? मनमंजुषेतून ?

☆ दडपण — महिला दिनाचे !!… ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆

मला ‘महिला दिन’ आला की दडपण येते… महिला दिनी मला काय वाटले पाहिजे, मी काय केले पाहिजे, कसे वागले पाहिजे म्हणजे महिला दिनाचा आनंद मला आहे असे प्रतीत होईल, हे मला कळत नाही. एकाहून एक सुंदर आणि कलात्मक banners, भावनेला हात घालणारे संदेश, स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करणारे लेख, ह्यांनी फोन भरून गेलेला असतो. ह्या दिवसाच्या निमित्ताने गोष्टींचा व्यापक आढावा घेणे, सिंहावलोकन करणे, हे कुठेच दिसत नाही. फक्त उत्सवी प्रक्षेपण दिसते. 

वास्तविक भारत हा खूप मोठा देश आहे आणि ज्याला जसा पाहिजे तसा तो त्याला दिसतो. म्हणजे देशातल्या सर्व महिला आपल्या सारख्याच आहेत, असा भाबडा समज होऊ शकतो. खरं तर आपला देश म्हणजे वीसेक युरोपीय देशांचा ऐवज होय. तर मग वीस प्रदेश, त्यांच्या भाषा, संस्कृती, समाजव्यवस्था – आणि ओघानेच तितक्याच प्रकारात मोडणाऱ्या महिला. त्यात भर म्हणून प्रत्येक प्रांतातले विविध स्तर – प्रिविलेज्ड क्लास, एन्टायटल्ड क्लास, अंडर प्रिव्हिलेज्ड क्लास, असे अनेक. शिवाय धर्म, जात इत्यादी वर्गीकरणं, ती तर आहेतच. ह्या व इतर प्रकारात मोडणाऱ्या महिला, त्यांच्या समस्या, कसोट्या, अडचणी एका सूत्रात बांधता येतील का? मग महिला दिन हा सगळ्यांसाठी एकच प्रकारात मोडेल का? मला जे वाटते तेच माझ्यापासून शंभर किलोमीटरवर राहणाऱ्या महिलेला वाटेल का? मग महिला दिन सामान्यकृत असू शकतो का?

काय केले किंवा कसे वागले म्हणजे आपण योग्य अर्थाने स्त्री म्हणून स्वाभिमानाने आणि आनंदाने जगू शकू? काय विचार केल्याने आपण खऱ्या अर्थाने मुक्त पण जबाबदारपणे आयुष्य जगू शकू? कुठल्या दिशेने आपल्याला ‘स्व’चा शोध होऊ शकेल? महिला म्हणून आपल्या स्वतःकडून काय अपेक्षा आहेत?  त्याचप्रमाणे महिला म्हणून इतरांनी आपल्याकडून काय अपेक्षा ठेवाव्यात?—- अनेक वर्षं शोषण व अन्याय सहन करणाऱ्या वर्गाच्या हातात अधिकाराचे बळ आले की तोच वर्ग तसेच शोषण आणि अन्याय करू लागतो हा अनुभव खरं तर बऱ्याचदा येणारा. मग आता स्त्रीच्या बाबतीतही ही अशीच व्याख्या होणार नाहीये ना? आपल्याला स्त्री म्हणून विशेषाधिकार हवा आहे का समानाधिकार? —– ह्या व अश्या अनेक गोष्टींचे विचार महिला दिनाच्या निमित्ताने दरवर्षी माझ्या डोक्यामध्ये येतात. त्यामधे एक भीती देखील वाटते….. स्त्रीची खरी अस्मिता आणि भावना या ‘ महिला दिना ‘च्या गलक्यात हरवत जात नाहीये ना? नाहीतर स्त्री समानता, स्त्रीमुक्ती, महिला सशक्तीकरण या चळवळी, फक्त दिसायला सुरेख असणाऱ्या banners आणि भाषिक सौंदर्य असणार्‍या संदेशापलीकडे जाऊच शकणार नाहीत !… असेही होऊ शकते की …

© सुश्री अश्विनी अभ्यंकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments