सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सुश्री ज्योत्स्ना तानवडे
💐 अ भि नं द न 💐
साहित्यरंग वाङ्मय मंडळ, वारजे आयोजित ‘कल्पनाविस्तार’ स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. ज्योत्स्ना तानवडे यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
ई अभिव्यक्ती मराठी परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन 🪻
पुरस्कार प्राप्त लेख ‘असेही पुनर्मिलन’ आज प्रकाशित होत आहे. 🪻
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
विविधा
☆ “असेही पुनर्मिलन” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
“चला उतरा लास्ट स्टाॕप आला “कंडक्टर मोठ्याने ओरडला. त्यासरशी मी एकदम जागी झाले, तो झोपेत माझा स्टाॕप मागेच गेला होता अन् मी एका अपरिचित ठिकाणी उतरले. काय करावे काही सुचत नव्हते. बाकी पॕसेंजर भराभरा त्यांच्या मुक्कामी निघून गेले. संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. चहा घेऊन समोरच असलेल्या देवळात शिरले आणि समोर बघते तर……
सभामंडपाच्या पायऱ्या उतरून येणाऱ्या त्या बाईचा चेहरा अगदी ओळखीचा वाटला. मी जागेवरच थांबून पाहू लागले अन् आठवले ‘अरेच्चा ही तर आपली बालमैत्रीण प्रभा आहे’. तिला पाहून मला अतिशय आनंद झाला.
अचानक तिचेही माझ्याकडे लक्ष गेले. ती पण पहातच राहिली. एकदम ” नंदिनीऽऽ.. ??? नंदू ऽऽऽ “, अशा जोराने हाका मारत ती भराभर पायऱ्या उतरली आणि माझ्याजवळ येऊन तिने घट्ट मिठी मारली. ती आता ओक्साबोक्शी रडू लागली. ” अग, तुला भेटण्यासाठी मी किती तळमळत होते. आज देवालाच दया आली. त्याच्या दारातच तू पुन्हा भेटलीस. किती आनंद झालाय म्हणून सांगू ? कुठे होतीस ग इतके दिवस ?”
तिचं रडणं आणि बोलणं एकत्रच सुरू होतं. मी तिला शांत करीत खाली बसवलं, पाणी दिलं. ती खूप सावरली. मला जवळ घेत तोंडावरून हात फिरवत म्हणाली, ” नंदू, किती काळ लोटला ग आपल्या भेटीला. आता पुन्हा भेट होणारच नाही असं वाटत होतं. पण देवानंच आपली भेट घडवली. किती जीवाभावाच्या मैत्रिणी आपण, खूप आनंदात होतो. पण मला काय दुर्बुद्धी सुचली अन त्या खोटारड्या जयडीवर विश्वास ठेवला. तुझ्याशी अबोला धरला. नंतर मग खूप वाटलं तुझी माफी मागावी, पुन्हा एकत्र यावं, पण आपली भेटच झाली नाही. “
“प्रभा अगं जाऊ दे ना. विसर ते जुनं सगळं. ” हे ऐकून चिडलीच.
“कशी विसरू ? माझ्या चुकीनंच मी तुला गमावलं होतं ना? खरंच माझं तेव्हा खूप चुकलं होतं. मला माफ करशील ना ग नंदू ?” ती पुन्हा रडू लागली.
” हे बघ प्रभा, आपण चांगल्या मैत्रिणी आहोत ना. मैत्रीत कसली माफी मागतेस ? आपली ती वेळच वाईट होती. मी तर केव्हाच सगळं विसरले आहे. तुला भेटून मात्र खूप खूप आनंद झाला. माझं उतरायचं गाव मागं गेल्यामुळं मी इथं आले हे फारच छान झालं. “
आता प्रभा पूर्ण सावरली. त्या गावातच तिचं घर होतं. आम्ही तिच्या घरी आलो. हसतखेळत रात्री जेवण झालं. मी आणि प्रभा झोपायला गेलो. झोप कुठली यायला ? इतक्या वर्षांच्या साचलेल्या गप्पा झाल्या. त्या भांडणाची उजळणी पण झाली.
आम्ही दोघी घट्ट मैत्रिणी होतो. हे न बघवणाऱ्या मुली आमच्यात भांडण लावायचा प्रयत्न करायच्या. एकदा जयश्रीनं माझ्याबद्दल काहीतरी खोटंनाटं प्रभाच्या मनात भरवलं. प्रभा खूप चिडली. आमचं जोरात भांडण झालं. माझं म्हणणं ऐकून न घेताच ती निघून गेली. कायमचा अबोला धरला. पुढं बदलीमुळं ते परगावी गेले आणि आम्ही कायमच्या दुरावलो. कसलाच संपर्क झाला नाही. लग्नानंतर तर गावही दुरावला.
पण ही गोष्ट प्रभाच्या इतकी जिव्हारी लागलेली असेल याची कल्पनाच नव्हती. आत्ता भेटल्यावर सगळं मळभ दूर झालं. खूप आनंद झाला.
गप्पांमधे इतर मैत्रिणींच्या आठवणी निघाल्या. आमची मैत्रीण विजयाच्या मुलीच्या लग्नासाठी मी आधीच्या गावात उतरणार होते. मग दुसऱ्या दिवशी माझ्याबरोबर प्रभासुध्दा लग्नाला आली. तिथे आमच्या आणखी ३-४ मैत्रिणी आलेल्या होत्या. माझ्याबरोबर प्रभाला बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. खूप आनंद झाला. आमच्या बालपणाच्या आठवणींचं कारंजं थुईथुई उडू लागलं. त्यात आम्ही चिंब झालो. पुन्हा एकदा लहान होऊन खूप हसलो खिदळलो. खूप मजा केली. भेटीचा पुरता आनंद घेतला. ही ‘पुनर्भेट’ आम्ही अतिशय मनापासून उपभोगली. आलं देवाजीच्या मना…. !
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈