सुश्री वैशाली पंडित
विविधा
☆ वाळवण!… ☆ सुश्री वैशाली पंडित ☆
कडकपणाची सीमा पार करून जाणारं कर्मकठोर ऊन्ह!
त्याला सर्वांगाने झेलणारी, त्याचा दाह झेपववता झेपवता स्वतःच तप्त फुत्कार टाकणारी गच्ची…
हे बघितल्यावर ‘ती’ जातीची गृहिणी स्वस्थ बसणंच शक्य नसतं.
पंचमहाभूतांना मदतीला घेऊन तर अन्नपूर्णेची आराधना करायची असते तिला. त्यातलं ‘तेज’ आता तिच्यासमोर ज्वाळा ढाळत असतं.
मग काय?
डाळी, धान्य बाहेर येतात.
कोणाला भिजवलं जातं, कोणाला शिजवलं जातं. कोणाला वाटलं जातं, कोणाला घाटलं जातं, कोणाला लाटलं जातं…!
नाना चवींनी नटवलं जातं. मिरची, जिरे, मिरे, हिंग, मीठ यांचे स्वाद दरवळतात. जिभा आत्ताच खवळतात.
कारल्यासारखी कडू जहर भाजीही आता मीठमाखल्या चकत्या होऊन ऊन्हाच्या कडकडीत अंघोळीला बसते.
मोठ्या आकाराचे बटाटे दादागिरी करत खसाखस किसून घेतात स्वतःला. त्यातले काही पातळ काच-या करून लाड पुरवून घेतात.
ऊन्हात जुन्या सुती साड्यांचा मोरपिसारा मांडला जातो.
पापड, सांडगे, कुरड्या, खारोड्या, सालपापड्या, कीस…. वाळवणाच्या पदार्थांची एकच धूम उडते.
नुसतं वाळत घातलं म्हणजे झालं नाही. ऐन ऊन्हाच्या कारात ते उलट्याचं सुलटं करून घ्यावं लागतं. त्यांच्यावरून हात फिरवावा लागतो. तो हात मात्र संसारात मुरलेल्या ‘ ती ‘ चाच असावा लागतो. पापडाचा चेहरा बिघडता नये की पापडीचा नूर मोडता नये.
टपलेलेच असतात कावळे, चिमण्या चोची मारायला. केल्या कामावर नाचायला.
ती आता वाळवण राखते.
तिच्या मनासारखी खडखडीत वाळली की, सावलीत आणते.
गार झाल्यावर डब्यात भरते. ती टिकवायचीत वर्षभर म्हणून जीवापाड जपते त्यांना.
आणि मग…
वाळवणाच्या तळणीने सजलेलं जेवणाचं ताट पाहून ‘ ती’ सुगरण समाधानाने हसते. मुसळधार पावसाळी वातावरणासाठी, कडाड उन्हात तिने बेगमी केलेली असते.
‘ती ‘ हे कुठून शिकली?
‘ती’ च्याआधी ‘नि’ आणि ‘य ‘ ही अक्षरे लावणारी सुगरण तरी दुसरं काय करते?
प्रत्येकाचा उन्हाळा तिला ठाऊक असतो.
प्रत्येकाचा पावसाळा तिला विचारून येतो.
प्रत्येकाच्या आयुष्याचं ती असं वाळवण घालते. अनुभवांच्या नेसत्या साडीवर.
कोणाला अश्रूत भिजत घालते,
कोणाला संघर्षात शिजत ठेवते,
कोणाला तणावाखाली बारीक वाटून घेते,
कोणाला जन्मभर पुरेल इतकी प्रश्नपत्रिका देऊन लाटून ठेवते.
कोणाचे सांडगे तोडते पेरांनी,
कोणाला पसरवते अशांतीच्या पळीनी.
कोणाला जास्त लागतं मीठ
कोण वाळतं गपगुमान नीट
सगळं माहीत असतं अचूक तिला. माणूस नावाचं वाळवण घालते ती बेगमीला.
मधूनमधून वाळवणावर काळजीवाहू हातही फिरवते.
झडप घालणा-या हाव-या पिशा पाखरांपासून वाचवते.
उन्हाच्या झोतावर दुपार तिपार बघून वाळवण दहा ठिकाणी नाचवते.
तर!
सावली आली तर वातड होईल ना! !
म्हटलं ना, ऋतु तिलाच कळतो फक्त प्रत्येकासाठीचा.
माणूस टिकवते ती तिच्या साठ्याचा.
कळतं का माणसाला आपलं वाळवण झालेलं?
कडाड ऊन्हात भाजून निघालेलं?
अनुभवांनी उलटंपालटं केलेलं…?
पण
शेवटी मनातली सगळी किल्मिष ओल वाळून खडखडीत झालेलं?
आपलंच वाळवण आपल्यालाच अडीअडचणीत साथ देणारं?
कोणी मग उकळत्या तेलात सोडा की चिमट्यात धरून निखा-यावर भाजा.
चहू बाजुंनी आहे त्या पेक्षा टक्क फुलूनच येणार.
कधी कळतं माणसाला हे?
कोण जाणे.
ऊन्ह पाहिलं की, पावसाळ्यासाठीची बेगमी करायची धांदल उडतेच शेवटी.
‘ती’ असो
वा
नि य ‘ती’!!
केवढा महान गुरू हा!
© सुश्री वैशाली पंडित
मालवण, जि. सिंधुदुर्ग, मो. ९४२२०४३०२५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈