श्री सुनीत मुळे
मनमंजुषेतून
☆ सर्वशक्तिमान ? – अर्थात व्हाट्स अप – – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
बळवंतराव दवाखान्यात आले तेच मुळी कण्हत, कुंथत, कमरेत वाकून आणि मान वाकडी करून.
कालपर्यंत एकदम ताठ कण्याने वावरणारे हे सत्तरीचे गृहस्थ, आज काय झालं ? कुठे धडपडले ?
मोठ्या कष्टाने, पाय ओढत, आत येऊन, बळवंतराव अलगदपणे खुर्चीवर बसले.
“काय झालं काका ?”
“Whats app झालं”
“म्हणजे ?”
“अहो, त्या व्हाट्स अपवर एक पोस्ट आली होती, ‘सर्वांगविमुक्तासनाची’… ते रोज दहा मिनिटे केले की पोट साफ राहते, कंबर, पोटदुखी थांबते म्हणे. वाचलं आणि आमच्या हिने काल सकाळी जबरदस्तीने मला करायला लावले. कसंबसं पद्मासन घातलं पण ते सोडवताच येईना. शेजारच्या मधूने आणि आमच्या चिरंजीवाने अर्धा तास खेचाखेची करून कशीबशी सुटका केली. पण आता कंबर, मान, गुडघे मांड्या भयंकर दुखतायत. एक पाऊल ही टाकणे अवघड झालय हो.”
– – काका अगदीच दीनवाणे झाले होते…
“सर्वांगविमुक्तासन म्हणे !सर्वांगाचा एक एक पार्ट विमुक्त झाल्यासारखे वाटतंय. “
.. मी सहानुभूतीने मान डोलावली.
*
“या व्हाट्सअपने उच्छाद मांडलाय नुसता. आजकाल कुणीही काहीही पोस्ट फॉरवर्ड करतो आणि आम्हीही विचार न करता एकमेकांवर त्याचे प्रयोग करीत बसतो. “
.+. पुन्हा दीर्घ निःश्वास !
मागे एक पोस्ट आली होती, “तीन पिंपळाची पाने आणि सहा कडूलिंबाची पाने यांचा एकत्र रस काढून रोज सकाळ संध्याकाळ घ्या. एक महिन्यात तुमचा मधुमेह पूर्ण बरा होईल…. “
.. सुनबाईने चिरंजीवांच्या डायबेटीसच्या सगळ्या गोळ्या बंद केल्या आणि महिनाभर तो रस त्याला पाजला. महिनाभर रोज बिचारा ओका-या काढत फिरत होता. महिन्यानंतर त्याची फास्टिंग शुगर आली पाचशे !!!!”
“अहो पण असलं काही करण्याआधी मला विचारायचं तरी…. “
“छे हो…. या व्हाट्स अप डॉक्टरपुढे सारे तुच्छ ! त्यात पुन्हा तिथे आयुर्वेदाचा दाखला असतो. “
*
“परवा आमच्या नातवाने पोस्ट वाचली.. कोकाकोला वापरून बाथरूम संडास स्वच्छ होतात.
फ्रीजमधून दोन लिटरची कोकची बाटली काढून लगेच प्रयोग करून हा मोकळा. “
.. यावर मी काय बोलणार ?
*
“साहेब हे तर काहीच नाही, सौ. ला कुणीतरी व्हाट्स अप केले. गुलाबजामसाठी मैदा आणि खवा मळताना त्यात पन्नास ग्रँम कोलगेट पेस्ट मिसळावी, जामुन खुमासदार होतात…. !
“आम्ही गुलाबजाम तोंडात घातला की ब्रश करीत असल्यासारखा तोंडाला फेस यायचा…. !”
“त्या गोडबोल्यांनी त्यांचा मोबाईल फेकून दिला म्हणे. ”
.. विषय बदलावा म्हणून मी म्हणालो.
“फेकून देतील नाहीतर काय करतील ?”
“म्हणजे ?
“गेल्या महिन्यात त्यांचा वाढदिवस होता. दुर्दैवाने त्याच पहाटे त्यांच्या पत्नीचं निधन झालं, वयही झालं होतं म्हणा…!”
“मग ?”
“त्यांना एका ग्रुप वरून मेसेज आला…
RIP and Happy birthday …!” – – कळपातील एका मेंढराने खड्ड्यात उडी मारली. बाकीच्यांनी काही विचार न करता पाठोपाठ उड्या मारल्या. RIP and HBD चा चाळीसाव्वा मेसेज आला तेव्हा वैतागून गोडबोल्यांनी फोनच फेकून दिला. “
*
बळवंतरावांनी परत एक दीर्घ निःश्वास सोडला.
“गेल्या आठवड्यात मीही एक मेसेज आमच्या ग्रुपवर पाठवला, अगदी sarcastically! तोंडाचा चंबू करून ओssss असा दीर्घ आवाज काढा आणि डाव्या हातची पालथी मूठ दहा वेळा ओठांवर आपटा. मग दहावेळा उजव्या हाताची पालथी मूठ वापरा. डाव्या हाताचा उपयोग केल्यास सर्व शारीरिक व्याधींपासून एक महिन्यात सुटका होते आणि उजव्या हाताचा उपयोग केला तर घरात सुख समृद्धी येते.”
“वा, मस्त! छान टर उडवलीत…!”
“टर ????? अहो हा मेसेज व्हायरल झालाय. एका आठवड्यात दहा वेगवेगळ्या ग्रुप वरून मलाच परत आलाय. “
= सर्वशक्तिमान व्हाट्स अप की जय हो…. !!!! =
वरील संभाषण करमणूक करणारे वाटतं असले तरी सध्या घरोघरी हीच व्यथा आहे…!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈