प्रा. सौ. सुमती पवार

? मनमंजुषेतून ?

☆ प्रेम… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

असह्य प्रसववेदनातून बाहेर पडल्यानंतर पहिला टाहो जेव्हा आईच्या कानावर पडतो ते त्रिभुवनाचे सौख्य जेव्हा आईच्या चेहऱ्यावर पसरते व ती त्या बाळाला पोटाशी धरते हे जगातील सर्वात सुंदर व प्रथम प्रेम आहे. मुळात प्रेमाची सुरुवातच इथून होते. ते बाळ म्हणजे तिचे सर्वस्व! त्याच्या बदल्यात त्याक्षणी तिला कोणी सप्तस्वर्ग जरी बहाल केले तरी ती ते लाथाडेल इतके दिव्य व जगातील सुंदर प्रेम हे आहे.

या प्रेम भावनेला आम्ही फार संकुचित करून टाकले आहे. प्रेम हे जमिनीत उगवून आकाशात पोहोचतं हे कुसुमाग्रजांनी आम्हाला सांगितलं म्हणजेच ते विश्वव्यापी आहे हे समजावलं. आणि ते व्यक्त करतांना कुणाचीही भीती बाळगायचं कारण नाही हे ही ठणकावून सांगितलं.

प्रेम हा शब्दच मुळी जगाचा व जगण्याचा पाया आहे. जीवनातून प्रेम हा शब्द वजा करताच खाली काहीच शिल्लक रहात नाही. सारेच निष्प्रभ होऊन जाते. केवळ एका या प्रेमभावनेवरच विश्व तरले आहे. जन्मत:च आई, वडील, भाऊ, बहिण, काका, काकू, मामा, मामी, आजी, आजोबा, शेजारीपाजारी, मित्रमैत्रिणी व या साऱ्यांनी मिळून बनलेला समाज व नंतर राष्ट्र इतक्या नात्यांशी आपण जोडले जातो व ही सारी नाती पायाभूत बनून त्या अनुषंगानेच आपण जगतो. यातील जी जी नाती दगा देतात तेव्हा तेव्हा आपण नाराज व प्रसंगी निराश होऊन त्याचा आपल्या जीवनावर प्रचंड परिणाम होतो.

एरव्ही तुम्ही देशावर किती प्रेम करता हा प्रश्न कुणी विचारला तर…पण, आता न बोलता साऱ्या भारतीयांनी एकमुखाने या पाच दिवसात त्याचे उत्तर दिले आहे की, आम्ही सारे एक आहोत व आम्ही आमच्या देशावर प्रचंड प्रेम करतो. या वेळी, एरव्ही कशा कशावरून भांडणाऱ्या आम्हाला देशापुढे कशाचीही आठवण येत नाही इतके आम्ही देशप्रेमाने भारावलेले असतो. ही प्रेमाची एक वेगळीच जातकुळी असते. माणूस समाजप्रिय प्राणी आहे. समाजाशिवाय त्याला अस्तित्वच नसते.

या दोन उदात्त व महान प्रेमानंतर येते ते, शृंगारातील प्रेम. ती भावनाच मुळी इतकी लाजवाब इतकी सुंदर आहे की त्याला तोड नाही. प्रियकर प्रेयसी व पती पत्नी यांच्यात शृंगारच निर्माण झाला नाही, आकर्षणच निर्माण झाले नाही तर… ? अहो हा शृंगारच तर( परस्परांविषयी आकर्षण) नवनिर्माण, सृजन, माणसाची माणसापासून निर्माण होणारी साखळी निर्माण होण्याचे कारण आहे. या आकर्षणातून म्हणजेच बघा, प्रेमातूनच माणसाची निर्मिती, जन्म होतो. म्हणून मी म्हटले की ही प्रेमभावना हाच जगाचा पाया आहे.

पण, जन्माला घातलं नि प्रेम संपलं असं होत नाही. हे एकच प्रेम एवढे मजबूत असते की, त्यातून निर्माण होणाऱ्या सर्व नात्यांना ते घट्ट बांधून ठेवते त्यानेच नाती बनतात, टिकतात व समाज निर्माण होऊन पर्यायाने राष्ट्र निर्माण होते. आणि अशा नात्यांबरोबरच दररोज आपल्या मनात राष्ट्रप्रेमही नकळत वाढीस लागते व वेळ येताच ते प्रकट होते.

प्रेम ही चघळण्याची थिल्लर भावना नाही तर ते फार सुंदर व पवित्र असे बंधन आहे न दिसणारे पण मनात कायम वास्तव्यात असणाऱ्या मायलेकरांच्या, पतीपत्नीच्या मनात वसणारे, ज्याला कुठल्याही पुराव्यांची गरज नाही व ते पुरावे दाखवताही येत नाहीत कारण ते मनाच्या खोल तळाशी सुप्त असतात. म्हणून रोज कुणीही म्हणत नाही माझे तुझ्यावर प्रेम आहे कारण ते वाणीतून, कृतीतून, नजरेतून, देहबोलीतून सतत पाझरत असते व पाहणाऱ्याला ते न सांगता कळते.

प्रेम म्हणजे आकर्षणाबरोबर आत्म्याचे मिलन असते म्हणून त्यातून माणसासारखी अजोड कलाकृती निर्माण होते. प्रेम ही एक अद्वितीय भावना आहे जिचा आपण सर्व प्रकारच्या नात्यात फक्त आदर आणि आदरच केला पाहिजे कारण प्रेमाशिवाय जीवनच व्यर्थ आहे. म्हणून जिथे जिथे जीवन संपवण्याच्या घटना घडतात त्याच्या कारणांच्या मुळाशी तुम्ही गेलात तर माणसाच्या दु:ख्खाचे एकमेव कारण असते ते म्हणजे…. “ प्रेमाचा अभाव” बस्स…

 धन्यवाद, ही फक्त माझी मते आहेत.

© प्रा. सौ. सुमती पवार 

नाशिक – ९७६३६०५६४२, email: [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments