मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनातलं शब्दात… लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ मनातलं शब्दात… लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला पई ⭐

आज अनिताकडे  पार्टी आहे . तिच्या आणि अजयच्या  ओळखीच्या पाच फॅमिलीज् येणार आहेत . त्यामुळे सकाळपासून तयारी सुरू आहे .

पहिल्यांदाच सर्वांना  घरी  बोलविण्याचा  बेत तिने ठरविला . नाहीतर महिन्यातून एकदा सर्व  मित्र  बाहेर हॉटेलमध्ये भेटतात. गप्पा टप्पा मारतात , आणि  रिचार्ज होऊन घरी येतात . हॉटेल असेच शोधतात जेथे  मुलांना मस्ती करायला भरपूर जागा असेल.••••

या सर्व कार्यक्रमात आजी-आजोबा घरीच राहतात , त्यांना रात्रीचे बाहेर जाणं , उशीरा जेवणं तेवढं झेपत नाही .. यावेळेस अनिता-अजयने घरीच बोलविण्याचा  प्लान ठरविला. ज्या परिवारात आजी आजोबा आहेत त्यांनाही आमंत्रण दिले .

सर्वांच्या सोयीनुसार  दुपारच्या जेवणाचा बेत ठरविला. आपल्या मनोरंजनाची पद्धत थोडी बदलावी ,असं तिच्या मनात होतं .

घरचे जेष्ठ ,Retired from work जरी असले तरी They are  not retired from fun,

असं तिचं मत आहे . नेहमी आपण बाहेर जातो ,ते काहीही तक्रार न करता घरी राहतात . येताना आपण त्यांच्या आवडीचे आइस्क्रीम  आणले, तरी अगदी आनंदाने ते त्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी खातात .

त्यांचे बाहेर जाणं कमी झालेलं आहे . बदल, change प्रत्येकाला आवडतोच .

आपण आपल्या  पद्धतीत थोडा बदल केला तर त्यांना पण आपल्यात सामावून घेता येईल .हा विचार अनिताच्या मनात होताच.

खरंतर दोन चार दिवसांपूर्वी  घडलेल्या एका घटनेनं   हा बदल करण्याचा विचार तिच्या मनात आलेला अजून  दृढ झाला.

परवा आजोबांचे चार मित्र त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला म्हणून घरी आले, तर अनिताच्या मुलीने म्हणजे प्रियाने खाडकन आपल्या खोलीचा दरवाजा बंद केला . हे अस वागणं बरोबर नाही. खरंतर पंधरा वर्षांच्या प्रियाने सर्व आजोबांना  हसून नमस्कार करणे आणि त्यांना पाणी आणून देणे  एवढ करणं तरी  नक्कीच अपेक्षित होतं .

बरं !  आजच्या मुलांना लेक्चर देऊन चालत नाही .ऐकतील की अजून बिथरतील सांगता येत नाही .

मुलांना आपल्यापेक्षा लहान मोठे सर्वांबरोबर व्यवस्थित  वागता आलं पाहिजे . थोडं बहुत काम करायची सवयही असलीच पाहिजे. आज समोर दिसणाऱ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .

तेव्हा घरी गेटटूगेदर करायचे तिने ठरविले .

जेव्हा तिने हा विचार आपल्या मैत्रिणींमध्ये मांडला ,तेव्हा सगळ्यांना तो एकदम पटला असं झालं नाही . वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या .•••••

“अग ! ते खूप बोलतात . आपल्याला फ्रीली बोलता येणार नाही .” “त्यांच्या कडे लक्ष द्यावे लागते . आपला अर्धा वेळ त्यातच जाईल .”  “मग रोजच्या सारखंच होणार ना , बदल कुठे झाला ?” “त्यांना लवकर जेवायचे असते . रात्रीचे झेपत नाही” वगैरे वगैरे .

अनिता म्हणाली  “अग!  आपण थोडा बदल करून तर बघू . माझ्या घरी सुरुवात करू .अग!  जमेल सर्व .मी करते तयारी . त्यांना ही बरं वाटेल . मुलांनाही मदतीला घेऊ.”

रश्मी कशीबशी या प्लॅनसाठी तयार झाली.

आज देशपांडे आजी आजोबा , कुलकर्णी आजी आजोबा ,जाधव आजोबा, आणि देशमुख आजी आनंदात होते .आणि आश्चर्य चकितही  होते.

मुलांबरोबर लग्नाला जाणे , एखाद्या कार्यक्रमात जाणे, यांची त्यांना सवय आहे. पण मुलांबरोबर त्यांच्या मित्रांच्या पार्टीला जायचे होते . उत्साह  तर होता, बरोबर थोडं टेंशन ही होतं.

पार्टी छान झाली . सर्वांनी enjoy केलं . लहान मुलांनी खूप धमाल केली. बरोबर त्यांची मदतही झाली .आजी आजोबांकडे लक्ष द्यायचे काम त्यांनी छान केले .

सिनीयर्सची आपापसात छान ओळख झाली . गप्पा झाल्या .यंग जनरेशनच्या मनसोक्त गप्पा रंगल्या . हॉटेलपेक्षा हे option छान आहे . छान  हातपाय  पसरून  गप्पा मारता येतात, हे सर्वांना पटलं .

फॅमिली गेटटूगेदर छान रंगलं.

दुपारच्या चहानंतर अंताक्षरीचा कार्यक्रम झाला. तरुण वर्ग, बच्चा पार्टी आणि आजीआजोबा ग्रुप असे तीन गट होते . सर्वांनी  धमाल केली .आजी आजोबांनी जुनी गाणी छान म्हटली .

अगदी अंगाई गीत ,मंगलाष्टक तर

*जा मूली  जा दिल्या घरी तू सुखी रहा .

*केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर

*घट डोईवर ,घट कमरेवर •••

शेवटचं देशपांडे आजींचे गाणं ऐकून तर सर्वांच्या डोळ्यात पाणीच आले .गाणं होतं ••••

*घरात हसरे तारे असता ,मी पाहू कशाला नभाकडे.•••*

शेवटी देशपांडे आजोबा म्हणाले ,”धन्यवाद मुलांनो, आज  तुमच्यात सामील केल्याबद्दल. आज खूप दिवसांनी नवीन गाणी ऐकायला मिळाली . आम्ही  दहा वर्षांनी लहान झालो.

Hope ,We have not troubled you.”

प्रियाने सर्वांसाठी चहा केला. त्याचं तर खूपच कौतुक झालं .

अनिताने ज्या उद्देशाने हे पाऊल उचलले , त्याची सुरुवात  योग्य दिशेने  झाली आहे हे तिच्या लक्षात आले.

म्हणतात ना •••

समज आणि समजूत यापैकी एक गोष्ट जरी माणसाजवळ असली तरी प्रश्न सहज सोडविता येतात.

माणसाने वेळेसोबत चालावे. काळाप्रमाणे बदलावे,परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्या सोबत ठेवावे.

लेखिका :सुश्री.संध्या बेडेकर

संग्राहिका : सौ. उज्ज्वला पई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈