सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ मनोगत…. आपल्या सर्वांचेच ! ☆ सुश्री शीला पतकी ☆
काल अक्षय तृतीयेला अक्षय दान मागावे म्हणून मी परमेश्वराला म्हणाले, ” कालच्या मुहूर्तावर परशुराम अवतार पृथ्वीवर प्रकटला…. सुदाम्याने कृष्णाला पोहे दिले तो हाच दिवस…. दोन युगांची सुरुवात झाली तो आजचा दिवस…. वेदव्यासांनी महाभारताच्या लिखाणाला सुरुवात केली तो हाच दिवस… याच दिवशी सर्वात महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे गंगा आजच्या दिवशी पृथ्वीवर स्वर्गातून उतरली….. ” मग मी देवाला म्हणाले, “देवा आमच्यापासून दोन किलोमीटर अंतरावर उजनी आली आहे. पण समांतर वाहिनी.. तिचे काम का अडलयं… ?. त्यामुळे सोलापूरला प्रचंड पाणीटंचाई… सहा दिवसांनी एकदा पाणी येणे..
हा काय पाण्याचा हिशोब आहे ? आणि गेले कित्येक वर्ष पाणी भरणे या एकाच गोष्टीला माझ्या आयुष्यात प्राधान्य आहे. मग कृपया हे सांगा की गंगा जर भगीरथाच्या प्रयत्नाने स्वर्गातून पृथ्वीवर येऊ शकते तर उजनीचे पाणी.. जे अगदी जवळ येवून ठेपले आहे ते इथल्या इथे आमच्यापर्यंत का बरे येत नाही?…. या प्रश्नाचे उत्तर कृपया मला द्या “….
रात्री देव स्वप्नात येऊन म्हणाले, “ प्रिय भक्ता तू मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर खरंतर तुला ठाऊक आहे. तू खूप हुशार आहेस. सगळं सगळं तुला कळतं. मग याचे उत्तर ठाऊक नसेल का?… अगं तुमच्या गावाला भगीरथ पाहिजे.. त्याची इच्छा पाहिजे आपल्या गावातल्या लोकांना पाणी देण्याची. त्यांना ते नकोच आहे. त्यांना टँकरवाले पोसायचेत.. शेतकऱ्यांना जादा पैसे द्यायचेत, तेव्हा त्या जमिनीचा तो थोडासा पाईप टाकण्यापुरता भाग ते मोकळा करून देणार आणि ते झाल्यावर त्याला भोक पाडून पाणी घेणार. मग माझ्या लाडक्या भक्ता सांग बरं.. स्वर्गातली गंगा आणणं सोपं होतं, का इतक्या जवळ असलेली उजनी तुझ्या दारात आणणं ?… त्यामुळे सध्या हा उन्हाळा.. हे वर्ष असेच पाण्याची काटकसर करीत काढ बरं बाळा…! “
“बरोबर आहे देवा तुमचं. पहिल्यांदा तुमची आंघोळ आणि पूजा बंद… काटकसरीला सुरुवात.. चला ठरलं तर मग…! आता बसा पारोसे… हाय का नाय गंमत.. 😄 😄
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈