श्री मोहन निमोणकर 

??

☆ “भिकूसासेठ” – संकलन : श्री माधव सावळे ☆ श्री मोहन निमोणकर

साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. सकाळी साडेसहाची वेळ. मित्राचं पेठेत दुकान आहे. बाबा गावाला जायचे होते म्हणून त्यांना सोडायला, स्टॅन्डवर गेलो होतो. येता येता त्याच्याकडे डोकावलो.

आमचा हा मित्र सकाळी सव्वासहाला दुकान उघडतो. दुकान चालतंय कसलं… पळतय.

नीचे दुकान ऊपर मकान.

जनरल कम किराणा.

दूध, ब्रेड, बटर, अंडी, केक, बिस्कीटं,

घडीच्या पोळ्या घेणारी गिऱ्हाईकं सकाळ पासून गर्दी करायची.

दुकानापाशी पोचलो. दुकानासमोरचा डांबरी रस्ता. तेवढा तुकडा छान झाडून घेतलेला. पायरीपाशी कोपऱ्यात एक स्टीलची रिकामी बादली. मित्रानं पाण्याचा छान सडा घातला होता.

पाण्याचा छान ओलेता वास येत होता.

पायरीसमोर वहिनी छान रांगोळी काढत होती.

मी दुकानात शिरलो. पाठोपाठ वहिनी सुद्धा घरात शिरली. पाच दहा मिनटं गप्पा झाल्या. मग बेल वाजली.

दुकानातला पोरगा वर जाऊन चहाचा ट्रे घेऊन आला. बेल वाजणं म्हणजे चहा तयार आहे.

घुटक घुटक चहा घेत होतो. एवढ्यात एक माणूस दुकानात शिरला. पांढरा शुभ्र पायजमा. पांढरा बंडीसारखा शर्ट.

डोक्यावर गांधी टोपी.

 

“नमस्कार मालक. कसे आहात ?”

मित्र लगेच उठला. काऊंटरची फळी उघडून त्यांना आत घेतलं. बसायला खुर्ची दिली. पटकन वरची बेल वाजवली.

 

पाच मिनटात पुन्हा चहा आला. एकंदर बडी आसामी असावी.

 

“मालक एक विनंती आहे. वहिनी रोज पायरीपुढे रांगोळी काढते. तू देवाला हारफुलं वाहतोस. उदबत्ती लावतोस.

प्रसन्न वाटतं. पन तू रोज बादलीभर पाणी मारतो ना रस्त्यावर. ते नको करत जाऊस बाबा. पाणी वाया जाते अशान्.

पाण्यामदी जीव असतो. पाणी देव हाये आमच्यासाठी. देवाचा अनमान करू नका माऊली… “

 

पाच दहा मिनटं गप्पा मारून पाहुणे गेले.

” कोण हे ?” मी विचारलं.

‘तू ओळखलं नाहीस ?’

‘नाही बुवा.

‘भिकूसाशेठ. चोपडा ज्वेलर्सचे मालक. एकदम सज्जन माणूस. सचोटीनं धंदा करतोय गेली अनेक वर्ष. शून्यातून उभं केलंय सगळं. एम जी रोडवरची मोठी पेढी. उपनगरातही मोठं दुकान चालू केलंय नुकतंच. घनो चोखो धंदो. पण म्हाताऱ्याला वेड लागलंय. सकाळी सकाळी गावभर हिंडत असतो. कुणी दुकानापुढं सडा घालताना दिसला, की हात जोडून उभा राहतो. पाणी वाया घालवू नका म्हणतो. लोकं तेवढ्यापुरतं ऐकतात.. तो पुढं गेला की रस्ते पुन्हा ओले. आपला गाव कसाय तुला माहित्येय. बहुतेक नळांना तोट्याच नाहीत. पाणी भरून झालं तरी नळ तसेच वाहत असतात. शेकडो लीटर पाणी वाया जातं. भिकूसाशेटच्या चुलतभावाचं हार्डवेअर शाॅप आहे.

शेटच्या हातात एक पिशवी असते.

पिशवीत पान्हा आणि तोट्या. वाहतं पाणी दिसलं की हा तिथं जातो. तोटी लावून देतो. स्वखर्चानं…!! मान्य की पाणी वाया जातं. पण दुकानापुढं पाणी मारलं की धूळ खाली बसते. जरा गारवा वाटतो. हे याला कोण सांगणार? बरं, इथं पाणी वाचलं तरी ते तिकडे दुष्काळी भागात कसं पोचेल?म्हाताऱ्याची सटकलीय, झालं.

मला हे माहितच नव्हतं. मला यात स्टोरीचा वास आला. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हाताऱ्याला गाठला. तो आणखीन एका दुकानात शिरला होता. ” सकाळी दुकानापुढे पाणी मारू नका हो. “

 

त्याची आर्जवं, त्याची विनवणी.

त्याच्या हातातली पिशवी, तोट्या.

सगळं रेकाॅर्ड केलं. न्यूज चॅनलला पाठवून दिलं.

 

पेपरमधे छापून आलं. म्हातारा एका रात्रीत फेमस झाला.

 

तरीही बदलला नाही. त्याची रोजची प्रभातफेरी चालूच राहिली.

 

आताशा दुकानदारांना लाज वाटायला लागली. डांबरी रस्त्यांवरचे ओले सडे जवळजवळ बंद झाले. उघड्या नळाचं वाहतं पाणी बंद झालं.

 

न्यूज चॅनलवाल्यांनी याचं पुन्हा एकदा फीचर केलं. त्याचा छोटासा इंटरव्ह्यू घेतला.

 

ढसाढसा रडला म्हातारा. म्हणाला,

“‘मारवाडातलं गाव होतं माझं…. पण एकदम कोरडं ठाक!! पाण्यासाठी चार चार किलोमीटर वणवण फिरायची आई माझी. आणि आईबरोबर मीही.

एक एक थेंब प्राण कंठाशी आणायचा.

पाण्यात देव दिसायचा. इथली उधळमाधळ बघितली की जीव तुटतो माझा. मला पता आहे, लोक माघारी माझी टिंगल करतात. पन धापैकी एक मानस तरी ऐकतो. माझा काम झाला की मग…. !!*

https://chat. whatsapp. com/FU11b9n72pz92KmqofpUhr

त्याचा इंटरव्ह्यू ऐकला आणि मला, त्या म्हाताऱ्यातच देव दिसू लागला.

 

मागच्या महिन्यात गावी गेलो होतो.

बऱ्याच वर्षांनी. पेठेतल्या मित्राच्या दुकानी पोचलो सकाळी सकाळी.

 

एकदम आठवण झाली.

“त्या भिकूसाशेटचं काय झालं ?”

“पेठेतलं दुकान बंद झालं त्यांचं. “

“का बरं?”

“झालं म्हणजे त्यानंच बंद केलं. रिटायरमेंट म्हण ना!! उपनगरातलं चाललंय जोरात. ते दुकान पोरं सांभाळतात. कोटी कोटींची उड्डाणं.

म्हाताऱ्यानं त्यातल्या एका पैशालाही हात लावला नाही. डोंगरगावला मोठी टाकी बांधून दिली आईच्या नावानं.

बायाबापड्यांचे ऊन्हाळ्यात फार हाल व्हायचे. तिकडं नळाला पाणी आलं, आणि इकडं म्हाताऱ्यानं डोळे मिटले.. “

 

दोन मिनटं कुणीच कुणाशी बोललं नाही.

 

ग्रेट होता भिकूसाशेट.

 

मी मनातल्या मनात त्याला हात जोडले… आणि निघालो.

 

कालचीच गोष्ट.

 

सोसायटीत एक जण रोज गाडी धूतो.

त्याला गाठला. हात जोडून विनंती केली, ” रोज नको, आठवड्यातून एकदा धूत जा “

 

त्यानं ऐकलं. मी खूष.

 

एकदम भिकूसा आठवला.

डोंगरगावचा नळ माझ्या डोळ्यातून ठिबकू लागला.

सर्वांना स्पेशल विनंती.. लाईक नाही केलं तरी चालेल पण सध्या उन्हाळा आहे. थोडं पाणी जपून वापरा ही नम्र विनंती…

 

संकलन : प्रा. माधव सावळे

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments