श्री जगदीश काबरे
मनमंजुषेतून
☆ “मुक्त मी.. विमुक्त मी…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
जन्माला आलो तेव्हा पहिली पाच मिनिटे मी नागडा होतो, मला कुठले नावही नव्हते, जात आणि धर्मही नव्हता, मी कुठल्याही प्रकारचे पाप आणि पुण्यही केलेले नव्हते की कोणत्याही निष्ठुर कळपात नव्हतो. पण हे स्वातंत्र्य फक्त पहिले पाच मिनिटेच टिकले.
या पहिल्या पाच मिनिटांनंतर त्यांनी माझे नाव, राष्ट्रीयत्व, धर्म आणि जात ठरवले आणि माझ्या कपाळावर ठसठशीतपणे त्याचा शिक्का मारला. मग मी माझे आयुष्य अशा गोष्टींसाठी लढत आणि बचाव करत घालवालं ज्या मी कधी निवडल्या नव्हत्याच. पण नंतर नंतर मला त्यांची नशा चढली.
म्हणजे पाच मिनिटानंतर मी माझं संपूर्ण आयुष्य गुलामीत आणि पारतंत्र्यात घालवलं. कारण देव, देश आणि धर्माच्या सळ्यांनी तयार केलेल्या सोन्याच्या पिंजऱ्यात त्यांनी मला कैद केले होते.
पण एका क्षणी मेंदू विचार करायला लागला आणि या कैदखान्याची जाणीव झाली. मग मी देव, देश आणि धर्मापेक्षा माणूस, माणुसकी आणि मानवतेला प्राधान्य देऊ लागलो. त्याबरोबर या सोन्याच्या पिंजऱ्याच्या सळया तटातट तुटू लागल्या आणि मी मुक्त झालो… खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो. सगळ्या मानव जातीकडे मी प्रेममय नजरेने पाहू लागलो. प्राणी, वनस्पती आणि आकाश माझे सगेसोयरे झाले. माझे मन आभाळमायेने दुथडी भरून वाहू लागले.
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈