☆ जीवन रंग ☆ कथा- निरागस भाग-४ ☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

एकदा ती शरयू ताईंना म्हणाली, “आजी गं, मार्था आजीला बरं वाटत नसेल का? बेडवरून उठता पण येत नसेल का? आजी आपण जाऊन पाहू या ? चल नाऽ.”

असं म्हणत ती आत निघाली सुद्धा. शरयू ताई पण नातीच्या मागून तिच्या घरा पाशी जाऊन पोहोचल्या. बेलच्या बटनावर हात ठेवताना त्यांच्या मनात विचार आला.  इतक्या दिवसापासून तिला भेटतोय त्यामुळे तिच्याबद्दल मनात स्नेहभाव उत्पन्न झालाय. तिची विचारपूस करायला…. माणुसकीच्या नात्याने तिची खुशाली विचारायला काय हरकत आहे? ज्योतीचा व्यवहारीकपणा राहू दे तिच्या जवळच. तिला हे काही नाही सांगायचंच.

बेलचा आवाज ऐकून मार्था आजीनं दार उघडलं. हर्षदाला पाहून तिला इतका आनंद झाला की सांगता सोय नाही. “प्लिज कम् इन” ती म्हणाली.

आपल्या तोडक्या-मोडक्या इंग्लिश मधून शरयू ताईंनी तिची चौकशी केली. वायरल फीवर… मेडिसिन… विकनेस असे शब्द ऐकून काय झालं ते त्या समजल्या. हर्षदा जाऊन तिच्या रॉकिंग चेअरवर बसून आरामात झुलायला लागली. जणूकाही स्वतःचं घर आहे अशा थाटात!  दोघी परत जायला निघाल्या. हर्षदाच्या डोक्यावरून हात फिरवताना मार्था आजीच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले.’ प्रेमाला शब्दांचं… भाषेचं.. वयाचं.. जाती-धर्माचं.. वंशाचं..  रीतीरिवाजांचं.. कशा कशाचंही बंधन नसतं हेच खरं शरयू ताईंच्या मनात विचार आला.

थोड्या दिवसांनी पुन्हा मार्थाचं बागेत चेअरवर बसणं आणि या जोडगोळीला भेटणं सुरू झालं… पण आता फार दिवस उरले नव्हते. सहा महिने कधी संपत आले त्यांना कळलेच नाही. त्यांची परतीची तयारी सुरु झाली. शॉपिंग आणि ज्योती-प्रकाशच्या फ्रेंडस् कडं डिनरला जाणं असा त्यांचा नवा दिनक्रम सुरू झाला. त्यामुळे संध्याकाळचे फिरणे एकदमच बंद झाले.

त्या विमानात बसल्या आणि एखादा चित्रपट पाहावा तसा या सहा महिन्यातील सुखद आठवणींचा पट मनातल्या मनात उलगडून पाहत राहिल्या. त्यावेळी मार्थाला आपण निरोपाचं ही भेटू शकलो नाही ही रुखरुख मात्र त्यांना तीव्रतेने जाणवत राहिली.

भारतात पोचल्यावर फोन वर सुखरुप पोहोचल्याचे बोलणं झाल्यावर त्या म्हणाल्या,” ज्योती बेटा हर्षदाला घेऊन एकदा मार्था आजीला भेटून ये बाई. तिला कोणी नाहीये गं. तिला मी निघायच्या आधी भेटू शकले नाही, याची फार चुटपुट लागून राहिली बघ मला.”

“अगं कालच ती आपल्याकडे आली होती “ज्योती म्हणाली. चार दिवसांपूर्वी हॉस्पिटलमधून आले म्हणाली. मी पूर्वी पाहिली होती त्यापेक्षा खूपच अशक्त वाटली. थोडा वेळ बोलत बसली. तुमच्या तिघींच्या सेल्फी दाखवल्यान्. तुम्हा दोघींबद्दल फारच जिव्हाळ्याने बोलत होती बघ. जायला निघाली तेव्हा हर्षदा कडं डोळे भरून पाहिलेन्. तिच्या डोक्यावरून हात फिरवून नेहमीप्रमाणे “गॉड ब्लेस यू, माय चाइल्ड!”म्हणून हळूहळू चालत निघून गेली…. खरंच गं, काल तिच्याकडे पाहून माझे पण डोळे पाणावले. हे म्हातारं एकटेपण फारच वाईट नाही?” बोलता बोलता ज्योती पण हळवी झाली, “चहाच्या एका कपाचं पण देणं-घेणं नाही. कसलाही स्वार्थ नाही. छल कपट नाही. दोघींनी एकमेकींना फार जीव लावला आहे गं” भरल्या आवाजात ज्योती म्हणाली.

एक आठवडा पण उलटला नसेल ज्योतीचा अचानक फोन आला, “आई हर्षुला कसं सांगू हेच कळत नाहीये गं. पुन्हा काल संध्याकाळी फिरायला जाऊया… ग्रॅंडमाकडं जाऊया.. म्हणून खूप हट्ट केला तिनं. रडली सुद्धा. पण काय झालंय मी परवा सकाळी बागेत काम करत होते ना तेव्हा मार्थाच्या घरासमोर ऍम्ब्युलन्स उभी असलेली पाहिली. तिला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलंय… आणि….”

“आणि काय…?” अधीरपणे शरयू ताईंनी विचारलं.

“बहुतेक बरं वाटायला लागलं की तिला ओल्ड पिपल्स होममध्ये पाठवतील. तिची काळजी आता सरकारच घेईल.. आमच्या या छोट्याशा पाडसाला मात्र पुढं काही दिवस तरी काहीतरी खोटं सांगून गप्प करावे लागणार आहे बघ. अजून अजाण आहे आणि फारच सेन्सिटिव्ह आहे नां ती.” ज्योती रडवेली झाली होती.

फोन ठेवला तरी मार्थाचेच विचार शरयूताईंच्या मनात घोळत होते. ‘खरंच मार्था आजी आणि हर्षूमधलं हे नातं…. अंतकरणातून जुळून आलेले हे प्रेमाचे धागे… या सगळ्या तर्का पलीकडल्या गोष्टी आहेत… दोघींना एकमेकींबद्दल वाटणारी आपुलकी…हे सगळं  परमेश्वरी गूढच नाहीतर दुसरं काय’..? शरयुताई स्वतःचेच काहीतरी हरवल्यासारख्या हळव्या होऊन गेल्या. त्यांना वाटलं आता ती मार्थाआजी हर्षुला भेटणार सुद्धा नाही .हळू हळू शाळा, अभ्यास, मित्र-मैत्रिणी यात गर्क झालेली ती कालांतराने हे सगळे विसरुनही जाईल, पण त्या दोघींच्या निरागस प्रेमाची साक्षीदार असलेल्या आपल्या मनाला मात्र त्यांच्या बद्दलच्या या हळव्या आठवणी अस्वस्थ करत राहतील…..!

समाप्त

© सौ. सुनिता गद्रे,

माधव नगर, सांगली मो – 960 47 25 805

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments