श्री हर्षल सुरेश भानुशाली
पुस्तकावर बोलू काही
☆ “भारत – सत्य, सत्व, स्वत्व” -लेखिका : लेखक : श्री अभिजीत जोग ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : भारत – सत्य, सत्व, स्वत्व
लेखक : अभिजित जोग
मूळ किंमत ₹४९९₹
भारत हा जगातील एकमेव देश असेल ज्याची खरी ओळख पुसून टाकण्यासाठी एक राष्ट्र म्हणून त्याचं अस्तित्वच नाकारण्यात आलं. शिक्षण आणि इतिहास या त्याच्या शक्तिस्थानांवर हल्ला करून त्याचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान नष्ट करण्यात आला. कधीच लयाला गेलेल्या आणि संग्रहालयापुरत्या उरलेल्या इतर प्राचीन संस्कृतीचं वारेमाप गुणवर्णन करण्यात साम्राज्यवादी शक्तींना कुठलीही अडचण वाटली नाही. पण हजारो वर्षांपासून आजही जिवंत असलेल्या भारतीय संस्कृतीचं महत्व मान्य करणं निरंकुशतावादी शक्तींसाठी गैरसोयीचं होतं. राजकीय स्वातंत्र्य मिळालं तरी या शक्तींनी लादलेल्या वसाहतवादी मानसिकतेतून भारतीयांची अजूनही पूर्णपणे मुक्तता झालेली नाही. न्यूनगंड, आत्मनिंदा यांचा प्रभाव अजूनही ओसरलेला नाही. कारण भारतीयांना आपली खरी ओळख अजूनही गवसलेली नाही.
‘सभ्यता’ या शब्दाचा अर्थ जगाला समजावणारा ; भाषा आणि संस्कृतीची देणगी जगाला देणारा ; विविध ज्ञानशाखांची पायाभरणी करणारा ; गळेकापू स्पर्धेशिवायही समृद्धीची निर्मिती करता येते हे दाखवून देणारा ; वैश्विक मानवी मूल्यांचा संदेश देणारा ; अराजक, अस्थैर्य, असहायता यांच्या गर्तेत सापडलेल्या जगाला स्थैर्य, शांती, समृद्धी, सर्वसमावेशकता यांचा मार्ग दाखविण्याची क्षमता असलेला देश, ही भारताची खरी ओळख भारतीयांनाच करून देणे अत्यावश्यक आहे.
वसाहतवादी मानसिकता झुगारून दिलेला, आपली खरी ओळख पटलेला, आपल्या सुप्त क्षमतांची जाणीव झालेला भारतच जगाला मार्ग दाखविण्याची आपली ऐतिहासिक जबाबदारी पार पाडण्यास सिद्ध होऊ शकेल.
या पुस्तकावरचे काही अभिप्राय ::
श्री. श्री. अभिजित जोग लिखित ‘भारत सत्य, सत्व, स्वत्व’ हा ग्रंथ म्हणजे हजारो वर्षांपूर्वी भारतीयांनी केलेल्या ज्ञानोपासनेचा व भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा धावता आढावाच होय. ‘ज्ञान विज्ञान योग’ असे प्रस्तुत ग्रंथाचे वर्णन करता येईल. यात तत्वज्ञान, अध्यात्म, भाषा (संस्कृत), वैद्यक, खगोलशास्त्र, गणित, धातुशास्त्र या ज्ञान-विज्ञानाच्या सर्व आयामांचा भारतातच उदय झाल्याचे सप्रमाण विवेचन केलेले आढळते. सखोल चिंतन, ‘ना मूलं लिख्यते किंचित’ हे असे धोरण, भारत म्हणजे जगातला पहिला ज्ञानाधिष्ठित समाजाचा देश, वेदोपनिषदे व सभ्यतेची मानवी मूल्ये भारतात निर्माण झाली तेंव्हा इतर देशात अज्ञानांधःकारच होता हे ठासून सांगणारा हा ग्रंथ होय.
— गो. बं. देगलूरकर
नामवंत विद्वान आणि भारतीय कला व स्थापत्यशास्त्राचे सर्वमान्य अभ्यासक
विषयाचा आवाका आणि मांडणी याबाबतीत हे पुस्तक ज्ञानकोषीय पातळीवर जाते. इतका मोठा विषय हाताळताना बारीक-सारीक तपशीलही सुटणार नाहीत याची काळजी घेण्यात लेखक अभिजित जोग पुन्हा एकदा यशस्वी ठरले आहेत.. तरीही, प्रवाही भाषेमुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे. भारतवर्षाची खरी ओळख पुनर्स्थापित करणारे हे दर्जेदार पुस्तक सर्व प्रकारच्या वाचकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो.
— नीलेश ओक
विद्वान संशोधक आणि लेखक
सत्य दडपून जो तथाकथित ‘इतिहास’ पाश्चात्यांनी आपल्यावर लादला, त्याला आह्वान देण्याची ताकद अभिजित जोग यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि लेखणीतही आहे, हे या पुस्तकामुळे पुन्हा एकदा निदर्शनास येतं. प्राचीन काळापासून भारताचं सत्त्व आणि स्वत्त्व हे ज्ञान आणि तत्त्वज्ञाना इतकंच विज्ञानातही आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी जोगांनी संशोधन वृत्तीनी लेखन केलं आहे. आपला हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी हे सत्यदर्शक पुस्तक जरूर वाचा.
— डॉ. सुचेता परांजपे
वेद आणि इंडोलॉजी तज्ञ
भारताच्या पुरातन अस्तित्वाला पोखरणाऱ्या डाव्या वाळवीची कृष्णकृत्ये साधार उघडकीला आणणारे, सव्यसाची लेखक अभिजित जोग यांचे अजून एक विलक्षण पुस्तक! सत्य मांडणारे, सत्व जपणारे आणि स्वत्वाची जाणीव देणारे. आपल्या आत्मवंचना ते आत्मघात या जीवघेण्या प्रवासाची गती थोपवणारा एक मोलाचा गतिरोधक आहे हे पुस्तक! अभिजित जोग यांच्या सहज शैली आणि ओघवत्या भाषेतला असा हा तब्बल अडीच सहस्त्रकांचा ठोस पुराव्यांसकट आलेख मांडणारा महत्वाचा दस्तावेज!
— दीपक करंजीकर
लेखक, अभिनेता, व्यवस्थापन आणि अर्थतज्ञ
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो. 9619800030
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈