श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “अनंत आमुची ध्येयासक्ती…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
जून महिना उजाडला तरी पावसाचा अजून पत्ता नव्हता..कडक उन्हाने मवाळपण धारण केले आणि आमच्या सावल्या आशेने शाळेला चालत निघाल्या… आम्ही जसे एकेक पाऊल पुढे पुढे टाकत निघालो तश्या तश्या त्या आमच्या पुढे पुढे चार पावलं पुढेच निघाल्या.. जणूकाही आमच्या पेक्षा त्यानांच जास्त शाळेला जाण्याची घाई लागली होती.. आनंद झाला होता.. आनंदाने त्या नाचत बागडत निघाल्या होत्या.. आमच्या पायाला गुदगुल्या करून त्या म्हणत होत्या, …. ‘पोरावो पायं उचला कि रे जरा पटापट.. करा जरा घाई बिगी बिगी जाण्याची… अजून शाळा बघा किती लांब राहिली ती मैला मैलाच्या अंतरावरती… ठावं हायं मला पायात तुमच्या पायताणं न्हाईत ते…उलंसं कुठं तरी पोळत असतील ते.. चुकार बारीक खडं नि वांड बाभळीचा काटा खुपत असणारं तुमची नदर चुकवून.. मगं कळ येउन शान आई गं म्हणाशाल कि भुलवलं तुम्हाला त्यांनी शाळेचा रस्ता चुकवाया… नगं शाळंत आज जायाला ,जाऊ उद्याला नाहीतर परवाला… शाळा कुठं पळून जातीया.. आम्ही पोरचं जर शाळंला गेलो न्हाई तर ती कुणाला बरं शिकवितीया… पाठीवर नि खाकंला पिशवीत ठूलेली पाटी नि पेन्सल.. पुस्ताकाची पुढची चार आणि मागची पाच पानंच कवाची फाटलेली असलं मिळालेलं पुस्तक आमहास्नी त्या गरजू मदत केंद्राकडनं…योकच वही बानं घेउन दिल्याली वरसाचा आभ्यास लिवायला.. अन वरनं दमात बोलला लै पैका खरच झालाय तुमच्या शाळंच्या शिक्षनाला.. खताला नि वैरणीला इथं पैका नसं द्यायला.. अन तुम्ही कुठं हुताय एव्हढं शिकून बॅरिस्टर नि फॅरिस्टर व्हायला.. गडी मिळनातं अव्वाच्या सव्वा पैका मोजून रानात राबायला… चारं पैसं तेव्हढचं शिलकीत राहत्यालं तुम्ही आलात रानात मदतीला…बालमजुरी हा कडक कायदा हाये कायद्याच्या पुस्तकात लिवलेला… तो कुठं घालतो पोटाला लेकराबाळांचा बारदाना असलेल्या घराला… आई जेऊ घालिना अन बा भिक मागू देईना असं सरकार डांबिस हाये.. तिकडं गुरूजी दारोदारी हिंडत्यात आईबांच्या पाया पडत्यात पोराला पोरीला शाळंत पाठवा महनत्यात माझ्या नोकरीचा सवाल हाये.. उगा गरीबाला उपाशी पाडू नगासा.. चारकच्चीबच्ची बी हायती मला… महिन्यानं फकस्त दोन येळा शाळंला येऊ द्या हाजरीला.. इन्स्पेक्टर होईल खूष पटावरची लिहिलेली हजेरी बघून… शाळा फसक्लास चालू हायं असा शेरा जाईल लिवून…बाकी सगळे दिस पोरं पोरी शाळंला नाही आली तरी चालंल… अ आ ई नि ग म भ न याच्या पलिकडं गाडी गेली नाही तरी चाललं…चौथीच्या पुढे शाळा वाढली नाही तरी चालंल…एक गुरूजी शाळा नि खडू फळा…बाकीचे गुरूजी शेहरातनं असत्यात. पोकळ घोषणाबाजीत पुढाकार घेऊन म्हनत्यात शेहरातून खेड्याकडं वळा…शेतीप्रधान देश आपला… शेतकरी जगेल तर देश प्रगती करेल…तरच तरच आमची ध्येयासक्ती साध्य होईल..
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈