सौ. ज्योती विलास जोशी
विविधा
☆ अहंकार… ☆ सौ. ज्योती विलास जोशी ☆
अहंकार हा डोळ्यात गेलेल्या एखाद्या कुसळासारखा असतो जोवर ते काढून टाकत नाही तोवर आपल्याला जग बघता येत नाही. अगदी तसंच दृष्टीवर अहंकाराचा जर पडदा असेल तर वास्तवापासून आपण नेहमीच दूर राहतो आणि ते आपल्यासाठी नुकसानकारक आहे.
अभिमान, अहंकार आणि आत्मविश्वास यामध्ये एका पुसटश्या रेषेइतकं अंतर आहे. आत्मविश्वास दृढ झाला की तो ही रेषा पार करून अभिमानाकडे वळतो. अति अभिमानाचा पगडा ती रेषा ओलांडून आत्मप्रौढी मिरवतो. आत्मप्रौढीमुळे अहंकार बळावतो. हळूहळू माणसाच्या नकळत होणारा हा बदल लक्षात येत नाही. माणूस आत्मकेंद्री बनतो. आत्मकेंद्रीपणा अहंकारात मोठी भूमिका बजावतो. सरते शेवटी अहंकार माणसाच्या विकासातला मोठा अडसर ठरतो. षड्ररिपू अहंकाराच्या ठिकाणी तळ ठोकून बसलेले असतात ते या अहंकाराला खत पाणी घालतात. अहंकार हा व्यक्तिमत्त्वाचा मानसिक घटक आहे अशा अहंकाराचा झालेला उद्रेक माणसाची मानसिकताही भस्मसात करून टाकतो. माणसाचा अहंकार त्याला दृष्टीने आंधळा, मतीने भ्रमपूर्ण आणि गतीने थांबवत असतो. भले भले यशस्वी आणि समजदार लोक अहंकारामुळे चुकीचे निर्णय घेतात.
एका मर्यादेपलीकडे गेलेला हा अहंकार त्याला समाजापासून दूर लोटतो. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्या इतपतच तो असावा हे मोजमाप माणसाला न जमल्यानं अहंकाराचा अतिरेक होतो. जसा जसा अहंकार वाढत जातो तस तसा त्या माणसाच्या बुद्धिमत्तेवर, त्याच्या सृजनशीलतेवर, विचारशक्तीवर एक प्रकारचं पुट चढतं. अहंकारावर त्याला जर मात करता आली नाही तर मात्र तो सर्व सात्विक आनंदांना पारखा होतो. त्याच्या ठाई असलेल्या पैसा बुद्धी सौंदर्य सत्ता ह्या उत्तम मानल्या जाणाऱ्या गोष्टी नगण्य वाटू लागतात…
अहंकाराची कीड ही एक प्रकारची वाळवी आहे. ती सुबुद्ध माणसाचाही तोल घालवू शकते.
आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा गर्व असणे, कोणाही न जुमानता आपण करतो तेच बरोबर मानणे, प्रत्येक क्षणोक्षणी स्वतःलाच वरचढ, श्रेष्ठ समजणे, बाकी सर्वांना कस्पटासमान, नीच समजणे. ही अहंकाराची लक्षणे… अहंकार म्हणजे स्वतःच्या गुणवत्तेच्या अतिरंजित दृष्टिकोनातून उद्भवणारा आनंद.
या अहंकारावर मात कशी करायची तर आत्मपरीक्षण करून आपल्याला अहंकार का आणि कशासाठी आहे हे आपणच शोधून काढलं पाहिजे.
स्वतःत बदल घडवून आणण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. मनःशांतीतला मोठा अडथळा हा अहंकार आहे हे वेळीच लक्षात आलं पाहिजे. आपण कितीही विद्वान असलो तरी प्रत्येक समोरच्या माणसाकडून काहीतरी शिकण्यासारखा असतं याची जाणीव व्हावी. सतत यश मिळणार याला प्रसंगी अपयश देखील चाखता आलं पाहिजे एकूण काय तर आपल्या क्षमतेवर आणि बुद्धिमत्तेवर दृढ विश्वास ठेवून अहंकाराला सीमित ठेवून सृजनशील व्हायला हवे…. यातच शहाणपण आहे.
© सौ ज्योती विलास जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈