित्याचं वास्तव्य समुद्रापासून दूर, मात्र नदीचा सहवास सासरी-माहेरी दोन्हीकडे. लहानपणी मामांकडे दादरला गेलं, की ३-४ वेळा तरी दादर चौपाटीवर फिरायला जाणं होई. प्रथम पाण्यात पाय बुडवून उभं राह्यचं. पायाखालून हळू हळू वाळू सरकत जायची. वाळूबरोबर मीदेखील आत सरकत जायची. पाण्यात, पाय असे मनसोक्त संतोषले, की वाळूवर बसायचं. त्यात पाय खुपसून त्यावर वाळूचा डोंगर रचायचा. पाय काढून त्यालाच किल्ला म्हणायचं.
.. मग समोर क्षितिजापर्यंत पसरलेला सागराचा विस्तार बघायचा. तेजोनिधी आता हळूहळू क्षितिजाकडे सरकू लागलेला असायचा. दूरवरच्या लाटांवर त्याची सोनेरी किरणे झिळमिळू लागलेली असायची. हा तेजोनिधी पिवळा, केशरी, नारिंगी, लाल, असे रंग पालटत लाल होऊन पाण्यात बुडी मारायचा. मग भेळ-पुरी, पाणी-पुरी असं काही चटक मटक खाऊन घरी परतायचं.
.. कागद वगैरे टाकायला तेव्हा वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकाराच्या `मला खाऊ घाला’, असं म्हणणार्या कचरापेट्या अस्तित्वात आल्या नव्हत्या आणि तेव्हा सागर किनार्यावर इतका कचराही नव्हता. प्लॅस्टिकचा कचरा आजिबात नव्हता आणि पर्यावरणाविषयी जागरुकता तर तेव्हा मुळीच नव्हती. ही सुमारे साठ – पासष्ठ वर्षापूर्वीची हकिकत सांगते आहे मी! दिवस पालटले. अलिकडे सूर्यास्त समुद्राच्या पाण्यात नाही, स्काय स्कॅपर इमारतींच्या मागे होतो. गेल्या काही वर्षापासून पर्यावरणाची चर्चा होऊ लागली आहे. लोकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव जागृती होऊ लागलेली आहे. भेळेच्या वगैरे गाड्या बर्याच दूर उभ्या करण्याची सक्ती आहे. किनारे प्रदूषित होऊ नयेत, म्हणून प्रयत्न होऊ लागले आहेत, पण यापूर्वी झालेली हानी अपरिमित आहे.
गोव्याला स्वातंत्र्य मिळालं आणि माझी मामे बहीण लता काळे व प्रा. गोविंद काळे गोव्याला वास्तव्यास गेले. मीही तिथले समुद्रकिनारे बघण्याच्या ओढीने गोव्याला गेले. त्यावेळी कोलवा, कलंगुट, मीरामार हे समुद्र किनारे अतिशय स्वच्छ आणि निर्मळ होते. किनार्यावर समुद्राचे दर्शन घेणारे आम्ही तेव्हा तुरळकच लोक होतो. अजून तिथे भेळ-पुरीच्या गाड्या लागल्या नव्हत्या की आस-पास खाद्य विक्रीची छोटी मोठी दुकाने, गाळे थाटलेले नव्हते.
८० साली काणकोण येथील पाळोळ्याच्या समुद्र किनार्यावर गेलो होतो, तेव्हा तर तिथल्या निसर्गाने आलिबाबाच्या गुहेतील वैभवाप्रमाणे आपलं वैभव आमच्यासाठी खुलं करून ठेवलं होतं. अगदी अनाघ्रात सागर किनारा. पावला-पावलावर लावण्याची वेगळी कळा. वेगळं दृश्य. किनार्याच्या दक्षिणेला असलेल्या टेकडीवर चढलं, की सागर किनार्याची चंद्रकोर दृष्टीस पडायची. भरतीच्या वेळी चोहो बाजूंनी पाणी त्या टेकडीला गळामिठी घालतं. प्रत्येक कोना-कोनातून तिथे वेगळीच रम्यता दिसायची. कुठे दूरवर आकाशाच्या निळाईत मिसळून गेलेली समुद्राच्या पाण्याची निळाई, कुठे निळ्या पाण्याने वेढलेले, कासवाच्या पाठीसारखे दिसणारे जमिनीचे तुकडे, कुठे हिरवी गोल टोपी पाण्यात पालथी घालावी तशी दिसणारी हिरवीगार छोटीशी टेकडी. सारं भवताल मनस्वी. आत्ममग्न. पुढे केव्हा तरी डॉ. प्रकाश जोशी यांच्या पुस्तकात पाळोळ्याचं वर्णन वाचलं, आणि पुन्हा एकदा पुन:प्रत्ययाचा आनंद घेतला.
मध्यंतरी प्रा. कोमरपंतांशी फोनवर बोलणं झालं. पाळोळ्याच्या सी-बीचवर फिरल्याची आठवण बोलता बोलता ओघा-ओघाने निघालीच. तशी प्रा. कोमरपंत विषण्ण होऊन म्हणाले, `ते रूपवैभव आता उरलं नाही. गोव्यातील पर्यटन विकासामुळे गोवा संपन्न होऊ लागला खरा, पण हा विकास होता होता, इथले समुद्र किनारे, इथलं पर्यावरण यांची अपरिमित हानी होत चाललीय, इकडे मात्र दुर्लक्ष झालं. ‘ माझ्या डोळ्यापुढे बहुतेक सगळ्याच समुद्रकिनार्यांवर टाकलेले भेळेचे वा अन्य खाद्य पदार्थांचे कागद, बिसलरीच्या आणि हो दारूच्याही रिकाम्या बाटल्या, कॅन आणि विविध प्रकारचा कचरा डोळ्यापुढे आला आणि वाटलं, लावण्यमयी देहावर कोडाचे विद्रूप चट्टे पडलेत.
त्यांच्याशी बोलता बोलता डॉ. प्रकाश जोशी यांच्या पुस्तकाची पुन्हा आठवण झाली. डॉ. प्रकाश जोशी भूगोलाचे अभ्यासक. पायी भटकंती करून त्यांनी भारतातले सगळे किनारे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले होते. अनुभवले होते. पाकिस्तानच्या सीमेला लागून कच्छच्या लखपत ते बांगला देशच्या सीमेला लागून असलेल्या सुंदरबनापर्यंत त्यांनी पायी प्रवास केला. आपल्या अनुभवावर आधारित, `रमणीय सागर किनारे’ हे पुस्तकही त्यांनी लिहीलं आहे.
समुद्र किनारे म्हणजे काही पुळणीचे, वाळू-रेतीचेच समुद्र किनारे नव्हेत. दलदलीचे किनारेही असतात, तसेच एखाद्या योग्यासारखे धीर-गंभीर खडकाळ किनारेही असतात. प्रत्येक ठिकाणचं पार्यावरण वेगवेगळं असतं. डॉ. प्रकाश जोशी म्हणतात, `पुळणीच्या समुद्र किनार्यावरील सजीवांची जीवनशैली वेगळी, तसेच खडकाळ किनार्यावरच्या आणि दलदलीच्या समुद्रकाठी असणार्या सजीवांची जीवनशैली वेगळी. पुळणीवर कोरडी वाळू बाजूला सारत, समुद्रजंत जिमिनीत शिरतात. खेकडे स्वत:ला पुळणीत गाडून घेतात, पण त्याचवेळी आपल्या श्वासनलिकेची अँटेना बनवून हवेतला प्राणवायू शोषून घेतात. शरीरावरील चमच्यासारख्या काट्यांनी समुद्रकंटक जमीन खणतात. या सगळ्यामुळे पुळण जिवंत वाटते.
खडकाळ किनार्यावरील जीवसृष्टीचं स्वरूप वेगळं. खडकातील खोबणी आणि भेगांच्या आश्रयाला मृदु शरिरी, कठीण कवची जल सजीव असतात. खडकावरील शेवाळं, खेकडे, समुद्रपंखे, समुद्रतारे आदि सजीवांचं वास्तव्य स्थान. ओहोटीच्या कोरड्या काळात शेवाळाकडून त्यांना आर्द्रता, ओलावा मिळतो. समुदकंटक, स्पंज, सीनट इ. जलजीव इथे ठिय्या मारून असतात. भरती ओसरताना, ओहोटीच्या प्रारंभी शीलाकळी हा कंकण प्राणी आर्द्रता शोषून घेत असतो. त्यावेळी लक्षावधी बुडबुडे फुटत असतात. त्याचा आवाज अस्पष्टशा कुजबुजीसारखा येतो. लाडघरच्या (जि. रत्नागिरी) किनार्यावर संध्याकाळी असा आवाज ऐकू येतो. प्रवाळही खडक चिकटे. समुद्रफूल हा तर महान चिकट्या. खडकाच्या खडबडित खोबणीत तो आपला मांसल भाग असा काही गच्च धरून ठेवतो, की त्याला त्या खडकापासून अलग करणं जवळ जवळ अशक्य. कोकण, मुंबई या ठिकाणी पुळणी, खडकाळ, दलदल असे तिन्ही प्रकारचे किनारे आहेत.
निरंजन घाटे लिहितात, `उथळ सागरात आपल्याला शेवाळे, खेकडे, छोटे मासे, कासवं आढळतील, तर भरती-ओहोटीच्या पुळणींवर खेकड्यांचे प्रमाण जास्त असेल. तिथली रेती खूप बारीक असेल. वाळूच्या दांड्यावर नि स्थिरावलेल्या वालुकापट्ट्यावर मर्यादावेल असेल, तिच्या आश्रयाने टिटवीचं घर असेल. दलदलीच्या प्रदेशातील परिस्थिती आणखी वेगळी असेल. तिथं कांदळीचं किंवा खारफुटीचं जंगल असेल. त्याच्या आश्रयाने अनेक कीटक, बेडूक, पक्षी वावरतात. राहतात. प्रजनन करतात. ‘
प्रत्येक प्रकारच्या समुद्रकिनार्याचं पर्यावरण वेगळं असतं, असं म्हणताना पर्यावरण म्हणजे नेमकं काय? आणि अलिकडे प्रदूषणामुळे किंवा अन्य कारणांनीही पर्यावरणाचा र्हास होतोय, असं म्हंटलं जातं, म्हणजे नेमकं काय होतय, हे समजून घ्यायला हवं.
अभिजित घोरपडे म्हणतात, `पर्यावरण म्हणजे आपला परिसर व पृथ्वीवरचे सर्व काही सजीव प्राणी आणि निर्जीव गोष्टीसुद्धा. याचं कारण प्रत्येक सजीव, सर्व वस्तू, पदार्थ, अगदी दगड-गोटेसुद्धा, यांचा निसर्गात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात सहभाग असतो. ‘
निरंजन घाटे लिहितात, ` ‘पर्यावरण म्हणजे एखाद्या किंवा विचाराधीन सजीवाच्या दृष्टीने सुयोग्य जीवनावश्यक परिस्थिती. ही सजीवानुरूप आणि भौगोलिक परिस्थितीनुरूप बदलत असते. ‘ पर्यावरणाचा विचार स्वत:पासून करायला हवा, असं निरंजन घाटे यांना वाटतं. कारण आपणही पर्यावरणाचा एक घटक असतो. भूमी, म्हणजे आपल्या पायाखालची जमीन. जल – जमिनीवरचं दृश्य जल, समुद्रासाखा अफाट जलविस्तार आणि हो, भूजलसुद्धा आणि खडकही, पर्यावरणचा भाग आहेत. त्या त्या ठिकाणची जमीन, पाणी, हवा, वनस्पती यावर तिथली प्राणीसृष्टी अवलंबून असते. हे सारे घटक परस्परावलंबी आहेत.
पर्यावरण म्हणजे काय? हे नुसतं समजून घेणं पुरेसं नाही. हल्ली पर्यावरणाच्या संदर्भात विशेष चर्चा होऊ लागलीय, कारण माणसाच्या विकास प्रक्रियेने पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय. पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय, म्हणजे नेमकं काय होतय? तो कशामुळे बिघडत चाललाय? त्याचे परिणाम काय होताहेत आणि तसं घडू नये, म्हणून एक जबाबदार नागरिक म्हणून आपण काय करायला हवं, हे सारे प्रश्न या चर्चेच्या अनुषंगाने चर्चिले जाताहेत.
– क्रमश: भाग १
(संदर्भ – १. रमणीय सागर किनारे – डॉ. प्रकाशजोशी, २. पर्यावरण प्रदूषण – श्री निरंजन घाटे ३. गाथा पर्यावरणाची – श्री अभिजित घोरपडे)
© सौ उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈