सुश्री अरूणा मुल्हेरकर
पुस्तकावर बोलू काही
☆ “दुर्वाची जुडी” – लेखिका: सौ राधिका भांडारकर ☆ परिचय – सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
पुस्तक – दुर्वांची जुडी
लेखिका- सौ राधिका भांडारकर
प्रकाशक – अमित प्रकाशन, पुणे
प्रथम आवृत्ती- दि. 10 मार्च 2025
मुखपृष्ठ- समृद्धी क्रिएशन
मूल्य-₹ 360/-
दुर्वांची जुडी या सौ. राधिका भांडारकर यांच्या सहाव्या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा
नुकताच सावरकर सभागृह पुणे, येथे शुभंकरोती साहित्य परिवार या समूहाच्या तिसऱ्या राज्यस्तरीय संमेलनात दि ६ एप्रिल २०२५ रोजी संपन्न झाला. त्यांचे गमभन, लव्हाळी हे ललित लेख संग्रह, जीजी आणि अळवावरचे पाणी ही चरित्रे, तसेच गारवा हा काव्यसंग्रह यापूर्वी प्रकाशित झाले आहेत. त्या एक सिद्ध हस्त लेखिका आहेतच, पण त्यांचा मूळ पिंड कथालेखिकेचाच आहे असे मला नेहमी वाटते. राधिकाताईंची प्रत्येक कथा मी वाचलेली आहे आणि वाचताना त्या कथेत अगदी हरवून गेलेली आहे.
सौ. राधिका भांडारकर
राधिकाताई आता अनुभव संपन्न अशा ज्येष्ठ लेखिका आहेत. त्यांची कोणतीही कथा वाचताना त्या कथेत वावरणारी पात्रे ही कुठेतरी आपणही पाहिली आहेत, ती आपल्या जवळचीच आहेत असे सतत वाटत राहते. त्यामुळेच ती कथा घडत असताना आपण ती पहात असतो.
दुर्वांची जुडी या कथासंग्रहात एकूण २० कथा आहेत. प्रत्येक कथा वेगळी. त्यातील पात्रे, परिस्थिती, भोवतालचे वातावरण पूर्ण वेगळे. लेखिकेचे समाजाचे निरीक्षण किती बारीक आहे, समाजात वावरत असताना त्या तितक्याच संवेदनाशील आहेत याची आपल्याला वेळोवेळी जाणीव होते.
अ, ब, क ही या संग्रहातील पहिलीच कथा. याच्या शीर्षकातच राधिका ताईंची कल्पनाशक्ती दिसून येते. वाचण्यापूर्वी वाचक कदाचित असा विचार करील की, शाळेतील मुलांचा गणिताचा, मुख्यत्वे करून बीजगणित किंवा भूमिती या विषयाच्या अभ्यासावरील ही कथा असेल का? वाचताक्षणीच मात्र लक्षात येते की ही प्रेम कथा आहे. अ ब क या तीन माणसांची ही प्रेम कहाणी! अ आणि ब ची लहानपणापासूनची मैत्री, पुढे त्याचे प्रेमात रूपांतर. अने मात्र तिचे प्रेम कधी व्यक्त केले नाही, आणि पुढे आई-वडिलांच्या सांगण्यावरून कशी अ विवाबद्ध झाली. अगदी साधी कथा. कितीतरी अशी जोडपी समाजात सापडतील. लेखिकेने तिच्या साध्या, सरळ, सोप्या भाषेत अत्यंत सहजपणे अ ब क चे व्यक्तीचित्रण रंगवून हा प्रेमाचा त्रिकोण उलगडला आहे.
अ क शी अगदी प्रामाणिक राहून संसार करत होती हे सांगताना लेखिका लिहिते, ” धर्म, संस्कृती, निष्ठा, कर्तव्य नीति या सर्व घटकांची तिची प्रामाणिक बांधिलकी होतीच, आणि तिने ती काटेकोरपणे पाळली. ” या चारच ओळीत संपूर्ण अ आपण पाहतो.
‘क्षण आला भाग्याचा’ या कथेत राधिकाताईंनी त्यांच्या आजीचे व्यक्तीचित्रण, अल्पचरित्रच वाचकांना वाचावयास दिले आहे, परंतु ते कथा स्वरूपात सांगताना एका वेगळ्या पार्श्वभूमीवर सांगितले आहे. अंजोर नावाची एक लेखिका, तिच्या “क्षण आला भाग्याचा” या कादंबरीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून दूरदर्शनवर तिची मुलाखत नियोजिली आहे आणि त्या मुलाखतीतून तिच्या आजीचे जीवन ती प्रेक्षकांना सांगते आहे. टीव्हीवर अशा प्रकारच्या मुलाखती नेहमी होत असतात ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन राधिका ताईंनी ही कथा अशा प्रकारे वाचकांना सादर केली आहे.
“कांदे पोहे” ही या संग्रहातील आणखी एक कथा- दोन पिढीतील अंतर हा तर अगदी नेहमीचाच प्रश्न आहे. मुलगी उपवर झाली की घरोघरी कांदेपोह्यांचा कार्यक्रम होत असतो, पण आई-वडिलांसाठी मुली त्या कार्यक्रमात सहभागी होतात. याच विषयावरची ही कथा.
ऋता या कथेची नायिका. अनुभवी सॉफ्टवेअर इंजिनियर. एका कॉर्पोरेट कंपनीत काम करणारी, करिअरला महत्त्व देणारी. आजच कांदेपोह्यांचा कार्यक्रम आणि ऑफिसमध्ये तिचे महत्त्वाचे प्रेझेंटेशन. अर्थातच प्रेझेंटेशन हीच तिची प्रायाॅरिटी. आता ही मुलगी संध्याकाळी वेळेवर घरी येणार की नाही याचे तिच्या आईला आलेले टेन्शन. अशी परिस्थिती घरोघरी असते नाही का? पण राधिका ताई नेहमीच जुन्या नव्याचा मेळ चांगल्या प्रकारे घालतात. पुण्याच्या प्रसिद्ध “कांदेपोहे महिला गिरीप्रेमींची हिमालयात अष्टहजारी शिखरावर यशस्वी मोहीम होते आणि या मोहिमेचे नेतृत्व करणारी तरुण, तेजस्वी, पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असणारी हीच ऋता सोनवणे, हिची वृत्तपत्राशी झालेली बातचीत छापून येते. तिला बघायला आलेल्या काकू ती मुलाखत वाचताना रमून जातात अगदी. ऋताचा ” मुलींनो, विवाहपरंपरेत अडकलेल्या, कांदे पोह्यांना वेगळा अर्थ प्राप्त करून द्या. स्वतःचे सामर्थ्य ओळखा, अस्तित्व पारखा, आपल्यातली बलस्थाने अधिक टोकदार, धारदार बनवण्याचा प्रयत्न करा……. ” अशाप्रकारे त्या समाज प्रबोधनही करतात. याच कारणास्तव ही कथा आपल्याला भावते.
पोकळी या कथेचा विषय तर अगदीच वेगळा. माणसाच्या मनात भूतदया तर असतेच. बहुतांशी लोक कुत्रे, मांजर, मासे, यांना आपल्या घरात पाळतात, आणि मालकाचे व त्या पाळीव प्राण्याचे नाते पाहून कुणी त्रयस्थ अगदी अचंबित होतो. पोकळी या कथेत कथेची नायिका अमिता आणि तिचा कुत्रा ब्रूनो यांचे नाते आपल्याला पहावयास मिळते. ब्रूनो ची मेंटल कंडिशन बिघडल्यामुळे त्याला जगवणे शक्य नव्हते. एकदा त्यांच्या घरी त्यांची काही मित्रमंडळी आली असता एका मित्राच्या आठ वर्षांच्या मुलीवर ब्रूनो ने चक्क झडप घालून तिला पाडले. ती अतिशय घाबरली. सगळ्यांनी मिळून परिस्थिती सावरली, पण हे फार भयंकर होते. याआधीही त्याने एक दोघांना असेच घाबरविले होते. त्यामुळे आता ब्रूनोला जिवंत ठेवून रिस्क घेणे शक्य नव्हते. अमिताने ही सगळी परिस्थिती कशी हाताळली, त्यावेळची तिची मानसिक अवस्था काय होती, हे सगळे वर्णन वाचून लेखिकेच्या लेखन कौशल्याचे कौतुक करावे तितके कमीच असे वाटते. ही कथा वाचताना वाचकांचे डोळे पाणावले नाहीत तरच नवल!
दुर्वांची जुडी ही पुस्तक शीर्षक कथा..
आयुष्यात आपल्याला एखादी व्यक्ती भेटते. तेवढ्यापुरते जुजबी संभाषण होते, आणि माणसांच्या प्रवाहात ती व्यक्ती नाहीशी ही होते. ती व्यक्ती मनात घर करून कधी बसली ते समजत नाही आणि त्यानंतर आपण त्या व्यक्तीची नाव, गाव, जरा जास्त काही चौकशी केली नाही म्हणून स्वतःचाच राग येतो. मनाला नैराश्य येते. अचानक पणे काही काळानंतर त्या व्यक्तीला भेटण्याचा पुन्हा योग येतो. आता संधी सोडायची नाही, असा विचार करत असता ती व्यक्ती लग्नासाठी मागणी घालते. अतिशय नाट्यमय आहे ही कथा. वाचताना वाचकाचे मन नक्कीच प्रफुल्लित होते. विचारांती असे वाटते, यात अशक्य काहीच नाही, असेही अनुभव कुणाला ना कुणाला तरी आले असणारच!
खरंतर सगळ्याच वीस कथा एकापेक्षा एक सरस आहेत. ‘ एक दिवस’ मधील त्रिकोणी कुटुंब, ‘बरं’ या कथेतील नानी, ‘ काव काव’ सारखी एका अतृप्त आत्म्याची कहाणी, ‘दाखला’ मधली तानीबाई, जिची मुलं जगत नाहीत, त्यामुळे समाजाने दुर्लक्षित केलेली ‘जयवंतीण’ या सर्वच कथा समाजाचे विविध रंगी चित्र वाचकांच्या डोळ्यासमोर उभे करतात.
या सर्व वीस कथा म्हणजे लेखिका सौ. राधिकाताई भांडारकर यांच्या समृद्ध अनुभवांचा भावनिक अविष्कार आहे असेच मी म्हणेन.
– – राधिकाताई, अशाच विविध विषयांवर कथा लिहून आपल्या कथाविश्वाचा वेलु गगनावरी जावा अशा मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते.
परिचय : अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈