श्री सुहास सोहोनी
☆ पण लवकरच उजाडेल… – लेखक / कवी : श्री सुधीर फाटक ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
☆
एकटेपणाची भिती नाही…पण
माणूस इतका, ’असहाय्य’, पूर्वी कधीच नव्हता…
काळोखालाही भय वाटावे,
एवढा ‘अंधःक्कारही’ मनात कधीच नव्हता…
*
कधीकाळी, वाल्याचा वाल्मिकी झाला होता…
अंगुलीमालही, बुद्धाला शरण गेला होता…
दुराचारालाही संकोच वाटावा,
इतका ‘भ्रष्टाचार’ पूर्वी कधीच नव्हता…
काळोखालाही भय वाटावे,
एवढा ‘अंधःक्कारही’ मनात कधीच नव्हता…
*
गर्वाचे घर कधीतरी खाली व्हायचे…
‘सम्राट’, संतापुढे, नतमस्तकही व्हायचे…
अहंगडानेही अपमानीत व्हावे,
इतका ‘उन्मत्तपणा’ पूर्वी कधी नव्हता…
काळोखालाही भय वाटावे,
एवढा ‘अंधःक्कारही’ मनात कधीच नव्हता…
*
चाणक्याने शेंडीला गाठ मारली होती…
सामान्यांनी जगात क्रांती केली होती…
स्वाभिमानास गहाण टाकेल,
समाज इतका ‘दीन’ पूर्वी कधी नव्हता…
काळोखालाही भय वाटावे,
एवढा ‘अंधःक्कारही’ मनात कधीच नव्हता…
*
माणूस माणसातला ‘माणूस’ बघत होता…
आपलं म्हणून परक्यावर प्रेम करत होता…
माणुसकीलाच तिलांजली देईल,
माणूस इतका ‘हीन’ पूर्वी कधी नव्हता…
काळोखालाही भय वाटावे,
एवढा ‘अंधःक्कारही’ मनात कधीच नव्हता…
*
पण लवकरच उजाडेल…
लख्ख प्रकाश पसरेल…
असहाय्यता संपेल…
समाज जागृत होईल…
दारिद्र्य, अहंकार मिटेल…
स्वाभिमानाने जगता येईल…
माणूस ‘माणूसकीला जपेल…
ह्या आशेवर मी जगणार आहे…
☆
लेखक / कवी : श्री सुधीर फाटक
प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुंदर कविता!