श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ मृगतृष्णा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

 “अरं  ढवळ्या लेका! का असं गठुळ्यागत अंग मुडपूनशान खाली बसलास? मळ्याकडं जोताला जायचं नव्हं का आपुल्याला? धाकलं मालक आता वाड्यातून दहीभाकरचा तुकडा खाऊन बाहीर येतील कि मर्दा! आनी तु असा बसलेला बघितल्यावर खवळायचं न्हाई व्हयं?… आरं ह्यो आळस सोड नि गपगुमान उभा राहा बघू!.. “

“… पवळ्या दादा, म्या आता जो हथं बसलोय ना त्ये काय लवकर उठायचं नावं घेनार नायं… आवं दादा आता कालच दिव्याची आवस उलाटली.. अन सारवण सुरू झाला तरी पाउसाचा टिपुस काय गळाया तयार न्हाई… पार उन्हाळ्यातल्यावानी उनाचा कडाका तसाच पडतोय कि… आजवर चार बाऱ्या झाल्या नांगरटणीला खेटं घालून.. वळीवानं तोंड वळविलं, म्रिगानं तर तोंड दावलचं न्हाई, ती मधली दोनी बी लबाड नक्षत्रं पाठ दाखवूनच गायब… आरं जित्राबं सुध्दा बिळं सोडून गेली तत मानसांची नि  आपली काय गत झालीया, तुला कायं येगळं सांगाय हवं काय? ढेकळांचा चोक शोष पडल्यावानी उताणी पडलेली रानं… हिरीचं, ओढयाचं खरवडून निघालेलं  पानं.. रोज मैल मैल धुरळा उडवीत जाऊन एक कळशीभर पाणीची उसाभर करून आपला तर जीव पार धायकुतीला आला बघं… दादा आता अवसान गळाठयला बघं… चार पावलं उचलून टाकाया न्हाई जमायचं… ते धाकलं मालक येऊ देत न्हाई तर मोठ्ठं… मला  इथचं पडून राहावंसं वाटतया… दादा आता माझा राम राम करायची येळ झाली बघा… तुम्ही वाईट वाटूनशान घेऊ नका… तुमचा  आमचा संबंध इथवर छान जुळला… मला तुमी लै सांभाळून घेतलसा…. आता दादा तुम्ही सोताला सांभाळा… म्या जरा आता निवांत पडून राहतो… मालकानां माझा राम राम सांगा.. “

” अरं ढवळ्या, असं काय येड्यावानी बरळतूया! आरं ते बघं काळं निबारं ढग दाटून आल्याती… पावसाची झड येऊ लागली… गार वारं सुटलं लेका.. आला आला बघ पाऊस सुरू झाला कि येड्या! आरं उठं चटदिशी उभा राहा… पावसाच्ं पाणी पिऊन घे बघं कशी तरतरी येती ते… उठं कि रे गब्रु… अरं उठं.. उठं.. “

ढगांच्या गडगडाटात, विजेच्या लखलखाटात पावसाच्या रूपेरी धारा बरसू लागल्या… संजीवनी घेऊन आलेला पाऊस मात्र ढवळयाची तहान भागवू शकला नाही…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments