? विविधा ?

 ☆ वळिव…! ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆ 

मी गॅलरीत  कपड्यांच्या घड्या घालत उभी होते . ऐन उन्हाळ्यातली ती दुपारची वेळ होती. आजूबाजूची झाडं उन्हाच्या काहिलीने सुकल्यासारखी होऊन स्तब्धशी उभी होती. उन्हाच्या झळा  डोळ्यांनाही सहन होत नव्हत्या. जीव नुसता कासावीस झाला होता…

घरात आले तर, खिडकीतूनही झळा जाणवत होत्या. डोक्यावर फिरणाऱ्या पंख्याने उकाडा कमी व्हायच्या ऐवजी त्यात जास्तच भर पडत होती. अन – – –

– – – तापलेल्या तना – मनाला एक हळुवार जाणीव झाली.

एक सुखद गारवा हवेत लहरला. मनानं एक मस्त गिरकी घेतली. अन् म्हटलं ….आला …आला… ‘वळीव’ आला….!

बघता- बघता ‘नभ मेघांनी आक्रमिले’ असं झालं. पिसाटलेल्या वाऱ्याने झाड बुंध्यापासून घुसळायला सुरुवात केली. झाडा खाली असलेल्या वाळलेल्या पानांचा पाचोळा अन् मातीच एक आवर्त तयार झाल. तो भोवरा वाऱ्याच्या वेगाने वाट फुटेल तसा गू॑-गू॑–आवाज करीत फिरायला लागला. अचानक आलेल्या त्या आवर्ताला चुकवणं रस्त्यावरून जाणाऱ्यांना कठीण जात होतं.

वाळून काष्ठ झालेल्या झाडांच्या लहान – लहान फांद्या कड्कड् आवाज करीत खाली पडत होत्या. दुपारची गूढ ,निस्तब्ध शांतता त्याने पळवूनच लावली. खिडक्यांचे ,दारांचे धडाधड आवाज सगळीकडे येऊ लागले. वाराही उचलून बरोबर आणलेला पालापाचोळा गॅलरीत, गॅलरीत च्या पत्र्यावर ,दारातून घरात येत सगळीकडे पसरवून देत होता सांगत होता…

… होय… तो आलाय. हव्याहव्याशा आनंदाच्या सरी घेऊन..! प्रचंड गडगडाट करीत सोनेरी कडांच्या काळया ढगांवर विजेचा एक जोरदार आसूड ओढीत तो आला ….वळिवाचा पाऊस…!

तडतड आवाज आला म्हणून मी गॅलरीत गेले अन पाहिले तर त्याने तडतडणाऱ्या ‘गारा’ही बरोबर आणल्या होत्या. क्षणातच त्याने बरोबर आणलेल्या गारांनी गॅलरीच्या पत्र्यावर, खाली अंगणात मनमोहक पावलं टाकत, गिरक्या घेत नाच आरंभला होता. प्रचंड गडगडाटातही लहान मुलं ‘गारा’ वेचत त्या नृत्यात सामील झाली. मीही गॅलरीतून हात बाहेर काढत गारा झेलायचा, पकडायचा प्रयत्न करू लागले. फारसं नाही आलं यश पण, तरी थंडगार पावसाचा पहिला स्पर्श ओंजळी घेताना, ती ओंजळ चेहऱ्यावर रिती करताना तन आणि मन सुखावून गेलं. पावसाचे शिडकावे अंगावर घेत, अनुभवत मी गॅलरीच्या कट्ट्याशी उभी राहिले.‌. शांतपणे त्याचा आवेग पहात..!

– – -काही वेळाचा तर हा त्याचा खेळ ! ज्या वेगानं तो आला त्याच वेगानं तो निघूनही गेला. वारा, गारा, धारांनी सारा आसमंत, परिसर बदलला. आता  झाडांवरून पावसाचे टपटपणारे थेंब अन चोहीकडे दरवळणारा मृद्गंध, क्षितिजाला स्पर्श करणार सप्तरंगी इंद्रधनुष्य असं सगळं त्याने मागे खूण म्हणून ठेवलं. सगळं मन उल्हसित करणार॑..!

असा ‘वळिवाचा पाऊस’ आपल्या आयुष्यातही हवाहवासा वाटतो. आपलं वय वाढलं, आयुष्य बदललं तरी जगतानाचे ग्रीष्माचे चटके सोसण्याच॑ बळ आपल्याला मिळतं ते वळीवाच्या धारांनी ! हा ‘वळीव’ मग आपल्याला कुठेही कुणाच्याही रूपात भेटतो, भेटत राहतो. आभाळातून नाही कोसळत तो, तर मनातून डोळ्यात साठतो अन कोसळू लागतो. त्याचं हे कोसळणं सहजपणे आपल्याला चिंब करतं, अवघ मन रितं करत, सारी दुःख कटुता विसरून पुन्हा नव्याने पावले टाकण्याची उभारी देत,…. ज्याचा त्याचा ‘वळिव’ वेगळा असतो एवढं खरं…!

 

© सुश्री शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड- पुणे.

मोबा. ९५९५५५७९०८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
3 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Shyam Khaparde

सुंदर भावपूर्ण अभिव्यक्ति